‘रोहयो’ची कामे झाली ऑनलाइन, कामांच्या नोंदींसह पगार बँक खात्यात जमा

सामना प्रतिनिधी, नगर

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे (रोहयो) कामकाज आता ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. या योजनेत कामांचे अंदाजपत्रक तयार करणे, प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देणे ही ऑफलाइन होणारी कामे देखील आता ऑनलाइन पद्धतीने केली जात आहेत. कामांच्या मोजमापाची पुस्तिकेत नोंद घेणे, मजुरांचे पगार थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करणे यासाठीही ऑनलाइन प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. नगर जिल्ह्यात या पद्धतीने कामकाजास एप्रिल 2019 मध्ये सुरुवात करण्यात आली आहे.

या योजनेत मोजमाप पुस्तिकेतील नोंदी आणि पगार बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यास याआधीच सुरुवात करण्यात आली आहे. त्यानंतर मात्र अन्य कामकाजही ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले असून या योजनेचे जवळपास सर्व कामकाज आता ऑनलाइन केले जात आहे. कामांना प्रशासकीय अथवा तांत्रिक मंजुरी देण्यापूर्वी कागदपत्रांची छाननी ऑफलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. जिल्ह्यातील रोहयोच्या कामांना ऑनलाइन मंजुरी देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कामकाज ऑनलाइन होत असल्याने कामांबाबत तक्रारीही येत नसल्याचे सांगण्यात आले. ऑनलाइन कामकाज होत असल्याने वेळेत बचत होत आहे. तसेच दरपत्रकाअभावी कामे खोळंबून राहण्याचे प्रकार कमी झाले आहेत.

रोजगार हमी योजनेचे काम ऑनलाइन करण्याची प्रक्रिया प्रायोगिक तत्वावर प्रथम नागपूर, अमरावती, भंडारा आणि वर्धा या जिल्ह्यात राबविण्यात आली. त्यानंतर आता राज्यभरात या पद्धतीने कामकाज केले जात आहे. जिल्हा परिषद आणि राज्य सरकारच्या अन्य विभागांमार्फत होणारी कामे या दोन्हींसाठी ऑनलाइन पद्धत राबविली जात आहे. रोहयोतील विहिरींचे बांधकाम, रोपवाटिका, घरकुल बांधकाम, रस्ते तयार करणे या कामांची मोजमापे ऑनलाइन सादर करण्यात येत आहेत. त्यानंतर पुढील कार्यवाही होऊन तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी ऑनलाइन प्रस्ताव पाठवले जात आहेत.