सिंधुदुर्गासह कुडाळ तालुक्यात उच्चांकी भात खरेदी; सिंधुदुर्गात 82 हजार 259, कुडाळमध्ये 26 हजार 632 क्विंटल खरेदी

खरीप पणन हंगाम 2020-21 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 82 हजार 259 क्विंटल भात खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये कुडाळ तालुक्यात सर्वांधीक भात खरेदी झाली आहे. कुडाळमध्ये 11 भात खरेदी केंद्रांमधून एकूण 26 हजार 632 क्विंटल भात खरेदी झाली आहे. जिल्ह्यात गतवर्षी 36 हजार 882 क्विंटल भात खरेदी करण्यात आली होती. मात्र यावर्षी भात पिकाचे उत्पन्न वाढवून जास्तीत जास्त भात खरेदी होऊन शेतकऱ्यांना याचा लाभ होण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी प्रयत्न केले होते.त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून सिंधुदुर्ग बरोबरच कुडाळ तालुक्यात उच्चांकी भात खरेदी झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हयात भात पीक हे प्रमुख पीक असून यांत्रिकीकरणाद्वारे भात लावणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. शेतकऱ्यांना भात पिकातून अधीकाधीक उत्पादन घेण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी आणलेल्या चांदा ते बांदा योजनेतून कृषी यांत्रिकिकरण अंतर्गत शेतकऱयांना शेती अवजारे सबसिडीतुन मिळवून देण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी प्रयत्न केले होते. शेती अवजारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात भात लागवड करून उत्पादन घेतले. या भात उत्पादनासाठी खरेदी केंद्रे निश्चित करून लवकरात लवकर भात खरेदी केंद्रे सुरु करणे तसेच शासनाकडून भात पिकाला जास्तीत जास्त हमीभाव व बोनस मिळवून देणे यासाठी वैभव नाईक यांनी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी व शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्यामुळे 2020-21 मध्ये ऑक्टोबर महिन्यापासून भात खरेदीला सुरुवात करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात खरेदीसाठी प्रत्येक तालुक्यात शेतकरी संघ आणि सोसायटीच्या ठिकाणी एकूण 35 भात खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली होती. शासनाने हमीभावात 53 रुपयांची वाढ केली असून 1868 रुपये हमीभाव देण्यात येत आहे. तसेच बोनस स्वरूपात 700 रुपये देण्यात येणार असून एकूण 2568 रुपये दर शेतकऱ्यांना दिला जात आहे. जिल्ह्यात एकूण 15 कोटी 36 लाख 60 हजार रुपयांच्या भात खरेदीची नोंद झाली आहे. त्यातील 11 कोटी रुपये शासनाकडून जमा झाले आहेत. याव्यतिरिक्त बोनसची रक्कम मिळणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 6 हजार 890 तर कुडाळ तालुक्यातील 1 हजार 889 शेतकऱ्यांनी भात विक्री केली आहे. कुडाळ शहरातील भात खरेदी केंद्रावर 9 हजार 63 क्विंटल भात खरेदी झाली तर निवजे सारख्या ग्रामीण भागातील भात खरेदी केंद्रावर 3 हजार 905 क्विंटल भात खरेदी झाली. दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांमुळे कुडाळ येथे साकारलेल्या बजाज राईस मिलमार्फतही शेतकऱ्यांकडून भाताची खरेदी करण्यात आली. बजाज राईस मिलने थेट शेतकऱ्यांमार्फ़त भात खरेदी करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी प्रयत्न केले होते. त्याला देखील पालकमंत्र्यांकडून मान्यता देण्यात आल्याने बजाज राईस मिलमार्फत खरेदी केंद्रे निश्चित करून थेट शेतकऱ्यांकडून भाताची चांगली उचल करण्यात आली, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी एन.जी.गवळी यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या