कवठे येमाईत चोरांचा धुमाकूळ, एका रात्रीत ४ रोहित्रे फोडली

584

शिरूरच्या पश्चिम भागात चोरांनी धूमाकुळ घातला आहे. चोरट्यांनी एका रात्रीत 4 वीज रोहित्रे फोडली. यातील 3 रोहित्रे साबळेवाडी येथे तर रोहिलवाडीतील एक विजेचे रोहित्र गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास फोडण्यात आले. त्यातील तांब्याच्या महागड्या कॉईल चोरट्यांनी लंपास केल्या. तर या चोरीच्या घटनेत महावितरणचे सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज टाकळी हाजीचे शाखा अभियंता दीपक पाचुंदकर यांनी व्यक्त केला आहे.

साबळेवाडी येथील शेतकरी दिपक साबळे,योगेश साबळे,संदिप साबळे,अमोल साबळे,सुरेश साबळे हे आपल्या मोटारी चालू करण्यासाठी घोडनदीवर गेले होते. त्यावेळी नदी काठावरील माहावितरणच्या 3 विद्युत रोहित्रांची चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तर रोहिलेवाडीत एक रोहित्र फोडून त्यातील किमती साहित्य चोरून नेले असल्याचे स्वप्नील घोडे यांनी सांगितले. त्यातच साबळेवाडी येथील शेतकरी दिपक विठ्ठल साबळे यांची वीज पंपाची तांब्याची केबलही या चोरट्यांनी चोरून नेली. या रोहित्रांमधील तांब्याचे किमती साहित्य चोरून नेत त्यातील ऑइल जागेवरच ओतून दिले. तसेच रोहित्रांची जागेवरच तोडफोड केली. यात 25 केव्हीच्या 2 व 100 केव्हीच्या 2 रोहित्राचे सुमारे 6 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पाचुंदकर म्हणाले. शिरूरच्या पश्चिम भागात मागील काही दिवसांत झालेल्या वीज रोहित्रांच्या चोरीच्या घटनांमुळे शेतीचे वीज व पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या 6 ते 7 महिन्यातील ही 4 थी चोरीची घटना असून या पाठीमागे वीज डी पी चोरांची मोठी टोळी असण्याची शक्यता नागरिकांतून व्यक्त होत आहे. या चोऱ्यांचा तातडीने छडा लावावा व त्या सोकलेल्या व निर्ढावलेल्या डी पी चोरांचा पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या