रोखठोक – सरकार नागपुरात; काळजी नसावी, पाच वर्षे टिकेल!

6696
uddhav-thackeray

rokhthokज्यांनी 80 तासांचे सरकार बनवले त्यांना आजही वाटते, उद्धव ठाकरे यांचे सरकार 80 दिवस टिकणार नाही. या भ्रमातून आता सगळ्यांनी बाहेर यावे. सरकार नागपुरात पोहोचले आहे. मुंबईत येऊन संपूर्ण मंत्रिमंडळ बनेल व नंतर पाच वर्षे टिकेल. सरकार टिकविण्यात अजित पवारांची भूमिका महत्त्वाची राहील! काळजी नसावी.

महाराष्ट्राच्या राजकारणाचे दूरगामी परिणाम देशाच्या राजकारणावर होतील असे वातावरण आहे. सोमवारपासून नागपूरचे विधानसभा अधिवेशन सुरू होईल. अनेकदा हे अधिवेशन एक-दोन आठवडेच चालते, पण त्यासाठी संपूर्ण सरकार लवाजमा घेऊन नागपुरात उतरते व ते बऱ्याचदा रात्रीच्या रंगीत हुरडा पाटर्य़ांतच मग्न असते. नवे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे अशा वातावरणात फार रमणारे नाहीत. 80 तासांचे सरकार ज्यांनी आणले व पडले त्यांना असे वाटते की, हे सरकार 80 दिवसही टिकणार नाही. नागपूरचे अधिवेशन हे राजकीय घोडेबाजारासाठी प्रसिद्ध, पण 170 सदस्यांचे भक्कम बहुमत असलेले हे सरकार पाच वर्षे टिकेल. श्री. शरद पवार व काँग्रेसच्या नेत्यांची ही भूमिका. मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या अधिवेशनानंतर होईल व हे राज्य वेगाने पुढे जाईल. महाराष्ट्रात जे घडले ते अनपेक्षित होते. असे घडले आहे यावर आजही अनेकांचा विश्वास बसत नाही. 10 डिसेंबरच्या रात्री मी लखनौला एका कार्यक्रमात होतो. इतर पक्षांतून भाजपात गेलेले व आज मंत्रीपदावर विराजमान असलेले प्रमुख नेते तेथे भेटले. सगळ्यांचे एकच सांगणे होते, महाराष्ट्राने नवी दिशा दिली. देशातील इतर राज्यांतही आता हेच घडेल. हा प्रारंभ आहे.

विदर्भातला सत्कार
नागपूरच्या ‘रामगिरी’ या अधिकृत निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुक्काम असेल. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नव्या मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार नागपुरात होत आहे. मुख्यमंत्री म्हणून श्री. उद्धव ठाकरे यांनी घेतलेला पहिला प्रमुख निर्णय म्हणजे समृद्धी महामार्गास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा. विदर्भाला उर्वरित महाराष्ट्रास जोडणारा हा महामार्ग. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देण्यास विरोध केला, पण त्या खात्याचे मंत्री असलेल्या श्री. एकनाथ शिंदे यांनी शेतकरी आणि सरकार यांच्यात मध्यस्थी केली व हा महामार्ग पुढे सरकला हे सत्य आहे. मुंबईत ‘आरे’ कारशेडला स्थगिती देण्यात आली. कुणालाच नको असलेला बुलेट ट्रेनचा प्रकल्पही पुढे जाईल असे दिसत नाही. मुंबईकरांना मेट्रो हवी आहे, पण त्यासाठी ‘आरे’तील जंगलतोडीविरुद्ध लोक रस्त्यावर उतरले. बुलेट ट्रेन नक्की कुणासाठी? ही शंका आजही आहेच. या सर्व महागडय़ा प्रकल्पांपेक्षा मराठी माणसांच्या, शेतकऱ्यांच्या पोटापाण्याचे प्रश्न सुटावेत ही सगळय़ांची अपेक्षा.

आधीच्या सरकारने राज्य आणि सत्ता लोकांसाठी कमी व पक्षविस्तारासाठीच जास्त राबवली, पण एकनाथ खडसे, पंकजा मुंडेंसारखे पक्षाचे ‘बहुजन’ चेहरेच नाराज आहेत व निवडणुकांत त्यांना पराभूत करण्यासाठी पक्षातूनच प्रयत्न केले असा आरोप दोघांनी केला. श्री. एकनाथ खडसे चार दिवसांपूर्वी भाजप नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीत आले, पण श्री. खडसे थेट शरद पवार यांना जाऊन भेटले. खडसे दिल्लीतून मुंबईस पोहोचले व त्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. 2014 साली ‘युती’ तुटल्याची घोषणा करणारे खडसे आता मनाने भाजपपासून तुटले आहेत. ते भाजपात राहतील असे वातावरण आज नाही. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिवशी भगवान गडावर येण्याचे निमंत्रण उद्धव ठाकरे यांनाच दिले. मी भाजपातच आहे असे पंकजा यांना वारंवार जाहीर करावे लागत आहे. भाजपातील काही आमदार जे मूळ काँगेस आणि राष्ट्रवादीचे आहेत ते मूळ पक्षात परत जातील, अशा बातम्या दिल्लीतील प्रमुख वर्तमानपत्रांनी छापल्या. हे सर्व महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर घडत आहे.

ajit-pawar

अजित पवारांचे काय?

मुख्यमंत्री व सहा मंत्री मिळून राज्याचा कारभार सुरू आहे. नागपूर अधिवेशनानंतर संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत 25-30 वर्षे नव्हता त्यापेक्षा उत्तम संवाद सरकारमधील तीन पक्षांत दिसत आहे. आघाडीचे सरकार चालवणे ही एक कला आहे व असे सरकार चालवणाऱया प्रमुख नेत्यांकडे मनाची दिलदारी असावी लागते. श्री. उद्धव ठाकरे व श्री. शरद पवार यांच्याकडे ही दिलदारी मला पहिल्या दिवसापासून दिसत आहे. अडवणुकीचे व ओरबाडण्याचे धोरण दिसत नाही हे महत्त्वाचे. सगळय़ात मोठे प्रश्नचिन्ह आहे ते अजित पवारांच्या भूमिकेविषयी. 80 तासांचे सरकार ज्यांनी फडणवीस यांच्याबरोबर स्थापन केले ते अजित पवार काय करतील? भाजपच्या सर्व आशा आजही फक्त अजित पवारांवरच टिकून आहेत. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात अजित पवारांच्या भूमिकेविषयी मी शरद पवार यांना विचारले. अजित पवारांचे काय? पवार विश्वासाने म्हणाले, ‘‘अजित पवारांची चिंता करू नका. हे सरकार पाच वर्षे तेच टिकवतील. निश्चिंत राहा!’’ शरद पवार निश्चिंत आहेत तोपर्यंत सरकार स्थिर आहे. महाराष्ट्र निश्चिंत आहे. हे सरकार टिकवायचेच या एका निर्धाराने शरद पवार उभे आहेत. काळजी नसावी!

Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या