
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विमान सेवा देणाऱ्या ‘VSR’ कंपनीच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट केले जाते आणि चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केले जाते, मग जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का होत नाही? असा रोकडा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
‘कंपनीला टाळं लावायला हवं होतं’
रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘हाच न्याय VSR कंपनीलाही लावून आतापर्यंत गुन्हा दाखल करून कंपनीला टाळंही लावायला पाहिजे होतं. पण तसं होताना का दिसत नाही, हे न समजणारं कोडं आहे.’ सरकार या कंपनीवर कारवाई करण्यास का कचरत आहे, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.
मालकांच्या ‘वजना’वर प्रश्नचिन्ह
कंपनीवर कारवाई न होण्यामागे राजकीय दबाव किंवा संबंध असावेत असा इशारा देताना पवार म्हणाले, ‘कंपनीचा मालक आणि पार्टनर यांचं एवढं वजन आहे का, ज्यामुळं सरकारही त्यांच्यावर कारवाईला घाबरतं?’ देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, सेलिब्रिटी आणि सर्वपक्षीय राजकीय नेते या कंपनीची विमान सेवा वापरतात. त्यामुळे प्रवाशांसह पायलट आणि कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही, असेही त्यांनी नमूद केले.
तात्काळ बंदीची मागणी
निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅक लीस्ट केलं जातं.. चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं जातं, मग जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का नको? हाच न्याय VSR कंपनीलाही लावून आतापर्यंत गुन्हा दाखल करून कंपनीला टाळंही लावायला पाहिजे होतं. पण तसं होताना का दिसत नाही,…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 13, 2026
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना टॅग करत या कंपनीवर देशात सेवा देण्यास तातडीने बंदी घालण्याची विनंती केली आहे. प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.
rohit pawar slams govt over inaction against vsr aviation company
























































