
>> कडकनाथ मुंबैकर <<
समरकंदमध्ये पंतप्रधान मोदी व पुतीन यांची भेट झाली. दोघांनी जोरदार हस्तांदोलन केले. त्या दिवशी रशियात वृत्तपत्रांची मुस्कटदाबी सुरू होती व पुतीन रहस्यमय हसत होते. दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी स्वदेशी परतले. त्यांनी आफ्रिकेतले आठ चित्ते मध्य प्रदेशातील जंगलात सोडले. चित्त्यांसाठी नवा स्वर्ग निर्माण केला. सत्तर वर्षांत असे घडले नव्हते! हे झाले चित्त्यांचे, माणसांचे काय?
सुमारे सत्तर वर्षांपासून आपल्या देशातून बरेच काही नामशेष झाले. गेल्या काही वर्षांत तर सत्य आणि अहिंसादेखील नामशेष झाल्यासारखे वाटते. न्याय तर दिवा घेऊन शोधावा लागतो. सत्तर वर्षांपासून काय काय नामशेष झाले ते सर्व मिळवून देण्याच्या बोलीवर मोदी व त्यांचा पक्ष सत्तेवर आला, पण सुमारे 70 वर्षांपूर्वी हिंदुस्थानातून नामशेष झालेले चित्ते पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी पुन्हा एकदा हिंदुस्थानात दाखल झाल्याने ‘भाजप’ नामक राजकीय पक्षाने काय मोठा उत्सव साजरा केला? हे चित्ते ‘नामिबिया’ नामक आफ्रिकी देशाने दिले, पण भाजपच्या काही लोकांनी असे वातावरण तयार केले की, हे आठ चित्ते त्यांच्याच प्रयोगशाळेत ‘टेस्ट टय़ूब’द्वारे जन्मास घातले व पंतप्रधान मोदी यांनी ते मध्य प्रदेशच्या ‘कुनो’ राष्ट्रीय उद्यानात सोडले. आठ चित्ते व त्यांना जंगलात सोडणारे आपले पंतप्रधान यांचे दर्शन सर्व वृत्तवाहिन्यांवर पुढचे 72 तास घडत होते. आठ चित्ते आले यापेक्षा दुसरी कोणतीच घडामोड त्यांना दिसत नव्हती. परदेशात दडवलेला 72 लाख कोटी काळा पैसा पेटारे भरून आणला असता तर देश अधिक आनंदी झाला असता. चित्ते आणले हा आनंदच आहे, पण आनंदाचा अतिरेक तरी किती करावा? त्यास काही मर्यादा? स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशाला आठ चित्ते मिळाले व त्याबद्दल तेव्हाच्या सत्ताधारी पक्षाने आनंदाचा उत्सव साजरा केला याची नोंद इतिहासात जरूर व्हायला हवी.
चपळ पुतीन
रशियाचे अध्यक्ष पुतीन हेसुद्धा चित्त्याप्रमाणे चपळ आणि वेगवान आहेत. उझबेकिस्तानातील समरकंद येथे पंतप्रधान मोदी व पुतीन यांची भेट झाली. आठ चित्त्यांप्रमाणे पुतीन भेटीची बातमीही दोन दिवस चालली. त्याच वेळी ‘मॉस्को’तील वृत्तपत्रांत एक बातमी ठळकपणे प्रसिद्ध झाली. सरकारविरोधी लेखन करणाऱया ‘नोव्हाया गॅझेट’ या वृत्तपत्राचा परवाना रद्द करण्याचा सरकारचा निर्णय मॉस्कोतील न्यायालयाने वैध ठरवला. या वृत्तपत्राचे मुख्य संपादक दिमित्री मुरातोव्ह यांना शांततेसाठीच्या नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. पुतीन यांच्या काळात स्वतंत्र बाण्याची अनेक वृत्तपत्रे बंद पाडली गेली. संपादक, पत्रकारांवर खोटे खटले लादून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. विरोधात आवाज उठवणारे अनेक जण बेपत्ता झाले. ते पुतीन सध्या हिंदुस्थानचे विश्वासू मित्र आहेत, पण रशियाचा इतिहास वेगळा कुठे आहे? त्या देशाचे हेच पूर्वापार धोरण आहे. जगभरातील हुकूमशहांविषयी अनेक कथा व दंतकथा वेळोवेळी प्रसिद्ध झाल्या आहेत. स्टॅलिन, मुसोलिनी, हिटलर, सद्दाम हे त्यापैकी काही. आता नवी नावे त्यात जोडली जातील. मुसोलिनीच्या काळात इटलीतील दूरदर्शनवर एक बातम्यांचे चॅनल होते. त्यावर सतत आणि सतत मुसोलिनीची तीच तीच भाषणे ऐकून जनता बेजार झाली होती. आपलाच नव्हे, तर जगातील अनेक देश या प्रकारच्या वैतागाच्या अनुभवातून जात असतात. अखेर इटलीतील दूरचित्रवाणीवर दुसरे चॅनेल सुरू होणार व ते स्वतंत्र बाण्याने बातम्या देणार असे जाहीर होताच लोकांना आनंद झाला. एका नागरिकाने पहिल्या चॅनेलवरील मुसोलिनीचे भाषण बंद करून मोठय़ा उत्सुकतेने दुसरे चॅनल सुरू केले. त्याबरोबर त्या चॅनेलमधून एक बंदूकधारी शिपाई बाहेर आला आणि ओरडला, ‘‘निमूटपणानं पुन्हा पहिलेच चॅनल सुरू कर, नाहीतर गोळी घालीन!’’
