जगज्जेतेपद त्या त्रिमूर्तींमुळेच; रोहित शर्माकडून स्तुतिसुमनांचा वर्षाव

दोन महिन्यांपूर्वी हिंदुस्थानने टी-20 वर्ल्ड कपचे जगज्जेतेपद संपादले. ते जेतेपद विराट कोहली किंवा जसप्रीत बुमराच्या अफलातून खेळामुळे पटकावले असेल तर तुम्ही चुकत असाल. या जगज्जेतेपदाचे श्रेय खुद्द कर्णधार रोहित शर्माने जय शहा, राहुल द्रविड आणि अजित आगरकर या त्रिमूर्तीला दिले आहे.

टी-20 वर्ल्ड कपच्या यशाच्या श्रेयाबद्दल रोहित शर्मा भरभरून बोलला. अमेरिका आणि विंडीजमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपदरम्यान माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी निकालाची चिंता विसरून खेळण्यासाठी सर्व खेळाडूंना पूर्ण स्वातंत्र्य दिले. त्यांच्या साथीमुळे हाच अद्भुत निकाल सर्वांसमोर येऊ शकला.

एका कार्यक्रमात वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळविल्यानंतर रोहितने वर्ल्ड कपच्या यशाबद्दल आपले अनुभव पुन्हा एकदा जगजाहीर केले. संघात बदल आणि निकालाची आणि आकडय़ांची पर्वा न करता सर्वांना आपला खेळ दाखवता यावा, हेच माझे स्वप्न होते आणि आम्हाला तसेच वातावरण लाभले. त्यामुळे आमचे सर्व खेळाडू स्वतंत्रपणे खेळू शकले. हीच खऱया अर्थाने गरज होती. जी मला हिंदुस्थानच्या द्रविड-शहा-आगरकर या त्रिमूर्तीने उपलब्ध करून दिली. मी जे काही केले ते माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होतेच, पण वेगवेगळय़ा वेळेला संघाच्या यशासाठी उभे राहिलेल्या खेळाडूंना विसरून चालणार नाही. त्याचमुळे आम्ही जगज्जेते ठरलो, असे रोहितने आवर्जून सांगितले

यशाची भावना अद्भुत

जगज्जेतेपदाची भावना मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. ती अशी भावना आहे, जी प्रत्येक दिवशी येऊच शकत नाही. जेव्हा आम्ही वर्ल्ड कपला गवसणी घातली तेव्हा तो क्षण आमच्या सर्वांसाठी संस्मरणीय होता. तो क्षण आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही. त्याचा आम्ही मनसोक्त आनंद लुटला. आमच्याबरोबर अवघ्या देशाने आनंद साजरा केला, त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. हा विजय जितका आमच्यासाठी महत्त्वाचा होता, तितकाच तो देशासाठीही महत्त्वाचा होता. ते जेतेपद घरी आणणे आणि सर्वांबरोबर त्याचा आनंद व्यक्त करून आम्ही धन्य झालो आहोत.