दार्जिलिंगमध्ये ‘ऋचा घोष स्टेडियम’

हिंदुस्थानी महिला क्रिकेटची स्टार ऋचा घोषच्या नावाने लवकरच एक क्रिकेट स्टेडियम निर्माण केले जाणार आहे. असा मान मिळवणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ऐतिहासिक घोषणा करताना दार्जिलिंगमध्ये उभारण्यात येणाऱ्या नव्या क्रिकेट स्टेडियमला ‘ऋचा घोष क्रिकेट स्टेडियम’ असे नाव देण्यात येणार असल्याचे सांगितले.

केवळ 22 वर्षांच्या ऋचाने 2025 महिला विश्वचषकात हिंदुस्थानला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. या नामकरणाद्वारे तिच्या संघर्ष, प्रतिभा आणि यशाचा गौरव करण्यात आला आहे.

ममता बॅनर्जींचे भावनिक भाषण

कोलकात्यातील एका भव्य सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘‘ऋचा घोष ही फक्त 22 वर्षांची असली तरी तिनं संपूर्ण देशाला अभिमानानं भारून टाकलं आहे. बंगाल सरकारला हवं आहे की भावी पिढय़ा तिच्या कष्ट आणि आत्मविश्वासातून प्रेरणा घेतील.’’

त्या म्हणाल्या की, दार्जिलिंगमध्ये तब्बल 27 एकर जागेवर आधुनिक सुविधांनी सुसज्ज असं हे स्टेडियम उभारलं जाणार आहे. नगरपालिकेला या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

विश्वचषकातील ऋचाचा जलवा

2025 महिला विश्वचषकात ऋचाने अनेक निर्णायक डाव साकारले. विशेषतः दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 94 धावांची खेळी ही तिच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली. त्या सामन्यात हिंदुस्थानची अवस्था 6 बाद 102 अशी गंभीर होती, पण ऋचाच्या फलंदाजीने सामन्याचं पारडं हिंदुस्थानकडे झुकवलं.

 भविष्यातील हिंदुस्थानी कर्णधार

माजी हिंदुस्थानी कर्णधार सौरभ गांगुलीने ऋचामध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि शिस्त या तिन्ही गोष्टी आहेत. ती भविष्यात हिंदुस्थानी महिला संघाची कर्णधार बनेल, याबद्दल मला शंका नाही, असे मत व्यक्त केले.

 सिलीगुडीत नायिकेचे स्वागत

नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर 2 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 52 धावांच्या ऐतिहासिक विजयानंतर जेव्हा ऋचा आपल्या सिलीगुडी शहरात परतली, तेव्हा तिचं स्वागत जणू एखाद्या विश्वविजेत्या नायिकेसारखं करण्यात आलं. हजारो चाहत्यांनी रस्त्यावर उतरून ‘ऋचा! ऋचा!’ अशा घोषणांनी शहर दुमदुमवलं. या वेळी क्रिकेट बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सौरभ गांगुली आणि दिग्गज झुलन गोस्वामी उपस्थित होते. राज्य सरकारच्या वतीने ऋचाला ‘बंगा भूषण’ पुरस्कार, सोन्याची साखळी आणि डिप्टी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस (डीएसपी) पदाने गौरवण्यात आले. गांगुली आणि झुलन यांनी तिला सोन्याचा मुलामा चढवलेली बॅट आणि बॉल भेट दिली.