मंडणगडमध्ये कोसळत असलेल्या पावसामुळे तुळशी माहु घाटात ठिकठिकाणी दरडी रस्त्यावर कोसळून रस्ता बंद होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे मंडणगड देव्हारे बाणकोट वेळास तसेच दापोली तालूक्यातील मांदिवली केळशी आडे उटंबर मार्गाकडील पूणे मुंबई शहराकडे जा ये करणाऱ्या प्रवाशांसह या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांचा चांगलाच खोळंबा होत आहे.
लोणंद राजेवाडी ते आंबडवे दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव असलेल्या आंबडवे या गावाला जोडणारा देशातील एक महत्वाचा नव्याने राष्ट्रीय महामार्ग तयार होत आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या चार वर्षांपासून अगदी धिम्या गतीने सुरू आहे. हा मार्ग मंडणगड तालूक्यातील म्हाप्रळकडून शेनाळे शिरगाव धुत्रोळी भिंगळोली मंडणगड शहर मार्गे पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळ गावी आंबडवे येथे जातो. राष्ट्रीय महामार्ग तयार करण्याचे काम सुरू असलेल्या या मार्गावर मंडणगड शहर सोडल्यावर माहू आणि तुळशी घाट लागतो. अगदी तीव्र चढ उताराचा रस्ता असलेला हा मार्ग डोंगर घाट माथ्यातून जात असून महामार्गाचे काम करताना डोंगर खोदण्यात आल्याने या खोदलेल्या डोंगराची माती तसेच मोठ मोठाले दगड हे रस्त्यावर कोसळून येत असल्याने आधीच रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण होत आहे. त्यात भर म्हणजे दरडी कोसळण्याचा वाढलेला प्रकारांमुळे रस्त्यावर कोसळणाऱ्या दरडी मोकळया करे पर्यंत वाहन चालकांना थांबून राहावे लागत आहे.त्यात कधी पुन्हा रस्त्यावर दरड कोसळेल याचा भरवसा नसल्याने येथून प्रवास करणे तसे धोक्याचेच झाले आहे.
दापोली तालूक्यातील बोरथळ, लोणवडी, इळणे, वाघिवणे, माळवी, शिवाजीनगर, आडे, पाडले, उटंबर, आतगाव, रोवले उंबरशेत, आंबवली बुद्रुक, केळशी, रावतोली, कवडोली वांझळोली, आमखोल मांदिवली या गावांसह मंडणगड तालूक्यातील चिंचघर, जावळे, आंबवली, खार, साखरी, वेळास, बाणकोट, वेसवी, वाल्मिकिनगर, नांदगाव, कांटे, केंगवळ, रानवली, गुडेघर, पन्हळी, उमरोली, वेरळ, धामणी, गोठे, गोकुळगाव, नायणे, शेवरे, वडवली, ताम्हाणे, कोन्हवली, देव्हारे केरीळ, पाले, तुळशी आदी अनेक गावांना हा सोयीचा व जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर दुचाकी, तीन चाकी चार चाकी वाहनांसह अवजड वहाने तसेच एस.टी महामंडळाच्या बसेस सतत धावत असतात. अषा या वर्दळीच्या मार्गावर दरड कोसळण्याचा वाढलेला प्रकार हा एकुणच प्रवासी वाहतुकीसह व्यापारी वाहतुकीला खो बसवणारा ठरला आहे.