रोखठोक : ढोंगाचा जयजयकार, असले हिंदुत्व बिनकामाचे!

53
pm-modi-red-fort

rokhthokराहुल गांधी यांनी मानसरोवर यात्रेस जाण्याआधी मांसाहार केल्याचा आरोप भाजपने केला. राहुल गांधी काय खातात, काय पितात यावर भाजपचे हिंदुत्व टिकून आहे काय? राम अयोध्येतच वनवासात आहे आणि महाराष्ट्रातील ‘भाजप’च्या रामाने लेकी-सुनांना पळवून आणायची भाषा केलीय.

भारतीय जनता पक्ष आजही धर्माच्या लचांडात कसा अडकून पडला आहे याचे दर्शन रोज घडत आहे. पण ते हिंदुत्व खरे नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सध्या मानसरोवर यात्रेवर आहेत. यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी मांसाहार केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला व त्या मांसाहारावर त्यांनी चर्चा घडवली. यात्रेदरम्यान राहुल एका हॉटेलात गेले व त्यांनी चिकन मोमोस, चिकन कुरकुरेची ऑर्डर दिली. त्यामुळे गांधी हे अपराधी आहेत, राहुल गांधी हिंदू नाहीत, हे सिद्ध करण्याचा हा राजकीय आटापिटा आहे. ज्या हॉटेलात गांधी गेले त्या हॉटेलच्या वेटरने भाजपचा आरोप खोडून काढला. गांधी यांनी शुद्ध शाकाहारी भोजन केल्याचे त्याने सांगितले. देशाचे राजकारण कोणत्या पातळीवर घसरत चालले आहे याचे हे उदाहरण. कर्नाटकच्या एका प्रचार सभेत राहुल गांधी यांनी एका मठाचे दर्शन घेतले. मठात जाण्याआधी गांधी यांनी मांसाहार केल्याचा आरोप तेव्हाही भाजपने केला. राहुल गांधी विधानसभा प्रचारादरम्यान गुजरातेत गेले. सोमनाथ मंदिराच्या व्हिजिटर्स पुस्तकात राहुल गांधी यांनी स्वतःचा उल्लेख हिंदू असा केला नाही. यावरही भाजपने वाद केला. तेसुद्धा शेवटी खोटेच निघाले. धर्माचे राजकारण करायला हरकत नाही, पण राहुल गांधी काय खातात यावर धर्म म्हणून तिसरा डोळा ठेवणे हे कोत्या मनाचे लक्षण आहे. अशाने हा देश हिंदू राष्ट्र बनेल काय?

गोमांस गुंडाळले
गोहत्या आणि गोमांसाचा विषय भाजपने आता पंतप्रधान मोदी यांच्या आदेशाने गुंडाळून ठेवला आहे. कारण भाजपशासित अनेक राज्यांत गोमांस विकले जात आहे. गोवा, ईशान्येकडील राज्यांत निवडणुका जिंकायच्या असतील तर गोमांस खाण्यावर बंदी आणून चालणार नाही, हे सत्य भाजप समर्थक हिंदुत्ववाद्यांना स्वीकारावे लागेल. या सगळ्यात नुकसान झाले ते पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे. भाकड गाईंचे करायचे काय व त्यांना पोसायचे कसे, हा प्रश्न सरकार सोडवणार नाही. आज गाईंची खरेदी -विक्री व बाजार बंद झाले. कारण गाईंची वाहतूक करणाऱ्यांची हत्या दिवसाढवळ्या केली जाते. अनेक भागांतील दुग्ध व्यवसाय त्यामुळे संकटात आला. हे सर्व प्रकरण फक्त गाईंवरच थांबले नाही. कोलकात्यातील एका भाजप नेत्याने बकरीलाही मातेचा दर्जा द्यावा व त्यांच्या हत्या थांबवाव्यात अशी मागणी केली. बकरी गांधींना प्रिय होती व बकरीसुद्धा दूध देते असा प्रतिवाद त्याने केला. याच विचाराने उद्या कोंबडीस मावशी किंवा बहिणीचा दर्जा द्यावा, त्यांनाही मारू नका, तेच खरे हिंदुत्व, असे सांगितले जाईल. खाण्यापिण्याच्या सवयी व बंधने यावर कुणी हिंदुत्व म्हणजे काय ते ठरवत असेल तर त्या हिंदुत्वाचा देशाला उपयोग नाही. श्री. मोदी हे पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावर भाषण करतात. भगवी पगडी घालतात व ते पाहून काहीजणांना वाटते, आता हिंदू राष्ट्र आले. राहुल गांधी मांसाहार करतात हे सांगण्यापुरते हिंदू राष्ट्र नक्कीच आले आहे.

