
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातून व विभागीय परीक्षा मंडळातून 10 वी 12 वीच्या परीक्षेत सर्वप्रथम आलेल्या इतर मागास प्रवर्गाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना स्वर्गीय वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 2018-2019 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी 12 वीच्या परिक्षेत राज्यातून व विभागीय परिक्षा मंडळातून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींना गुणवंत विद्यार्थी पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून राज्याच्या सर्व विभागीय परिक्षा मंडळातून 41 गुणवंत विद्यार्थ्यांना स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. यामध्ये संभाजीनगर विभागातून 10 वीसाठी परळीतील रोहन चंद्रशेखर फुटके याला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
रोहन चंद्रशेखर फुटके यास महाराष्ट्र शासनाच्या वतीने इतर मागास प्रवर्गाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात येणारा स्वर्गीय वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आल्याचे महाराष्ट्र शासन इतर मागास वर्ग,सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग,विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे आयुक्त यांनी परिपत्रकाद्वारे घोषित केले आहे. या पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह, 51 हजार रुपये रोख असे असून 24 मार्चला मुंबईतील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा पुरस्कार सोहळा होणार असल्याचे बीडचे समाजकल्याण अधिकाऱ्यांना कळवले आहे. रोहन फुटके हा येथील न्यू हायस्कूल शाळेतील विद्यार्थी असून तो शाळेतही सर्वप्रथम आला होता. या पुरस्काराबद्दल रोहनचे फुटके परिवारासह,सर्व नातेवाईक मित्रमंडळींनी अभिनंदन केले आहे.
































































