रोहिंग्या मुस्लिमांच्या मुद्द्यावरून एमआयएम आणि भाजपमध्ये जुंपली!

ओवेसी बंधू हैदराबादच्या विकासाचा नाही, तर केवळ रोहिंग्या मुस्लिमांचा विचार करतात. पालिका निवडणुकीसाठी एमआयएमकडून 30 हजार रोहिंग्यांची मतदार म्हणून नोंदणी करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी हे पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अपयश आहे. एवढे सगळे होईपर्यंत ते झोपा काढत होते का? असा टोला लगावला आहे.

ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि एमआयएममध्ये आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडू लागल्या आहेत. भाजप युवा मोर्चा अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांनी ओवेसी बंधू हैदराबादचा विकास कधीच करणार नाहीत. ते केवळ रोहिंग्या मुस्लिमांना हिंदुस्थानात प्रवेश देतील. ओवेसींना मिळणारं प्रत्येक मत हे हिंदुस्थानच्या विरोधात पडणार मत असेल, अशी टीका केली होती. तसेच मतदार यादीत मोठय़ा प्रमाणात रोहिंग्यांचा समावेश करण्यात आल्याचा आरोप प्रचारादरम्यान भाजप नेत्यांकडून केला जात आहे.

भाजपकडून करण्यात येणारे आरोप आणि टीकेला एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. द्वेष निर्माण करणे हाच भाजपाचा मुख्य हेतू आहे. या निवडणुकीलाही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. मतदार यादीमध्ये 30 हजार रोहिंग्यांची नोंद आहे तर केंद्रीय गृहमंत्री शहा काय करत आहेत? ते झोपा काढत आहेत का? 30 ते 40 हजार रोहिग्यांची नोंद मतदार यादीमध्ये कशी झाली याकडे लक्ष देण्याचे काम त्यांचे नाही का? भाजपाचे दावे खरे असतील तर त्यांनी ते सिद्ध करावे, असे आव्हान ओवेसींनी दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या