श्रीगोंद्यात पुन्हा सशस्त्र दरोडा; नऊ तोळ्यांचे दागिने लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दरोडेखोरांच्या हल्ल्यात एका शेतकऱयाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बेलवंडी पोलिसांच्या हद्दीतील राजापूर शिवारात आज पुन्हा एकदा दरोडय़ाची घटना घडली असून, नऊ तोळ्यांचे दागिने आणि 30 हजारांची रोकड दरोडेखोरांनी लंपास केली आहे. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाला आहे. शंकर लहानू गाडेकर (रा. बोरी फाटा, राजापूर, ता. श्रीगोंदा) असे जखमी शेतकऱयाचे नाव आह़े

शंकर गाडेकर हे बुधवारी रात्री घराबाहेर, तर त्यांची पत्नी जनाबाई घरात झोपल्या होत्या. मध्यरात्री दरोडेखोरांनी शंकर गाडेकर यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर दरोडेखोरांनी घराचा दरवाजा उघडून जनाबाई यांना आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी देत नऊ तोळ्यांचे दागिने आणि 30 हजार रुपये घेऊन पोबारा केला. तोंडाला रुमाल बांधलेले दरोडेखोर हिंदी आणि मराठी भाषा बोलत होते. त्यांनी गाडेकर यांच्या आजूबाजूच्या घरांना बाहेरून कडी लावून वायरने बांधले होते. या घटनेची माहिती मिळताच बेलवंडीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे यांच्यासह पोलिस पथक, श्वानपथक, ठसेतज्ञांनी घटनास्थळी पाहणी केली. दरम्यान, 13 मार्चच्या मध्यरात्री चोरटय़ांनी सशस्त्र्ा दरोडा टाकला होता. यात कल्याण गायकवाड यांचा खून झाला होता. गायकवाड यांच्या घरापासून अवघ्या सहा किलोमीटरच्या अंतरावर दरोडय़ाची दुसरी घटना घडली आहे.