रांचीत हिटमॅनचा हंगामा, रोहित शर्माचे पहिले कसोटी द्विशतक

1005

टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने दिवाळीआधीच चौकार, षटकारांची आतषबाजी करीत रांचीत आपले कसोटीतले पहिले द्विशतक झळकावले. रोहित आणि अजिंक्य या मुंबईकरांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी क्रिकेट लढतीचा दुसरा दिवसही आपल्या शतकी खेळींनी गाजवला.

हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहितने वन डे प्रमाणे कसोटीतही आपल्या पराक्रमाचा झेंडा रोवताना 255 चेंडूंमध्ये 212 धावा कुटल्या. यात 6  षटकार आणि 28 चौकारांचा समावेश आहे. तिसऱ्यांदा रोहितने दीडशतकी खेळी केली आहे. याआधी 177 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात त्यानं ही खेळी केली होती. मुंबईकर रहाणेनेही 169 चेंडूमध्ये 14 चौकार आणि एक षटकार ठोकत आपल्या कारकिर्दीतील 11 वे शतक ठोकले.घरच्या मैदानावरील हे त्याचे चौथे तर तीन वर्षेनंतर फटकावलेले पहिले शतक आहे. दुसऱ्या दिवस अखेर पाहुण्या दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज वेगवान गोलंदाजीपुढे पार गळपटले. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अफलातून बाउंसरवर सलामीवीर डीन एल्गरला शून्यावरच तंबूत परतवले तर ,उमेश यादवने उसळत्या चेंडूवर क्विंटन डिकॉकला 4 धावांवरचतंबूचा रस्ता दाखवला. पाहुण्यांचा पहिला डाव 2बाद 9 अशा केविलवाण्या स्थितीत होता.ते अद्याप 488 धावांनी पिछाडीवर आहेत.

हिंदुस्थानने आपला पहिला डाव आपला पहिला डाव 497 धावांवर घोषित केल्यानंतर आफ्रिकेची सलामीची जोडी मैदानात आली. मात्र मोहम्मद शमी आणि उमेश यादव या वेगवान जोडीने  खेळपट्टीचा फायदा घेत उसळते चेंडू टाकत आफ्रिकेच्या फलंदाजांना हैराण केलं. अखेरीस डीन एल्गर आणि क्विंटन डी-कॉक हिंदुस्थानच्या  जाळ्यात अडकले. यानंतर पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला, यावेळी दक्षिण आफ्रिकेची अवस्था 2 गडी बाद 9 अशी झाली होती.   

षटकाराने शतक आणि द्विशतकही पूर्ण केले 

रोहितने 95 धावांवर असताना पिडीटच्या गोलंदाजीवर षटकार खेचत शतक झळकावलं. तर दुसऱ्या दिवशी उपहाराच्या सत्रानंतर एन्गिडीच्या गोलंदाजीवर षटकार खेचत आपलं पहिलं द्विशतक झळकावलं. या खेळीने एक अनोखा योगायोग साधला गेला आहे. कसोटी मालिकेत हिंदुस्थानी  फलंदाजाकडून झळकावलेलं हे तिसरं द्विशतक ठरलं आहे. एका कसोटी मालिकेत हिंदुस्थानच्या  3 फलंदाजांनी द्विशतक झळकावण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.रोहितने आपल्या द्विशतकी खेळीने हिंदुस्थानी क्रिकेटशौकिनाना दिवाळीची आगळी भेटच दिली.रहाणेने  दुसऱ्या दिवशी 69 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव घेऊन शतक साजरे केले, तर रोहित शर्मानं 199व्या चेंडूंवर एक धाव घेऊन दीडशे धावा पूर्ण केल्या. रोहितनं कसोटी कारकिर्दीतील पहिलं द्विशतक पूर्ण करण्यासाठी 249 चेंडू खेळून काढले. एन्गिडीच्या 88व्या षटकातील पहिल्या चेंडूवर त्यानं उत्तुंग षटकार ठोकून हे द्विशतक झळकावले. एका कसोटी मालिकेत दोन वेळा दीडशतकी खेळी किंवा त्यापेक्षा अधिक धावा रोहितने केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अशी कामगिरी करणारा रोहित पहिला फलंदाज आहे.चौथ्या विकेटसाठी रोहित-अजिंक्य जोडीने 267 धावांची भागीदारी केली. याव्यतिरीक्त तळातल्या फळीत हिंदुस्थानकडून  रविंद्र जाडेजा 51 तर उमेश यादवने दोन षटकारांची आतिषबाजी करत 31 धावा केल्या.    

