रोहित शेट्टी गोळीबार प्रकरण शूटरसह सात जणांना अटक; हरयाणा, यूपी एसटीएफच्या मदतीने कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घरावर गोळीबार करून पसार झालेला शूटरसह सात जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. हरयाणा व यूपी एसटीएफच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. या गुह्यात आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या 12 झाली आहे.

रोहित शेट्टी यांच्या घरावरील गोळीबाराप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. गुन्हे शाखेने अचूक माग काढत पाच आरोपींना पुण्यात पकडले. मात्र घरावर प्रत्यक्ष गोळीबार करणारा शूटर तसेच या गुह्याचा मुख्य मास्टरमाइंड शुभम लोणकर हे दोघे सापडत नव्हते. हे आरोपी हरयाणा व आजूबाजूच्या परिसरात असल्याची माहिती मिळताच हरयाणा व यूपी एसटीएफच्या मदतीने मुंबई गुन्हे शाखेचे प्रभारी निरीक्षक घनश्याम नायर, निरीक्षक पवार, अरुण थोरात, लक्ष्मीकांत साळुंखे, सपोनि बिराजदार व पथकाने आग्रा येथे जाऊन मुख्य शूटर दीपक याच्याबरोबरच सनी, सोनू, रितिक, विष्णू कुशवाह, जतिन भारद्वाज आणि विशाल अशा सात आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्या सर्वांना मुंबईत आणल्यानंतर ‘मोक्का’ न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.

दहशत माजवण्यासाठी गोळीबार
सिनेसृष्टी तसेच व्यावसायिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता, असे अटक आरोपींनी चौकशीत सांगितल्याचे कळते. शुभम लोणकर व त्याच्या साथीदारांचे समाजमाध्यमांवर व्हिडीओ आहेत. ते पाहून आपणही गुन्हेविश्वात आपले नाव करूया असे आम्हाला वाटले. त्यातूनच रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करण्याच्या गुन्हय़ात सहभाग घेतला असे या आरोपींनी चौकशीत सांगितल्याचे समजते.