नद्यांचा विकास करताना झाडांचा बळी देऊ नका; आदित्य ठाकरे यांची मागणी

पुण्यातील मुळा-मुठा नदीचा विकास करताना सहा हजार झाडे कापण्याचा प्रस्ताव आहे. त्याशिवाय नदीच्या दोन्ही बाजूला काँक्रीटीकरण सुरू आहे. वास्तविक नद्यांनी मोकळा श्वास घेणे गरजेचे आहे. नद्यांचा विकास करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही बाजू ऐकून निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत केली.

माहितीच्या मुद्दय़ावर बोलताना त्यांनी पुण्यातील नदी विकास कार्यक्रमाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, पुण्यातील नदी विकास कार्यक्रमासाठी सहा हजार झाडे कापली जाणार आहेत. मागील वर्षी नदीच्या विकासाचा हा विषय माझ्याकडे आला होता. नदीच्या विकासाचा कार्यक्रम आपल्या सर्वांना पाहिजे. पुण्याच्या मुळा-मुठा नदीसाठी सुशोभीकरण व स्वच्छता पाहिजे, पण मुळात या परवानग्या घेतल्या त्यात काही त्रुटी आलेल्या आहेत. आता सहा हजार झाडे कापण्याचे प्रस्तावित आहे. सर्व झाडे वाचवू असे सांगितले होते. झाडे कापणार नाहीत असे नमूद केले होते. नदीपात्राच्या दोन्ही बाजूने काँक्रीटीकरण सुरू झालेले आहे. एखादे शहर किंवा गाव नदीच्या काठी वसते तेव्हा नदीचा नाला व नाल्याचे गटार होते. नद्यांचे रुंदीकरण, खोलीकरण, काँक्रीटीकरण करण्याचा प्रयत्न करतो, पण मुळात नद्यांनी मोकळा श्वास घेणे गरजेचे असते. झाडे कापण्याचा विषय असेल किंवा राडारोडा आजूबाजूला टाकण्याचा विषय असेल, अशा वेळाला नदीचा स्विमिंग पूल होऊ नये यात आपण लक्ष द्यावे. जर नदीचा स्विमिंग पूल किंवा काँक्रीटीकरण झाले तर त्या ठिकाणी पूर येण्याची शक्यता आहे. या ठिकाणी जुनी मंदिरे पाण्याखाली जाणार आहेत. अकरा पूल पाण्याखाली जाणार आहेत. यावर मोठा खर्च होणार आहे. शहरासाठी काम दीर्घ काळासाठी व चांगले व्हावे ही इच्छा आहे. यावर उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी. दोन्ही बाजू ऐकून निर्णय घ्या, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या माहितीची सरकारने नोंद घ्यावी आणि उचित उपाययोजना करावी, असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.