कॉपर इरिडीयम राइस पुलिंगच्या नावाने फसवाफसवी

864

रेडिएशनची शक्ती असणारे आणि शास्त्रज्ञांकडे मोठी मागणी असलेले, इतकेच नाही तर लाखो रुपयात खरेदी करून ते कोटय़वधी किमतीला सहज विकता येईल असे कॉपर इरिडीयम राइस पुलिंग या दुर्मिळ धातूच्या नावाने नागरिकांची फसवाफसवी करणारी टोळी गुन्हे शाखेच्या हाती लागली आहे. आरोपींकडून साधे तांब्याचे भांडे हस्तगत करण्यात आले आहे.

कॉपर इरिडीयम राइस पुलिंग हा दुर्मिळ धातू बनवून तो बाजारात विकल्यास मोबदल्यात मोठा आर्थिक फायदा होतो असे सांगत खोटे करारनामे बनवून ते खरे असल्याचे भासवायचे आणि त्याआधारे नागरिकांना लाखो रुपयांचा चुना लावणारी टोळी आग्रीपाडा येथे येणार असल्याची खबर युनिट-2 ला मिळाली. त्यानुसार प्रभारी निरीक्षक संजय निकुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्जुन जगदाळे, एपीआय संतोष साळुंखे, गणेश केकाण तसेच पटेल, बेळणेकर, निंबाळकर, मिश्रा, सोनावणे या पथकाने सात रस्ता परिसरात सापळा रचला. त्यानंतर तिघे भामटे तेथे येताच पथकाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्याकडे तांब्याच्या धातूपासून बनवलेले भांडे मिळाले. सलीम हश्मतअली खान (47), मोहम्मद शरीफ युनूस अन्सारी (45) आणि करीम रजाक सय्यद (36) अशी आरोपींची नावे आहेत.

विशिष्ट केमिकलने धातूची निर्मिती
एका विशिष्ट प्रकारच्या केमिकलचा वापर करून तांब्याचे धातूमिश्रित भांडय़ापासून कॉपर इरिडीयम राइस पुलिंग हा दुर्मिळ धातू तयार केला जातो. त्यामध्ये रेडिएशनची शक्ती असते व त्या भांडय़ास बाजारात खूप किंमत असते. या धात्tैला शास्त्रज्ञांकडे चांगली मागणी असून उपग्रह तयार करण्यासाठीदेखील त्याचा वापर होतो, असे सांगून आम्ही संबंधिताला मोबाईलमध्ये भाभा परमाणु अणुसंधान केंद्राची माहितीपत्र दाखवतो. इतकेच नाही तर संबंधित व्यक्ती ते धातू घेण्यास तयार झाल्यावर त्याच्याशी बनावट करारनामेदेखील बनवतो असे आरोपींनी चौकशीत सांगितले.

दोन दिवसांत धातू बनवा
तांब्याच्या भांडय़ामध्ये केमिकल टाकून दोन दिवस धातूचे भांडे बनविण्याचा प्रयोग करून आरोपी दाखवतात. पण सदर भांडय़ामध्ये रेडिएशन पॉवर आली नाही. रेडिएशन पॉवर आणण्यासाठी आणखी केमिकल खरेदी करावे लागेल असे सांगून ते संबंधिताकडे आणखी पैशांची मागणी करतात व लाखो रुपये उकळतात.

आपली प्रतिक्रिया द्या