रोखठोक – पटकीचा वाखा ते कोरोनाचा लढा! मुंबईची कुंडली काय सांगते?

5723

rokhthok‘कोरोना’मुळे मुंबईतून लोकांचे पलायन सुरू आहे. श्रमिकांनी घडवलेल्या मुंबईतून मजूर निघून जात आहेत. मुंबईने असे अनेक घाव, हल्ले व आजार पचवले आहेत. पटकीतून वाचलेली मुंबई कोरोनावरही मात करेल.

मुंबईचे काय व कसे व्हायचे याची चिंता सगळय़ांनाच लागली आहे. मुंबईत आजमितीस सहा हजारांवर कोरोनाग्रस्त सापडले आहेत व जूनपर्यंत मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा साठ ते सत्तर हजारांवर पोहोचेल असे पालिका प्रशासनास वाटते. यामुळे ‘बी.के.सी.’तील मोकळय़ा मैदानावर तंबू उभारून तेथे कोरोनाग्रस्तांची व्यवस्था लावण्याचे काम सुरू झाले आहे. ज्या बीकेसी मैदानावर महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाचा सोहोळा पार पडला त्याच मैदानावर आता मुंबई वाचविण्यासाठी रुग्णसेवा सुरू झाली आहे. मुंबईच्या वाटय़ाला अशी संकटे काही आजच आलेली नाहीत. मुंबईच्या जन्मापासूनच मुंबईने अंगावर बंदुकांचे घाव आणि आजारांचे हल्ले पचवले आहेत. ब्रिटिश काळातही मुंबई हीच ‘कंपनी सरकार’ची अस्सल राजधानी होती. तशी आज ती दिल्ली सरकारची आहे. डॉक्टर फ्रायर हे युरोपातून हिंदुस्थानात इसवी सन 1672 मध्ये पर्यटनास आले. ते मुंबईचे वर्णन करताना लिहितात, ”या बेटाचा बहुतेक भाग म्हणजे सुमारे 40 हजार बिघे जमीन समुद्राच्या पाण्याने भरून वाहत असतो आणि सरासरी 10 हजार बिघे जमिनीचा भाग मात्र वास्तविक जमिनीत गणला जातो. मुंबईची लहान लहान पाच बेटे आहेत आणि त्यातून खाऱ्या पाण्याच्या खाडय़ा असून त्या चिखलाने भरलेल्या आहेत. ओहोटीच्या वेळी ही बेटे पाच दिसतात, परंतु भरती आली म्हणजे जिकडे-तिकडे पाणी भरून सात होतात.” हे वर्णन पाहिले की, मुंबईची आजची दुर्दशा लक्षात येईल.

