‘मिरची पावडर’ गँगचा धुमाकूळ, चाळीस तोळे सोने लुटले

1171
gold

मांजरी येथील एका ज्वेलर्सच्या डोळ्यात मिरची पावडर (पूड) टाकून तीन जणांनी चारशे ग्रॅम म्हणजेच चाळीस तोळे सोने आणि दोन किलो चांदी असा वीस लाख रुपयांचा ऐवज लुटला. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता नेवासा तालुक्‍यातील पानेगाव-खेडले परमानंद रस्त्यावर ही घटना घडली.

निखिल बाळासाहेब अंबिलवादे असे लुट झालेल्या सुवर्णकाराचे नाव आहे. मांजरी येथील ज्वेलर्स दुकान बंद केल्यानंतर दुकानातील सोन्या-चांदीचा ऐवज घेऊन निखिल अंबिलवादे दुचाकीवरून घराकडे चालले होते. पानेगाव- खेडले परमानंद रस्त्यावर चेहरा कापडाने बांधलेल्या तिघा जणांनी निखिल यांना अडविले. त्यांच्या डोळ्यात एका चोरट्याने मिरची पूड टाकली. त्यांच्याकडील 400 ग्रॅम सोने, दोन किलो चांदी असा वीस लाख रुपयांचा ऐवज लुटून चोरटे दुचाकीवरून पसार झाले.

श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस उपाधीक्षक मंदार जावळे, राहुरीचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, नेवासाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे तातडीने घटनास्थळी पोहोचले. राहुरीचे एक, सोनईचे दोन व नेवासाचे एक अशी चार पोलीस पथके चोरट्यांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. पाळत ठेवून ही लूट झाली असण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

चोऱ्या पुन्हा वाढल्या

मध्यंतरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रस्तालूट, चोऱ्या, दरोडे होत होते. परंतु पोलिसांनी बहुतांशी टोळ्या जेरबंद केल्या होत्या. त्यामुळे त्या घटनांना आळा बसला होता. मात्र, अलिकडे या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांना एकप्रकारे आव्हान आहे. राहुरी रस्त्यावर विशिष्ट लोक चोऱ्या करतात. पोलिसांना हे वेळोवेळी आढळले आहे. त्या दृष्टीने तपास केला जाणार असल्याचे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या