राम गणेशांचे सदाबहार नाटक

>> क्षितिज झारापकर

संगीत ‘एकच प्याला.’ या नाटकाला 100 वर्षांनंतरही चिरतरुणच म्हणावे लागेल. कारण आजही हे नाटक सडेतोड सामाजिक भाष्य करते.

दीडशे वर्षांपेक्षा जास्त काळ दिमाखात नांदणाऱ्या मराठी रंगभूमीच्या सुरुवातीच्या संगीतमय बालपणात अनेक अजरामर नाटकं आली ज्यांच्यामुळे आपली रंगभूमी केवळ समृद्धच झाली नाही तर अशा नाटकांच्या मौलिक विषयांशी प्रेक्षकांची नाळ चटकन जुळल्याने रंगभूमीची, नाटकांची भुरळ मराठी रसिक मनावर पडली. संशयकल्लोळ, शारदा, मानापमानसारखी नाटकं, त्यांचं तत्कालीन सामाजिक परिस्थितीवरचं भाष्य, त्यावर केलेली टिप्पणी आणि या सगळय़ाला दिलेलं संगीताचं अत्यंत लोकप्रिय असणारं वेष्टन हे  एक अत्यंत विलक्षण मिश्रण होते. हे इतकं परिणामकारक होतं की आजही त्या सुरुवातीच्या काळातील नाटकांचा स्वतंत्र असा कायमस्वरूपी प्रेक्षकवर्ग आहे. पण या कलाकृतींना आणि त्या घडवणाऱ्या प्रतिभांना आता शतक उलटून गेले आणि त्या शतकातली गेली काही दशकं तर झपाटय़ाने पुढे धावली. या बदलत्या चित्रात आपली ही शतकापूर्वीची संस्कृती लक्षात राहावी म्हणून नव्या, वेगळय़ा आणि विलक्षण प्रतिभेची गरज आहे.

ही गरज ओळखून रंगशारदा प्रतिष्ठान या विद्याधर गोखले यांच्या संस्थेमार्फत त्यांचेच चिरंजीव व ख्यातनाम रंगकर्मी विजय गोखले यांनी राम गणेश गडकरी यांचं ‘संगीत एकचं प्याला’ हे नाटक पुन्हा सादर करण्याचा घाट घातला. खरं तर ‘संगीत एकच प्याला’ हे नाटक कधी थांबलंच नाही. हे नाटक गेली शंभर वर्षे वेगवेगळय़ा संचांतून चालूच आहे. कारण दारूच्या दुष्परिणामांचं चित्र उभं करणारं ‘संगीत एकच प्याला’ हे नाटक कधीच कालबाहय़ होणार नाही. आज चित्र वेगळं पण तितकंच विदारक आहे. नाक्यावरचे टवाळे पंधरवडय़ातून एकदोनदा ज्या मदिरालयामध्ये दारू प्राशनास जावयाचे तिथे आज तुल्यबळ संख्येने महिलांची उपस्थिती असते. पुढे जाऊन या नाटकातील सुधाकर आणि सिंधू , तळीराम आणि गीता ही पात्रं उलटी करून हे नाटक सादर करावं लागेल की काय अशी परिस्थिती होत चालली आणि म्हणूनच ‘संगीत एकच प्याला’ आजही अत्यंत रेलेव्हंट आहे. आजच्या पिढीच्या रुचीप्रमाणे ते सादर होणं महत्त्वाचं. विजय गोखले यांनी ही गोष्ट हेरून हे ‘संगीत एकच प्याला’ उभारलेलं आहे.