स्टॅलिनचे भय
मोदी यांच्या काळात ‘ईडी आणि सीबीआय’चे भय आहे तसे स्टॅलिनच्या काळात पोलिसांचे होते. स्टॅलिनच्या काळात एखाद्याला देशद्रोहाच्या आरोपावरून पकडायचे असेल तर पोलीस रात्री तीन वाजता त्याच्या घरी जात आणि दारावरची बेल वाजवीत. त्या इसमाने ‘‘कोण आहे?’’ असे विचारले तर पोलीस सांगत, ‘‘मी पोस्टमन आहे.’’ त्या नागरिकाने तार वगैरे आली असे समजून दार उघडले की, पोलीस त्याला पकडून नेत. अशाच एका रात्री तीन वाजता पोलिसांनी आपण पोस्टमन आहोत असे सांगून एका नागरिकाला दार उघडायला लावले आणि विचारले, ‘‘रशियातील जीवन इतकं सुखी, आनंदी, मोकळं असताना तू इंग्लंडमध्ये स्थायिक होण्यासाठी अर्ज का केलास? इथं तुला काय कमी आहे?’’ तो रशियन नागरिक नम्रपणे म्हणाला, ‘‘रशियात मला सर्व सुखं आहेत, पण रात्री तीन वाजता टपाल आलेलं मला आवडत नाही!’’
एका इंग्रजानं रशियन नागरिकाला विचारलं, ‘‘तुमच्या देशात भाषण स्वातंत्र्य नाही म्हणतात ते खरं आहे काय?’’ रशियन म्हणाला, ‘‘साफ खोटं आहे. ही आमच्या देशाची बदनामी आहे. आमच्या देशात भरपूर भाषण स्वातंत्र्य आहे. कोणीही काहीही बोलू शकतो.’’
‘‘मग तुम्ही लोक असे कोंडल्यासारखं का जगताय? सरकारविरुद्ध भाषण का करीत नाही?’’
‘‘अडचण अशी आहे की, आमच्या देशात भाषण स्वातंत्र्य जरी असले तरी भाषण केल्यावर त्या वक्त्याचे स्वातंत्र्य राहत नाही!’’
रेशन दुकानात अर्थमंत्री
आपल्या हिंदुस्थानात जगातली सगळय़ात मोठी लोकशाही नांदत आहे. कशी ते पहा. आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन तेलंगणा राज्यातील एका गावात अगदी अलीकडेच गेल्या. एका गावातील रेशन दुकानात त्या गेल्या. दुकानात पंतप्रधान मोदींचा फोटो नव्हता. ते पाहून अर्थमंत्री भडकल्या. अधिकारी व दुकानदारास त्यांनी फैलावर घेतले. “रेशन दुकानात मोदींचा फोटो का नाही? तेच तर तुम्हाला रेशन देतात ना?’’ असा सूर त्यांनी लावला. लोकशाहीत जनतेच्या कराच्या पैशांतून रेशन, पाणी, शिक्षण मिळते. हुकूमशाही असलेल्या देशात पैसा जनतेचा, पण देणारा फक्त हुकूमशहाच असतो. काही लोक पंतप्रधान मोदींना बदनाम करीत आहेत ते असे. अर्थमंत्र्यांनी दुकानात जाऊन काय केले ते मोदींना माहीतही नसेल, पण हे सर्व प्रसिद्ध झाले. टीकाकारांनी मोदींवर टीका केली.
हिटलर ऐन भरात असतानाची एक दंतकथा पहा. एका गावी नाझी पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक चालू होती. पक्षाच्या तेथील प्रमुखाने एका सदस्याला विचारले,
‘‘जर्मनीचा नेता कोण?’’
‘‘हिटलर!’’
‘‘जगातील सर्वश्रेष्ठ नेता कोण?’’
‘‘हिटलर!’’
‘‘आपल्याला रेशनपाणी कोण देतं?’’
‘‘हिटलर!’’
‘‘जर्मनीत पाऊस कोण पाडतो?’’
‘‘देव!’’
यावर पक्षाचे अध्यक्ष संतापले, ‘‘हा इसम देशद्रोही आहे. याची नाझी पक्षातून हकालपट्टी करा व खटला भरा.’’ 1938 साली जर्मनीत निवडणुका झाल्या आणि 98 टक्के मते मिळवून हिटलर राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला. हिटलरने खूश होऊन चिरूट शिलगावला. धुराची वलये सोडीत त्याने गोअरिंगला सूचना केली, ‘‘जा, आपल्या 98 टक्के समर्थक मतदारांना माझ्यातर्फे लाख लाख धन्यवाद सांगून ये.’’ पंधरा दिवसांनी गोअरिंग जर्मनीचा दौरा करून परत आला आणि म्हणाला, ‘‘काय सांगू हिटलर! अहो, मी जर्मनीत फिरून आलो. हजारो लोकांना भेटलो, पण आपल्याला मतदान केलेल्या 98 टक्के लोकांपैकी एकही मला आढळला नाही. सगळे जण दोन टक्के लोकांपैकीच होते.’’ हा चमत्कार कसा काय झाला? गोबेल्स बाजूलाच होता. तो म्हणाला, ‘‘चमत्कार? कसला चमत्कार?’’ त्या 98 टक्के मतपत्रिका पेटीत टाकण्याची व्यवस्था मीच केली होती.’’
