AI च्या युगात नोकऱ्यांची शाश्वती संपली; ‘ओरॅकल’ कर्मचारी कपातीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी संकटाकडे वेधले लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘ओरॅकल’ने आपल्या जागतिक फेररचनेचा भाग म्हणून हिंदुस्थानातील सुमारे 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. जागतिक मंदीचे सावट आणि व्यवसायातील बदलांचे कारण देत कंपनीने जगभरातून आतापर्यंत एकूण 30 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. या मोठ्या कर्मचारी कपातीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, सध्याच्या अस्थिर रोजगार परिस्थितीवर भाष्य केले आहे.

रोहित पवार यांनी आपल्या ‘एक्स’ हँडलवर पोस्ट शेअर केली आहे. ते म्हणाले, सध्याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वेगवान युगात कोणाचीही नोकरी आता सुरक्षित राहिलेली नाही, असे परखड मत रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या ‘ओरॅकल’ने नुकत्याच घेतलेल्या कर्मचारी कपातीच्या निर्णयाचा दाखला देत रोहित पवार यांनी वाढत्या बेरोजगारीच्या संकटाकडे लक्ष वेधले आहे. तुम्ही कितीही जुने किंवा अनुभवी कर्मचारी असलात, तरी कोणत्याही क्षणी तुमच्या इनबॉक्समध्ये नोकरीवरून कमी केल्याचा ईमेल येऊ शकतो आणि तुम्ही बेरोजगार होऊ शकता, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

Oracle कडून हिंदुस्थानात सुमारे १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात

रोहित पवार यांनी आपल्या ‘एक्स’ हँडलवर पोस्ट शेअर करत म्हटले की, ओरॅकल कंपनीच्या ताज्या निर्णयाने नोकऱ्यांच्या असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर असलेला हा विषय आजच्या राजकीय गोंधळात कोणालाही दिसत नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. केवळ राजकारणात अडकून न पडता, आपल्याला या व्यवस्थेच्या विरोधात एकत्र येऊन लढावे लागणार आहे, याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. वाढत्या तंत्रज्ञानामुळे रोजगारावर होणारे परिणाम आणि त्याकडे होणारे राजकीय दुर्लक्ष यावर त्यांनी या माध्यमातून बोट ठेवले आहे.