‘ह्यांचं करायचं काय’ : विनोदाची आतषबाजी

762


>>  क्षितिज झारापकर

‘ह्यांचं करायचं काय’ अतरंगी विनोदातून निघालेलं इरसाल नाटक असेच यावर भाष्य करावे लागेल.

मराठी नाटकं आशयघन असतात आणि या गोष्टीचा आपण खूप तोरा मिरवतो. यात मग नेहमीची उदाहरणं म्हणजे ‘ज्याचा त्याचा प्रश्न’, ‘डॉ. तुम्हीसुद्धा’, ‘कुसुम मनाहेर लेले’ व तत्सम सामाजिक भान ठेवून आलेली अणि प्रेक्षकांच्या अभिरुचीला पात्र ठरलेली गहन नाटकं, पण मराठी रंगभूमीवर अलीकडच्या तीस वर्षांत गाजलेली नाटकं म्हणजे ‘ऑल द बेस्ट’, ‘सही रे सही’, ‘यदाकदाचित’ वगैरे. प्रामुख्याने ही नाटकं तुफान विनोदी होती आणि म्हणून ती लोकप्रिय झाली असा समज आहे, पण हा समज अत्यंत तुटपुंज्या विचारातून उद्भवलेला आहे. कारण ही सगळी नाटकं सभोवतालच्या समाजातल्या समस्यांवरच बेतलेली होती. फक्त औषधाच्या गोळीप्रमाणे शुगर कोटेड पिलप्रमाणे ती विनोदाच्या वेष्टनातून मांडली गेली होती. ही किमया खूप यशस्वी ठरते, पण ती जमावी लागते. जेव्हा माध्यमं मोजकी होती तेव्हा नाटक हे प्रबोधनाचं, गहन विचारमंथनाचं माध्यम मानलं जात होतं हे योग्य होतं. आता ही बहुसंख्य माध्यमं मनोरंजनाची साधनं झालेली आहेत. प्रेक्षकांचा हा बदलता दृष्टिकोन लक्षात घेऊन रंगभूमीवर बोधप्रद व मनोरंजक नाटकं येत आहेत ही चांगली गोष्ट आहे.

अशा पद्धतीच्या नाटकांचे बादशहा आहेत राजेश देशपांडे. कोकणी ब्रॅन्डची तिरकस विनोदबुद्धी लाभलेले राजेश देशपांडे आता बराच काळ या क्षेत्रात रुळलेले आहेत आणि प्रथितयश आहेत. समाजातल्या छोट्या मोठ्या समस्यांवर अत्यंत मनोरंजक मालिका ‘गंगूबाई नॉनमॅट्रिक’ ही त्यांची खरी ओळख. आज राजेश देशपांडे आपल्या समोर एक नवीन नाटक घेऊन आलेले आहेत- ‘ह्यांचं काय करायचं’ एका शहरापासून दूर असणार्‍या एका पिढीजात वाड्यात हे नाटक घडतं. देशपांडय़ांना जुने वाडे खूप प्रिय आहेत. त्यांच्या उमेदीच्या काळात कोकणातल्या एका जुन्या वाड्यात घडणार्‍या त्यांच्याच एका अत्यंत सीरियस एकांकिकेवरून त्यांनी ‘आलो रे बाबा’ हे तुफान गाजलेलं विनोदी नाटक लिहिलं होतं. ‘ह्यांचं काय करायचं’ हेही त्याची आठवण करून देणारं नाटक आहे. ‘ह्यांचं काय करायचं’चे मूळ लेखन विशाल कदम यांचं आहे. संहिता संस्करण, गीत अणि दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केलेलं आहे. लिखाणात हे नाटक एक उत्तम स्लॅपस्टिक कॉमेडी म्हणता येईल. आता प्रश्न असा की, स्लॅपस्टिक बाजाला लिखाण महत्त्वाचं असतं का? तर निश्चित असतं. याचं कारण की, बाज स्लॅपस्टिक असला तरी मुळात ते नाटक असतं आणि पात्रांचा व्यवस्थित परिचय, घटनांचा चढता क्रम अणि संवादांची पेरणी योग्य असल्याशिवाय स्लॅपस्टिक काय, कोणताही बाज नाटकात उभा राहू शकत नाही. तसं ‘ह्यांचं काय करायचं’मध्ये हे बेसिक्स उत्तम प्रकारे साधले गेले आहेत. तसं आहे म्हणून मग नाटक उभं करताना स्लॅपस्टिक फॉर्ममध्ये खूप शक्यता निर्माण होतात. ‘ह्यांचं काय करायचं’ पाहताना आपल्याला सतत हे नाटक तालीम करताना अधिक फुलत गेलंय याचा प्रत्यय येत राहतो. ही या नाटकाची सर्वात जमेची बाजू आहे. कदम आणि देशपांडे यांनी नाटकात जबरदस्त एनर्जी ठासून भरलेली आहे. दिग्दर्शनात देशपांडे आपले सगळे हातखंडे वापरतात आणि ‘ह्यांचं काय करायचं’ बहारदार करतात.