राममंदिराचे काय?
राममंदिर कधी होणार हे सांगायला एकही सत्ताधारी हिंदुत्ववादी तयार नाही. योगी आदित्यनाथांनी सांगितले, राममंदिर उभारणीची तारीख आता प्रभू श्रीरामच ठरवतील. अयोध्येचे आंदोलन व शेकडो करसेवकांचे हौतात्म्य हे प्रभू श्रीरामास विचारून केले नव्हते. समान नागरी कायद्यापासून 370 कलम रद्द करण्यापर्यंतचे सर्व मुद्दे हिंदुत्वाचेच होते. त्यापैकी एकही मुद्दा पुढे गेला नाही.

पंडित नेहरूंचा सर्वाधिक द्वेष पंतप्रधान मोदी करतात. पंडित नेहरूंमुळे हा देश सेक्युलर म्हणजे निधर्मी झाला. पंडित नेहरूंचा ‘सेक्युलर’वाद मान्य नसेल तर हा देश हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्यापासून तुम्हाला कोणी रोखले आहे? केरळमध्ये महापुराने हाहाकार उडवला. तेथेही चर्च विरुद्ध मंदिर असा वाद निर्माण करणारे धर्माचे राजकारण झाले. पण चर्चमधल्या ख्रिस्ताने व मंदिरातील देवाने विध्वंस रोखला नाही. सर्वच जाती-धर्माची माणसे एकत्र येऊन एकमेकांना मदत करीत राहिली. गोमांस खाणारे तेथे दोन वेळच्या सांबार-भाताच्या प्रतीक्षेत रांगा लावून उभे राहिले व मंदिरांच्या व्यवस्थापनाने सगळय़ांचीच व्यवस्था केली.

घरे नाकारणारा धर्म
मुंबईसारख्या शहरात मांसाहार करणाऱ्यांना घरे नाकारली जात आहेत. जैन समाजाचे लोक हे सर्व करतात तेव्हा आश्चर्य वाटते. भ्रष्ट मार्गाने पैसा जमा करणे व त्यातून इमारती बांधणे हा ‘सात्त्विक’ व्यवहार, पण मांसाहार करणाऱ्या श्रमिकांना घर नाकारणे हा धर्माचा व्यवहार! राहुल गांधींनी मांसाहार करणे हा अपराध, पण मुंबईत मांसाहार करणाऱ्यांना घरे नाकारणे हा कायद्याने गुन्हा ठरत नाही. कारण भाजपला जैनांची मते हवी आहेत. पंतप्रधान मोदी दोन महिन्यांपूर्वी रवांडा देशात गेले व त्यांनी तेथील लोकांना भेट म्हणून 250 हिंदुस्थानी गाई दिल्या. रवांडा हा देश गोमांस भक्षक आहे व ‘बीफ’ हेच त्यांचे रोजच्या जेवणाचे अन्न आहे. त्यामुळे सध्या दुधासाठी दिलेल्या या 250 गाईंचे पुढे काय होणार, हा प्रश्न हिंदू राष्ट्रवाल्या गोरक्षकांना पडला नाही. 2014 साली हिंदुत्वाची उसळलेली लाट आता मोदींच्या डोक्यावरील भगव्या पगडीपुरतीच उरली आहे. राहुल गांधी हिंदुत्ववादी आहेत की नाहीत हा प्रश्न तूर्त बाजूला ठेवा. भाजप हिंदुत्ववादी आहे काय, हाच खरा सवाल आहे. राहुल गांधी मांसाहार करतात म्हणून भाजपचे हिंदुत्व शंभर नंबरी हे मानायला आता कोणी तयार नाही. प्रभू श्रीराम आता अयोध्येतच वनवास भोगत आहेत व मुंबईतला भाजपचा ‘राम’ लेकी-सुनांना पळवून नेण्याची भाषा खुलेपणाने करतो. त्याबद्दल राज्यकर्त्यांना खंत वा खेद नसेल तर मोदींच्या डोक्यावरील भगव्या पगडीला अर्थ राहणार नाही आणि लोकांच्या दृष्टीने ते ढोंग ठरेल. सध्या सर्वत्र ढोंगाचा जयजयकार सुरू आहे.

ट्वीटर – @rautsanjay61
जीमेल – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या