रोखठोक – बाप रे! संपूर्ण दिल्ली देशद्रोही! रामाचे राज्य, हनुमानाचा विजय!

6667

rokhthokदिल्ली विधानसभेच्या निकालाने एक दाखवून दिले, पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा हे अजिंक्य नाहीत. दुसरे म्हणजे मतदार बेइमान नाहीत. धर्माच्या वावटळी निर्माण केल्या जातात, त्यात ते वाहून जात नाहीत. राम हा श्रद्धेचा विजय आहेच, पण काही विजय हनुमानही मिळवून देतो. दिल्लीत तसेच झाले.

लोकसभा निवडणुकीत मजबूत आणि अभेद्य असलेला भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुकीत पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळतो हे दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पक्ष अजिंक्य नाही व मोदी, शहा यांच्यामुळेच निवडणुका जिंकता येतात या दंतकथांतून लोकांनी आता तरी बाहेर पडायला हवे. दिल्ली विधानसभेसाठी मतदान सुरू झाले तेव्हा मी दिल्लीत होतो. संसदेचे अधिवेशन सुरू होते. ‘‘कोणत्याही परिस्थितीत भाजपला 45 जागा मिळत आहेत. केजरीवाल यांचा पराभव नक्की,’’ असे सेंट्रल हॉलमध्ये येऊन भाजपचे नेते सांगत. यावर ‘‘ईव्हीएम ताब्यात घेतले असतील तरच दिल्लीत केजरीवाल पराभूत होतील,’’ असे सांगणारे पत्रकारही तेथे होते. आपण बहुमताचा आकडा पार करू, असा विश्वास खुद्द श्री. मोदी आणि श्री. शहा यांना होता. पण प्रत्यक्षात मोदी आणि शहांच्या भाजपला दहाचा आकडाही पार करता आला नाही. 62 जागा एकहाती जिंकून केजरीवाल यांनी मोठा विजय मिळवला. दिल्ली विधानसभेचे निकाल संपूर्ण लागले तेव्हा मी उझबेकिस्तानमध्ये उतरलो. ताश्कंद विमानतळाबाहेर तेथे पंधरा वर्षांपासून राहणारे दोन भारतीय भेटले. ‘भाजपचा फुगा फुटायला आता सुरुवात झाली आहे. प्रभू श्रीरामही त्यांना मदत करायला तयार नाहीत,’ असे परदेशी भूमीवरील हिंदुस्थानी म्हणतात, तेव्हा आश्चर्य वाटत नाही.

भाजपने काय केले?

केजरीवाल यांचा पराभव व्हावा यासाठी भाजपला इतकी ताकद, सत्ता पणाला लावण्याची गरज होती काय? दिल्लीची निवडणूक एक सामान्य निवडणूक होती. केजरीवाल यांचे सरकार पाच वर्षे काम करीत होते. ‘मी काम केले आहे म्हणून दिल्लीकरांनी मला मतदान करावे’ ही त्यांची भूमिका. केजरीवाल किंवा त्यांच्या पक्षाने भाजप, मोदी, शहा यांच्यावर सुरुवातीला कोणतीही टीका केली नाही. त्यामुळे भाजपलाही फालतू वादात पडण्याची गरज नव्हती. भाजपने काय केले ते पहा-

– पंतप्रधान मोदी यांच्याच खांद्यावर निवडणुका जिंकण्याचे ओझे टाकले. (ते फोल ठरले.)

– अमित शहा हे गृहमंत्री म्हणून स्वतः दिल्लीच्या मैदानात उतरले व त्यांनी साम, दाम, दंड, भेदाचा वापर केला. देशाचे गृहमंत्री संसदेचे अधिवेशन सोडून दिल्ली विधानसभा प्रचारात उतरले. ठाण मांडून बसले. (पण त्यांना लोकांनी ठोकरून लावले.)

– केजरीवाल हे आतंकवादी, अराजकवादी आहेत असा हल्ला भाजपतर्फे करण्यात आला. त्याचा उलटा परिणाम झाला. केजरीवाल म्हणाले, ‘‘मी तर हनुमानभक्त आहे.’’ केजरीवाल यांच्या हनुमानभक्तीचीही भाजपने चेष्टा केली. त्यामुळे ‘आप’ची मते वाढत गेली.

