
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाची आध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन आणि त्यांच्या पत्नी जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते किशोरी यांचा गणेशाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्ट’चे बाप्पा मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात ‘रत्नमहाला’त विराजमान झाले. प्रेरणादायी आध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते दुपारी दीडच्या सुमारास मंत्रोच्चारात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दरवर्षीच्या प्रथा-परंपरेप्रमाणे सकाळी सव्वाआठच्या सुमारास ट्रस्टचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन व जान्हवी धारिवाल-बालन या दाम्पत्याच्या हस्ते रंगारी भवनात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची विधिवत पूजा व आरती झाली. त्यानंतर आढाव बंधूंचे नगारावादन झाले. आकर्षक फुलांनी आणि केळीच्या पानांच्या खुंटांनी सजविलेल्या पारंपरिक रथात बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी भवन परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते.
गतवर्षीप्रमाणे यंदाही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचा मिरवणूक रथ उत्सवप्रमुख पुनीत बालन यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी हाताने ओढण्याची सेवा केली.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला मी सलग दुसऱ्या वर्षी येत आहे. याठिकाणी भक्ती आणि देशभक्ती या दोन्हींचा संगम आहे. यावर्षी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा मान मला मिळाला. मला निमंत्रित केल्याबद्दल मी पुनीत बालन यांची आभारी आहे. गणेशोत्सवाचा आनंद घेताना आपला धर्म, आपली संस्कृती, देशभक्ती जिवंत ठेवायची आहे हे लक्षात असू द्या. हे उत्सव त्याचे प्रतीक आहे. आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा.
जया किशोरी, प्रेरणादायी
आध्यात्मिक वक्त्या