उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून तापमान सुमारे 35 ते 38 अंशापर्यंत पोहचले आहे. त्याचा आंबा-काजूवर विपरीत परिणाम झाला आहे.फळगळती मोठ्या प्रमाणात होत आहे. आंबा उत्पादन कमी असताना बागायतदारांना आणखी नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तापमान वाढीमुळे होणार्या आर्थिक नुकसानीचे चटकेही बागायतदारांना सहन करावे लागणार आहेत.
परिसरातील बागांमध्ये फळगळती आणि आंबा फळ करपण्याचे प्रमाण वाढले आहे.तापमानवाढीने होणारी फळगळती रोखण्यासाठी झाडांना पाणी देण्यासारख्या उपाययोजना शेतकरी-बागायतदार करीत आहेत. मात्र आधीच आंबा उत्पादन कमी त्यामध्ये वाढत्या तापमानामध्ये होणार्या फळगळतीची भर अशा स्थितीमध्ये होणारे नुकसान रोखण्यासाठी किती दिवस आणि किती झाडांना असा पाणीपुरवठा करायचा? असा प्रश्न त्यांना सतावत आहे.
या सार्यामध्ये तापमानवाढीने होणारी फळगळती आणि फळ करपण्यातून सुमारे दहा ते पधरा टक्के नुकसानीचा तडाखा बसण्याची शक्यता बागायतदारांकडून वर्तविली जात आहे. सकाळी थंडी आणि दुपारी कडक ऊन हा वातावरणातील बदलाचा फटका बागायतदारांना बसला आहे.
वांझ मोहोरामुळे रखडलेली फळधारणा, तुडतुड्यांचे जास्त प्रमाण, प्रतिकूल हवामान अशा स्थितीतही तयार झालेला आंबा टिकविण्यासाठी बागायतदारांनी औषध फवारणीसाठी मोठ्याप्रमाणात खर्च केला आहे. कलमावर कुठे कैरी दिसायला लागली आणि उष्णतेच्या लाटेने फळगळती आणि फळ करपू लागले. आता फळगळती रोखण्यासाठी झाडांना पाणी देण्याच्या खर्चाची भर पडल्याने आंबा बागायतदारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
“गेल्या काही दिवसांतील वाढलेले तापमान आणि प्रतिकूल वातावरणाचा आंबा उत्पादनावर परिणाम होवून आंबा फळ करपणे आणि फळगळती सुरू झाली आहे. गतवर्षीही वाढलेल्या तापमानाचा प्रतिकूल परिणाम होवून आंबा फळगळती आणि फळभाजणी झाली होती. त्यातून बागायतदारांना आर्थिक नुकसानीचा फटका बसला होता.यंदाही वातावरणात तीच स्थिती निर्माण झाल्याने आम्हाला नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.याचा सकारात्मक विचार होवून शासनाने बागायतदारांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी. ” – राजेश शिंदे, आंबा बागायतदार
























