– शाहीन बागेत नागरिकता कायदाविरोधात मुसलमान धरणे धरून बसले. भाजपने त्याचा वापर हिंदू विरुद्ध मुसलमान असा केला, पण भारतीय जनता पक्षाचा सगळय़ात दारुण पराभव हिंदू मतदार बहुसंख्य असलेल्या मतदारसंघांत झाला. केजरीवाल यांना हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, दलित, शीख अशा सगळय़ांनीच मतदान केले. देशाच्या लोकप्रिय पंतप्रधानांचे व मजबूत गृहमंत्र्यांचे त्यांनी ऐकले नाही.

– केजरीवाल यांचा नागरिकत्व सुधारणा कायद्यास विरोध आहे. त्यामुळे ते फक्त मुसलमानधार्जिणे आहेत, हिंदूंनी ‘आप’ला मतदान करू नये, असा प्रचार भाजपने केला; पण हिंदू मतदार सर्व थरांतून केजरीवाल यांच्यामागे उभा राहिला.

– दिल्ली विधानसभा मतदानात ‘नौका’ डुबते आहे याची खात्री पटताच भाजपने हुकमी एक्का बाहेर काढला. प्रभू श्रीरामालाच थेट प्रचारात उतरवले. संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच पंतप्रधान मोदी हे संसदेत अवतरले व त्यांनी रामजन्मभूमी ट्रस्टची घोषणा करून राममंदिराच्या कार्यास प्रारंभ होत असल्याचे जाहीर करून टाकले. पण राममंदिराच्या घोषणेचा कोणताही ‘करंट’ दिल्ली विधानसभेत लागला नाही. राममंदिराचा उपयोग झाला नाही. कारण दिल्ली विधानसभा आपण हरणार आहोत याची कल्पना आल्यानेच भाजपने हा अखेरचा डाव खेळला अशी भावना दिल्लीकरांत बळावली व राममंदिराचा विषय दिल्लीत चालला नाही. केजरीवाल हनुमानभक्त. हनुमानाच्या छातीत राम. राम सरळ हनुमानाच्या मागे उभा राहिला. जनता राम व केजरीवाल हनुमान असं चित्र दिल्लीत दिसलं!

मोदी आणि केजरीवाल
अरविंद केजरीवाल व नरेंद्र मोदी यांच्यात समानता अशी की, दोघांचे राजकारण आत्मकेंद्रित आहे. मात्र मोदी यांच्या वागण्या-बोलण्यात जसा अहंकार, बडेजाव आहे तसा केजरीवाल यांच्यात नाही. केजरीवाल यांच्या पक्षाचे संघटन व जाळे दिल्लीपुरतेच आहे. त्यांना देश काबीज करायचे स्वप्न दहा वर्षांपूर्वी पडले होते, पण नंतर त्यांनी स्वतःच्या मर्यादा ओळखल्या. सतत तीन वेळा दिल्ली काबीज करणारे केजरीवाल लोकसभेची एकही जागा जिंकू शकले नाहीत. दिल्लीत आधी पंधरा वर्षे काँग्रेसचा मुख्यमंत्री व नंतरची पाच वर्षे ‘आप’चे राज्य. भाजप या काळात कोठेच नाही. याला कारण केजरीवाल यांनी प्रचंड काम केले. गरीब, मध्यमवर्गीयांचे पाणी व विजेचे बिल मोफत केले. यावर भाजपचा आरोप असा की, ‘फुकटगिरी’समोर राष्ट्रभक्ती पराभूत झाली. राष्ट्रभक्तीचा मक्ता एकटय़ा भाजपनेच घेतलेला नाही व 2014 च्या निवडणुकीत जनतेच्या खात्यात फुकटात पंधरा लाख टाकण्याची योजना श्री. मोदी यांची होती व त्यावरच मतदान करून घेतले. त्या पंधरा लाखांपैकी पंधरा रुपयेही कुणाच्या खात्यावर जमा झाले नाहीत. राममंदिर, 370 कलम, कश्मीर, सर्जिकल स्ट्राइक, हिंदुत्व हे सर्व विषय भाजपने जोरात लावून धरले, पण शेवटी जीवनावश्यक गोष्टी, पोटापाण्याचे विषय महत्त्वाचे ठरले व लोकांनी केजरीवाल यांना उचलून डोक्यावर घेतले. जे भाजपला मतदान करणार नाहीत ते देशद्रोही असे भाजपचे प्रचारक सांगत होते. दिल्ली ही देशाची राजधानी. दिल्लीने भाजपच्या विरोधात मतदान केले. आता संपूर्ण दिल्लीला देशद्रोही ठरवणार काय? केजरीवाल यांच्या विजयानंतर लाखो लोक रस्त्यावर उतरले. ते ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देत होते. ही देशभक्ती भाजपास मान्य नाही काय?