हे नाटक ज्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीचं नाटक हे खरं तर नटांचं नाटक असतं, पण देशपांडे स्वतः एक उत्तम नट आहेत हे ते आजही अधूनमधून दाखवून देत असतात. त्यामुळे ‘ह्यांचं काय करायचं’ एका वेगळ्याच पातळीवर फुलत जातं. वानगीदाखल नाटकात पोपटराव जाधव हे पात्र आहे. पात्राचा भडकपणा दाखवण्यासाठी मंगल केंकरे यांनी या पात्राला भडक हिरवा वेष दिलाय आणि हातात सारखा वापरला जाणारा गडद लाल रंगांचा मोबाईल. आता दिग्दर्शन कौशल्य म्हणजे नाटकातल्या बुद्धिबळाच्या खेळात जिथे बाकीची पात्रं फुटबॉलच्या चाली घेऊ लागतात तिथे पंच बनलेला पोपटराव लाल फोन रेड कार्ड म्हणून वापरून त्या पात्राला बाद ठरवतो. हे अफलातून आहे.

‘ह्यांचं काय करायचं’मध्ये पात्ररचना कमाल आहे. समीर चौघुले हा अतरंगी कलाकार चौरंगी भूमिका भन्नाट साकारतो. बाज बदलण्याचा त्याचा स्पीड केवळ अशक्य वाटावा असाच आहे. आपल्याला असं वाटेपर्यंत विशाखा सुभेदार ही त्याहीपेक्षा आणखी काय काय शक्य आहे दाखवून जाते. या दोघांनी ‘ह्यांचं काय करायचं’ हे नाटक अक्षरशः आपल्या खांद्यावर पेललं आहे. दुसर्‍या अंकातील अकबर अनारकलीच्या प्रसंगात तर समीर अणि विशाखा यांनी कहर केलेला आहे. पंढरीनाथ (पॅडी) कांबळे हे सतत या दोन विनोदी मल्लांमध्ये रेफरीच्या भूमिकेत आहेत. मूर्च्छित पडलेला पॅडी विशाखाने फुंकर मारल्यावर पान फडफडावं तसा फडफडतो ते केवळ पाहण्यासारखं आहे. कलाकार जेव्हा परफेक्ट कास्ट होतात तेव्हा नाटक कसं रंगतं याचं उदाहरण म्हणजे ‘ह्यांचं काय करायचं’ आहे.

प्रदीप मुळ्ये यांनी ‘हॅम्लेट’नंतर इथे पुन्हा दुमजली सेटचं नेपथ्य केलंय. वाडा दाखवायला ते खूपच प्रभावी आहे. अजित परब यांनी ‘ह्यांचं काय करायचं’ नाटकाला साजेसं संगीत दिलेलं आहे. नाटक विनोदांच्या कारंज्यातून उत्तरोत्तर फुलत जातं आणि अगदी शेवटी सगळ्याचा मथितार्थ आपल्या पुढ्यात मांडतं. आजच्या डायनॅमिक समाजात जिथे नोकरी-व्यवसायाकरिता स्थलांतर करणं क्रमप्राप्त झालंय तिथे मागे राहणार्‍या आप्तस्वकियांच्या एकटेपणाचं काय करायचं म्हणून ‘ह्यांचं काय करायचं’. अमेय विनोद खोपकर प्रॉडक्शन्सकरिता निर्माती स्वाती खोपकर यांनी एक चांगलं मनोरंजक नाटक या हंगामात रंगमंचावर आणलेलं आहे. एकंदरीतचं ‘ह्यांचं काय करायचं’ हे नाटक सामाजिक भान ठेवून उत्तम स्लॅपस्टिक मनोरंजन करणारं नाटक आहे.

नाटक        ह्यांचं करायचं काय

सादरकर्ते    अमेय खोपकर

निर्माती     स्वाती खोपकर

लेखक        विशाल कदम

नेपथ्य        प्रकाश-प्रदीप मुळये

संगीत        अजित परब

वेशभूषा      मंगल केंकरे

संहिता, गीत    दिग्दर्शन राजेश देशपांडे

कलाकार     विशाखा सुभेदार, समीर चौघुले, पॅडी कांबळे

दर्जा                 ***

आपली प्रतिक्रिया द्या