विनोदाचे शत्रू
पुतीन यांच्या काळात वृत्तपत्र आणि विरोधकांची मुस्कटदाबी सुरूच आहे. विरोधात आवाज उठवणाऱया विरोधी पक्षनेत्यावर पाळत ठेवून त्यास विषप्रयोगाने मारण्याचा प्रयत्न झाला (लोकशाही पद्धतीत ईडी-सीबीआयचा प्रयोग होतो). तरीही पुतीन हे लोकप्रिय व सामर्थ्यवान नेते ठरवले जातात. युक्रेन त्यांनी खतम केले. हजारो निष्पाप लोक मारले गेले. आता युक्रेनमध्ये रशियन सैन्य मार खाऊ लागले आहे. तरीही पुतीन यांच्या विजयाच्याच बातम्या रशियात प्रसिद्ध होतील. आपल्या देशात तरी वेगळं काय आहे? देशासमोर समस्या आणि संकटे वेगळीच आहेत, पण चोवीस तास चित्ता, हरण, ससे यांच्या बातम्या दाखवून लोकांना बेजार केले जाते. कमी पडलं तर हिजाब, मुसलमान आहेतच. हुकूमशाहांना नेहमीच वाटत असते – त्यांचा देश हाच एकमेव स्वर्ग आहे व तेच स्वर्गाचे निर्माते आहेत. ते सिंहासनावर येण्याआधी त्यांचा देश म्हणजे स्मशान अथवा वाळवंटच होते. अशा सर्वच एककल्ली राज्यकर्त्यांना विनोद, सत्य व टीकेचे वावडे असते. स्टॅलिनलाही विनोद आवडत नसे. त्यामुळे कम्युनिस्ट पद्धतीवर विनोदी चुटके, हलके फुलके लिखाण करणाऱयांवर तो संतापत असे. असेच विनोदी चुटके म्हणजे ‘सटायर’ लिहिणाऱया एका लेखकाला रशियन गुप्त पोलिसांनी पकडले व स्टॅलिनसमोर आणून उभे केले. स्टॅलिनने त्याला दम भरला व विचारले, ‘‘काय रे, तू हे असे विनोदी लिखाण करून आपल्या कम्युनिस्टांची थट्टा चालवली आहेस काय? अरे, जगात आपली वाहव्वा सुरू आहे. सारे जग म्हणतेय, जन्माला यावं तर रशियातच. आपला कम्युनिझम म्हणजे मानवाला मिळालेले वरदान आहे. कम्युनिझम म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग आहे.’’ तो विनोदी लेखक घाबरलेला होता. आपली रवानगी तुरुंगात नक्कीच होणार, क्रांतीचा शत्रू ठरवून आपला छळ केला जाणार याची खात्री असतानाही तो स्टॅलिनसमोर नम्रपणे म्हणाला, ‘‘साहेब, मी जे विनोदी लिखाण केले आहे, त्याबद्दल मला काय शिक्षा द्यायची असेल ती द्या, पण रशियातील कम्युनिझम हा पृथ्वीवरचा स्वर्ग आहे व हा विनोद माझा नाही एवढंच फक्त लक्षात ठेवा. तो विनोद आपणच केला आहे!’’ पुतीन यांना आजही वाटतं, त्यांचा रशिया म्हणजे स्वर्ग आहे. हिटलरलाही तसेच वाटत होते. दुसऱया महायुद्धात आपल्या व्यंगचित्रांनी हिटलरला जेरीस आणणाऱया डेव्हिड लो याला ‘जिंदा या मुर्दा’ पकडून आणण्याचे फर्मान हिटलरने सोडले होते. आपल्या देशात हे काम ईडी, सीबीआयवर सोपवले गेले आहे. कारण सध्या स्वर्गाचे रखवालदार तेच बनवले गेले आहेत. नामिबियातील आठ चित्ते हिंदुस्थानातील स्वर्गात आले आहेत. त्यांच्यासाठी नवा स्वर्ग निर्माण करण्यात आला आहे. लोक त्या स्वर्गात दंग आणि गुंग झाले. हीच आपली लोकशाही! जनतेला सत्तर वर्षांत काय मिळालं, तर आठ चित्ते व गुंगी! प्रत्येकाचा स्वर्ग आणि गुंगीची मात्रा वेगळी आहे. हिटलर, पुतीन, स्टॅलिन आणि आपण सगळे नक्की कोणत्या स्वर्गात विहार करीत आहोत हा संशोधनाचाच विषय आहे.