ट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा

968

अमेरिकन काँग्रेसमध्ये (संसद) सात वेळेस खोटे बोलल्या प्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी व सल्लागार रॉजर स्टोन यांना कोलंबिया जिल्हा न्यायालयाने 40 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत गैरप्रकार झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या आरोपाप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली. रॉबर्ट मुलर यांनी एक चौकशी अहवाल तयार केला. त्याआधारे कोलंबिया जिल्हा न्यायाधीश ऍमी बर्मन जॅकसन यांनी रॉजर स्टोन यांना ही शिक्षा सुनावली.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार रॉजर स्टोन यांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये सात वेळेस खोटे विधान केल्यामुळे देशाची दिशाभूल झाली. त्याशिवाय काँग्रेस समितीच्या चौकशीतही त्यांनी अडथळे आणल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. कोर्टाने स्टोन यांना 40 महिन्यांचा तुरुंगवास, दोन महिन्यांचे प्रोबेशन आणि 20 हजार डॉलरचा दंड ठोठावला आहे.

रॉबर्ट मुलर यांच्या चौकशी अहवालात 2016मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष आणि रशिया यांच्यातील संबंधावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. रॉजर स्टोन यांना बरीचशी माहिती होती. मात्र त्यांनी ती दडवून ठेवत देशाची दिशाभूल केली असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. त्यांची कृती घटनेविरोधात असल्याचे त्यांनी सांगितले.

कोर्टाने शिक्षा सुनावल्यावर स्टोन यांच्या प्रवक्त्यांनी आता रॉजर स्टोन थेट राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे शिक्षा माफीसाठी अपील करू शकतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. या आठवडय़ाच्या प्रारंभी ट्रम्प यांनी 11 मोठय़ा प्रकरणांत दोषींना शिक्षा माफी जाहीर केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या