मुंबईतून पलायन

कोरोनामुळे आज मुंबईतून लोकांचे पलायन सुरू आहे, पण 1685 पर्यंत मुंबई हे तसेही राहण्याजोगे ठिकाण नव्हते. जे इंग्रज येथे येत ते अल्पायुषी ठरत. भलतेसलते रोग येथे उद्भवत असत. त्यामुळे बाहेरचा मजूरवर्गही येथे येऊन राहण्यास धजावत नव्हता. आसपास खाडय़ा, खाजणे असल्यामुळे हवा सर्द आणि रोगट होती. त्यातून अनेक आजार, रोग हवेतूनच निर्माण होत असत. मुंबईतील हवेविषयी एक प्रथमच आलेला इंग्रज लिहितो, ”मुंबईत राहणाऱ्यांचे आयुष्य दोन चातुर्मास झाले म्हणजे संपले असे समजावे.” त्यावेळी कित्येकजण मुंबईस ‘यमपुरी’ असे म्हणत. इतकी येथील हवा रोगट होती. हळूहळू त्यात फरक पडत गेला. समुद्रास मागे हटवले गेले. खाडय़ा व खाजणे भरून तिचे रुपांतर सुपिक जमिनीत केले. अशाप्रकारे हे शहर माणसांना राहण्याजोगे केले गेले. शहर निरोगी केले, पण मुंबईची हवा नंतर निरोगी न राहण्याचे कारण ठरली आहे फक्त लोकांची गर्दी. या गर्दीनेच मुंबईस 1720 लाही यमपुरी बनवले व आता 2020 लाही त्याच गर्दीने ‘यमपुरी’च बनवून सोडले. मुंबईवर संशोधन करणारे गोविंद नारायण माडगांवकर एके ठिकाणी लिहितात, ”सन 1699 मध्ये इंग्रज लोकांत आपापसातच सर्व गोष्टींची अंदाधुंदी चालली होती. त्यातच मुंबईत ‘पटकीचा वाखा’ उद्भवून पुष्कळ लोक मरू लागले. यावेळी मूळ स्थानिक लोकांची (एतद्देशीय) फारच नासाडी झाली आणि गोऱ्या पलटणींपैकी 76 लोक मात्र जीव धरून राहिले.” आज कोरोना प्रकरणात नेमके उलटे घडले आहे. अमेरिका, इटली, युरोपसारख्या राष्ट्रांतील गोरे लोक कोरोनाशी सामना करण्यात अपयशी ठरत आहेत व हिंदुस्थानातील ‘काळे’ श्रमिक त्यामानाने शारीरिक ताकदीच्या जोरावर जीव धरून आहेत.

असा होता प्लेग

न. र. फाटक यांनी ‘मुंबई नगरी’ हा ग्रंथ लिहिला व तो मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्ध केला. त्यात मुंबईवर कोसळलेल्या अस्मानी-सुलतानी संकटांवर त्यांनी भाष्य केले आहे. ते वाचल्यावर आजच्या ‘कोरोना’ची आठवण येते. श्री. न. र. फाटक सांगतात, ”गेल्या शतकाच्या अखेरीस मुंबईच्या नागरिकांना एका भयानक रोगाने पछाडले. या रोगाला ‘प्लेग’ हे नाव असून त्याने नंतर सारा देश भरडला. हा रोग 1896 च्या हिवाळय़ात मुंबईत उसळला, पण हा रोग नवीन नव्हता. त्याचे उल्लेख इतिहासात पुष्कळदा येतात. ज्या काळातले हे उल्लेख आहेत, त्या काळात देशाची लोकवस्ती आजच्यासारखी दाटीवाटीच नव्हती. हा रोग या शहरी उद्भवल्यानंतर इतक्या झपाटय़ाने पसरला की, एका रोग्याच्या प्रेताला स्मशानात दहन किंवा दफन करून घरी परत यावे तो दुसऱ्या प्रेताच्या स्मशानयात्रेच्या तयारीस लागावे अशी स्थिती लोकांना भोगण्याची पाळी आल्यामुळे शहराबाहेर जाणे हा उपाय लोकांनी स्वीकारला. मुंबईच्या उपनगरांची वाढ तेव्हापासून सुरू झाली असे म्हटल्यास ते होणार नाही. जेथे प्लेगचा प्रादुर्भाव होईल, ती जागा रोगनाशक औषधाच्या पाण्याने धुऊन काढायची, तेथील माणसांना इस्पितळातून पोचवायचे, घरांची तपासणी व माणसांना घरातून काढणे हे प्रकार स्त्रियांच्या बाबतीत पडदा पाळणाऱ्या मुसलमान समाजाला रुचणारे नसल्यामुळे या शहरात पहिल्या एक-दोन वर्षात लहान लहान दंगेही झाले. हिवाळय़ाच्या आरंभी सुरूवात आणि उन्हाळय़ाच्या आरंभी शेवट याप्रमाणे प्लेगच्या अमलाचे ठोकळ वेळापत्रक होते. त्यावर औषधी उपाय काढण्यासाठी चाललेल्या प्रयत्नात हाफकिन नावाचा एक ज्यू डॉक्टर यशस्वी झाला. त्याने एक लस तयार केली. ती माणसाच्या अंगात टोचल्याने रोग होत नाही व झाल्यास माणूस सहसा दगावत नाही, अशी त्या लसीच्या गुणकारित्वाबद्दल लोकांची खात्री पटल्यामुळे सांप्रत त्या लसीवर लोकांची श्रद्धा आहे. हा रोग फैलावण्यापूर्वी उंदीर मरू लागतात. त्या उंदरांवरील पिसवा चावल्या म्हणजे माणसाला प्लेग होतो. साथीचा रोग म्हणून प्लेगला दैवी आपत्ती मानली तरी या साथीला जन्म देणारी बिजे माणसाच्या अस्वच्छ व्यवहारातच दिसतील. प्लेगची साथ संपुष्टात येते न येते तोच 1918 साली ‘इन्फ्लुएन्झा’ नावाच्या रोगाने साऱ्या देशावर आक्रमण करून लाखो लोकांना महिना-दीड महिन्याच्या अवधीत इहलोकातून उठविले, इतकी त्याची संहारशक्ती प्रचंड होती. तेव्हा पहिले जागतिक युद्ध नुकतेच संपत होते. इन्फ्लुएन्झाच्या मदतीला काही दिवस कॉलराचाही धिंगाणा चालला होता. मुंबईच्या स्मशानातून सरणाच्या लाकडांचा पुरवठा कमी पडू लागला. स्मशानात जाळण्याला जागा एखाद्या दिवशी न मिळाल्यास तेथे येणाऱ्या प्रेतांच्या ताटय़ांना नंबर लावून ठेवीत. त्या दिवसांमध्ये रोजची मृत्यूची संख्या काही दैनिकांतून प्रसिद्ध होत असे. ती कोणी पाहिल्यास एखाद्या दिवशी हजारावर ती संख्या गेल्याचे जिज्ञासूंच्या दृष्टीस पडेल. इन्फ्लुएन्झाची दरसाल प्लेगप्रमाणे फेरी नसे. इन्फ्लुएन्झाच्या तडाख्यात हिंदुस्थान एकटाच त्याकाळी सापडला असला तरी जगातल्या इतर अनेक देशांना तेव्हा एन्फ्लुएन्झाच्या छायेतून जावे लागले होते.”