गडकऱ्यांच्या ‘संगीत एकच प्याला’च्या लेखनमूल्यावर मी कोणतंही भाष्य करणं हा उद्धटपणा होईल. पण ‘संगीत एकच प्याला’ हे भाषा सामर्थ्याचं एक खूप सुंदर प्रतीक आहे इतकं सांगायलाच हवं. मिळणे आणि भेटणे या दोन शब्दांचे अर्थ एक समान होण्याआधीची मराठी भाषा कशी होती हे या नाटकातून कळतं. ‘संगीत एकच प्याला’ हे तत्कालीन संगीत नाटकाच्या बाजात लिहिलेलं नाटक आहे. विजय गोखल्यांनी ते दिग्दर्शित करताना नाटकाचा तो बाज कमालीच्या शिताफीने बदलला आहे. रंगशारदाचं हे ‘संगीत एकच प्याला’ आजच्या कोणत्याही नाटकासारखं समोर येतं. आजचा पिरीयड प्ले कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे विजय गोखलेंचं ‘संगीत एकच प्याला.’ नवीन फॉर्ममध्ये हे संगीत नाटक सादर करताना पारंपरिक नाटय़ संगीताचे रिमेक न करता ती गंमत तशीच पोहोचवण्यासाठी जाणकार अरविंद पिळगावकरांचे संस्कार इथे घडवले गेले आहेत. कशी या त्यजु पदाला किंवा प्रभू अजी गमला ही पदं तितक्याचं दिमाखात आजही मंत्रमुग्ध करतात. उल्लेखनीय म्हणजे ऑर्गनवर केदार भागवत आणि तबल्यावर सुहास चितळे हे नाटकाला केवळ गाणी नव्हेत तर पार्श्वसंगीतही लाईव्ह देतात. यामुळे कृत्रिमपणा संभवतच नाही.

या नाटकाला कलाकार ताकदीचे आणि नेमके लाभलेत. अंशुमन विचारे नितांत सुंदर तळीराम साकारतो. गडकऱ्यांचा तळीराम हा विनोदी नसून तो कुत्सतिपणे वावरणारा खलनायक आहे हे समजून अंशुमन तळीराम अफलातून उभा करतो. संपदा माने ही गुणी अभिनेत्री सोशिक सिंधू खूप प्रामाणिकपणे वठवते. संपदाचा आवाज तर नाटय़संगीतप्रेमींना पर्वणीच आहे. गोष्ट रामलाल झालेल्या शुभम जोशीची आहे. या दोघांनी गायक नट हे उत्तम अभिनय करू शकतात हे पुन्हा एकदा पटवून दिलेलं आहे. गीता या पात्राचा तोरा या नाटकात महत्त्वाचा आहे. दोन अंकात बसवताना हे पात्र उभं करायला वेळ कमी झाला आहे आणि शुभांगी भुजबळ यांनी हार्दिक पांडय़ासारखी कामगिरी केलेली आहे. कमी अवधीत मॅक्झिमम इम्पॅक्ट. शुभांगीची गीता हवी तशी तडफदार आणि प्रेमळ वठली आहे. सुधाकराच्या भूमिकेत उगवता तारा संग्राम समेळ कमाल करून जातो. नव्या पिढीचे कलाकार अनेकदा मेलोड्रामा कमी लेखतात आणि नैसर्गिक अभिनयाच्या वाटेने जाऊ पाहतात. संग्रामने हे टाळलंय आणि तिथे तो जिंकलाय. काही नाटकं ही लिखाणात मेलोड्रमॅटीक असतात. तिथे तो साधला गेलाचं पाहिजे. इथे तो साधला गेलाय. शशिकांत जोशी, दीपक गोडबोले, मकरंद पाध्ये, विजय सूर्यवंशी आणि विक्रम दगडे यांनी आपापली पात्रे नेमकेपणाने उभारून हे ‘संगीत एकचं प्याला’ अधिक भरीव केलेलं आहे. सविता गोखले निर्मित रंगशारदा प्रतिष्ठानचे हे ‘संगीत एकच प्याला’ एक नितांत सुंदर अनुभव आहे हे निश्चित.

 • नाटक : संगीत एकच प्याला
 • निर्मिती : रंगशारदा प्रतिष्ठान
 • कार्यकारी निर्माती : सविता गोखले
 • लेखक : राम गणेश गडकरी
 • संगीत मार्गदर्शक : अरविंद पिळगावकर
 • नेपथ्य : प्रदीप मुळय़े
 • प्रकाशयोजना : अमोघ फडके
 • व्यवस्थापक : प्रवीण दळवी
 • दिग्दर्शक : विजय गोखले
 • कलाकार : संपदा माने, शुभांगी भुजबळ, शशिकांत दळवी, दीपक गोडबोले, मकरंद पाध्ये, विजय सूर्यवंशी, विक्रम दगडे, अंशुमन विचारे, संग्राम समेळ
 • दर्जा : ***
आपली प्रतिक्रिया द्या