रोहित कसोटीत षटकारांचे अर्धशतक, वेगाने झळकावणारा हिंदुस्थानी

रोहित शर्माने सर्वात कमी डावांत 50 षटकारांची आतषबाजी करणारा हिंदुस्थानी फकंदाज म्हणून आपल्या नावाची नोंद केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचा 46 कसोटी डावांत 50 षटकार ठोकण्याचा विक्रम अद्याप अबाधित आहे.   

षट्काराचे वेगवान अर्धशतक साकारणारे हिंदुस्थानी 

  • रोहित शर्मा  – 51 कसोटी डावांत
  • महेंद्रसिंह धोनी  – 78 कसोटी डावांत
  • वीरेंद्र सेहवाग – 92 कसोटी डावांत
  • कपिल देव  – 154  कसोटी डावांत
  • सौरभ गांगुली  – 161 कसोटी डावांत

रोहितकडून विक्रमांचा पाऊस 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या  मालिकेत रोहितनं तिसरे शतक झळकावले आहे. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 212 धावा करणाऱ्या रोहितच्या आता एकूण 529 धावा झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा हिंदुस्थानी  फलंदाज होण्याचा मान त्यानं मिळवला आहे. त्यानं माजी कर्णधार अझहरुद्दीनलाही मागे टाकले आहे. त्याच्या नावावर 388 धावा होत्या. रोहित शर्मानं या कसोटी मालिकेत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा, सर्वाधिक तीन शतके, सर्वाधिक चौकार आणि सर्वाधिक षटकार लगावण्याचा पराक्रम त्यानं केला आहे. आता 30 कसोटी सामन्यांत रोहितच्या नावावर एकूण सहा शतके नोंद झाली आहेत. तसंच 10 कसोटी अर्धशतकेही त्याने झळकावली आहेत.

रोहित महान सलामीवीरांच्या पंक्तीत 

कसोटीतील आपल्या द्विशतकी खेळीसह 500 धावांचा पल्ला पार करणारा रोहित शर्मा हा हिंदुस्थानचा पाचवा सलामीवीर फलंदाज ठरला आहे.आपल्या पराक्रमाने त्याने विनू मंकड, बुद्धी कुंदरन, सुनील गावसकर आणि वीरेंद्र सेहवाग या महान हिंदुस्थानी सलामीवीरांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. याशिवाय वन डे आणि कसोटी अशा दोन्ही प्रकारांत द्विशतक झळकावणारा रोहित जगातला चौथा फलंदाज ठरला आहे.याआधी असा पराक्रम सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि ख्रिस गेल या स्टार फलंदाजांनी केला आहे.   

संक्षिप्त धावफलक 

हिंदुस्थान पहिला डाव 9 बाद 497  घोषित

रोहित शर्मा  -255 चेंडूंत 212 ( 28 चौकार ,6 षटकार ) ,अजिंक्य रहाणे 192 चेंडूंत 115 (17 चौकार ,1 षटकार),रवींद्र जाडेजा  119 चेंडूंत 51 (4 चौकार ) ; जॉर्ज लिंडे 133 धावांत 4 विकेट, कागिसो रबाडा 85 धावांत 3 विकेट  विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला डाव 2 बाद 9 ; मोहम्मद शमी 1 धावेत 1 विकेट ,उमेश यादव 4 धावांत 1 विकेट

 

आपली प्रतिक्रिया द्या