कुंडली काय सांगते

मुंबईची कुंडली पहिल्यापासून अस्थिर आहे. अस्मानी आणि सुलतानी हे ग्रह मुंबईस सदैव छळत राहिले. कधी पूर आले, दंगे झाले, बॉम्बस्फोट घडले, दहशतवादी हल्ल्याने मुंबई भयकंपित झाली. नवे विषाणू नवे आजार घेऊन मुंबईच्या उंबरठय़ावर उभेच असतात. कधीकाळी मुंबईस ‘यमपुरी’ म्हटले जात होते. त्या यमपुरीची ‘मायापुरी’, लक्ष्मी नगरी झाली ती श्रमिकांच्या घामातून. कोरोनामुळे हे श्रमिक एकतर मुंबईतून पलायन करीत आहेत नाहीतर बेकार होऊन बसले आहेत. एका श्रमिकाने मला फार चांगले सांगितले, ”साहेब, कोरोनामुळे जितके बळी जाणार नाहीत तितके बळी या लॉक डाऊनमुळे जातील बघा.” कोरोनामुळे आलेले संकट हे उपासमार, भूकबळीचे आहे. त्यातून मार्ग काढावा लागेल. माणसालाच माणसाची मदत करावी लागेल. माणूस जगवावा लागेल. पटकीच्या वाख्यातून मुंबई बचावली ती कोरोनाच्या खाईतूनही सुटेल. मुंबईची ‘यमपुरी’ होणार नाही हे पाहावे लागेल!

Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या