जालन्यात लॉकडाऊनदरम्यान 16 दुकाने फोडणारी टोळी गजाआड

442

लॉकडाऊनदरम्यान जालना शहरातील16 दुकाने फोडणारी व एक जबरी चोरी केलेल्या टोळीला अटक करुन 75 हजारांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे. लॉकडाऊन दरम्यान जालना शहरातील मुख्य बाजार पेठेतील दुकाने फोडण्याचे प्रकार घडले होते. या गुन्ह्यातील आरोपींबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना त्यांच्या खबऱ्यायामार्फत माहिती मिळाली. जालना शहरात घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार सचिन बापू गायकवाड( रा. कैकाडी मोहल्ला, जुना, जालना), राम सखाराम निकाळजे (रा. जवाहर बाग, जालना), एक विधी संघर्षग्रस्त बालक असे तिघे जण कैकाडी मोहल्ला व जवाहर बाग परिसरात थांबलेले असल्याची माहिती त्यांना मिळाली.

मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने एक पथक तयार करुन या आरोपीला ताब्यात घेत विचारपूस करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीदरम्यान या आरोपीने एका साथीदारासह 18 एप्रिल रोजी शहरातील दवा मार्केट, जालना येथील वरद ड्रेसेस, मराठवाडा कृषी सेवा केंद्र, श्रीनिवास एजन्सी, राज एजन्सी आयुर्वेदिक होलसेल, सत्यनारायण ट्रेडर्स, जुना मोंढा, ऋषी किराणा, प्रविण शर्मा यांचे शॉप नं. 95 असे 7 दुकाने तसेच फुले मार्केट येथील साई मोबाईल शॉपी, माऊली किराणा, गजानन किराणा, भोकरदन नाका ते नवीन मोंढा रोड येथील साईराम डेली निड्स, प्रतिक अ‍ॅग्रो एजन्सी, पान टपरी, जुना मोंढा येथील सतिष ट्रेडर्स, पराग शेतकरी गोडावून अशा 16 दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी दोन आरोपी व विधी संघर्षग्रस्त बालकाच्या ताब्यातून 6 गुन्ह्यातील 72 हजार 5०० रुपयांचा मु्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या आरोपींची कसुन चौकशी करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, दुर्गेश राजपूत, सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाड, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, सचिन चौधरी, रंजित वैराळ, विलास चेके, हिरामण फलटणकर, रवि जाधव, पुनम भट्ट, सुरज साठे, पैठणे यांनी पार पाडली.

आपली प्रतिक्रिया द्या