संघटनेचे जाळे!
केजरीवाल यांनी संघटन व कामाच्या जोरावर दिल्ली विधानसभा सलग तिसऱयांदा जिंकली! त्यांचे आधी 67 आमदार होते, आता 62 झाले. पंतप्रधानांसह इतका मोठा फौजफाटा असूनही भाजप 3 वरून जेमतेम 8 वर पोहोचला. भाजपने सर्वस्व पणास लावले ते गमावले. काँग्रेसकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते. दिल्लीला स्वतःची अस्मिता नाही, स्वतःची लोकसंख्या नाही. संपूर्ण देशातून आलेले लोक दिल्लीत आहेत. त्यांनी भाजपचा पराभव केला. राज्याराज्यांतील प्रादेशिक पक्षांनी यापासून काहीतरी शिकायला हवे. भाजप महाराष्ट्र, प. बंगाल, तेलंगणा, ओडिशात मुसंडी मारतो, पण दिल्लीत त्यांचे पानिपत केजरीवाल करतात. याचा अर्थ असा की, श्री. नरेंद्र मोदी व अमित शहा हे देशाच्या पदावर आहेत, पण जगज्जेते नाहीत. केजरीवालसारखे फाटके लोकही त्यांचा पराभव करू शकतात. दिल्लीत केजरीवाल 70 जागा लढवून 62 जागा जिंकतात. महाराष्ट्रात शंभरावर जागा लढवून शिवसेना, राष्ट्रवादीसारख्या प्रबळ प्रादेशिक पक्षांना 60चा टप्पा गाठता येत नाही. केजरीवाल यांनी त्यांची जमीन सोडली नाही. धर्म, जात, प्रदेश यापलीकडचे राजकारण त्यांनी केले. भारतीय जनता पक्षाला ‘धर्म’ हाच आधार वाटतो. पण प्रत्यक्ष श्रीरामाला मैदानात उतरवूनही हनुमानभक्त केजरीवाल यांनाच विजय प्राप्त झाला. कारण दिल्लीत त्यांनी ‘रामराज्य’ आणले. देशातील सर्वच राजकीय पक्षांनी धडा घ्यावा व पुढे जावे असा दिल्लीचा विजय आहे.

मतदार बेईमान नाहीत हाच केजरीवाल यांच्या विजयाचा खरा अर्थ! भाजपने आता देशभक्ती आणि देशद्रोह यांच्या नव्या व्याख्या शोधीत बसावे.

भारतीय जनता पक्षाची देशभक्तीची व्याख्या वेगळी आहे. पाकिस्तानसारख्या दुष्मनाशी लढणे, घुसखोरांना हाकलणे, 370 कलम काढणे, सतत ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणा देणे हे कर्तव्यच आहे. पण उत्तम शिक्षण, आरोग्य सुविधा, वीज, पाणी आणि निवारा पुरविणे ही त्याहून मोठी देशभक्ती आहे. गेल्या एक वर्षात दोन कोटींवर लोकांनी रोजगार गमावला. यास तुम्ही देशभक्ती म्हणाल काय? धर्माशिवाय देश नाही, पण धर्म म्हणजे देशभक्ती नाही. दिल्लीचा निकाल तेच सांगतोय.

Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या