रोखठोक – फैज अहमद फैज! नाम ही काफी है!!

6253

rokhthokफैज अहमद हे पाकिस्तानी लष्करशहाचे शत्रू ठरले. आता हिंदुस्थानात भाजपने त्यांना ‘हिंदूद्रोही’ वगैरे ठरवले. फैज यांनी जिवंतपणी पाक लष्करशहांचे सिंहासन गदागदा हलवले. फासावर जाता जाता ते बचावले. हिंदुस्थानात त्यांच्या कवितांना वधस्तंभावर चढवण्याचे उद्योग झाले. ‘हम देखेंगे’ असे फैज तरीही गर्जत राहिले.

हिंदुस्थानात क्रांतीचे साहित्य नेहमीच निर्माण झाले आहे. वीर सावरकरांचे साहित्य तर प्रसिद्धीपूर्वीच जप्त झाले. तो इंग्रजांचा काळ होता. त्या काळात जे झाले ते आज होऊ नये. मात्र तशीच सरकारी भावना असेल तर, ‘अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ हे सुरेश भटांचे गीतसुद्धा क्रांतीस चिथावणी देणारे, देशविरोधी ठरू शकते.

रशियात एकेकाळी राजकीय विरोधकांना क्रांतीचे शत्रू ठरवून छळछावण्यांत किंवा तुरुंगात पाठवले जात होते. चीनमध्येही तेच घडत राहिले. इराक, हिटलरच्या जर्मनीत यापेक्षा वेगळे घडत नव्हते. आज आमच्या देशात सरकारविरोधी बोलणाऱयांना देशद्रोही ठरवले जात आहे. क्रांतीचे शत्रू आणि देशाचे शत्रू यांत मी फारसा फरक करीत नाही. दीपिका पदुकोण ही जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गेली व ज्या मुलांवर निर्घृण हल्ले झाले त्या मुलांना भेटून तिने मूक संवेदना व्यक्त केली. त्यामुळे दीपिका हिंदुस्थानातील क्रांतीची शत्रू ठरली आहे. भविष्यात तिचा मार्ग खडतर केला जाईल. तिच्या जाहिरातींवर बंदी येत आहे. या सगळय़ात धक्कादायक घडले ते महान कवी फैज अहमद फैज यांच्याबाबतीत. जेएनयूतील हल्ला प्रकरणानंतर फैज यांना हिंदूद्रोही, देशद्रोही ठरवले. फैज आज त्यांचा बचाव करायला जिवंत नाहीत. फैज यांच्यासारख्या कवीला देशाच्या सीमा व धर्माची बंदी जखडून ठेवू शकत नाही.

हम भी देखेंगे!
फैज अहमद फैज यांच्या एका क्रांतिकारी कवितेवरून देशातील मूर्ख धर्ममार्तंडांनी आता वाद निर्माण केला. फैज यांनी या मंडळींचे काय घोडे मारले? देशात सध्या नागरिकता सुधारणा कायद्यावरून वादळ उठले आहे. या कायद्याच्या विरोधात अनेक विद्यापीठांतील तरुण वर्ग आंदोलनात उतरला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रक्तपात झाला. कानपूर आय.आय.टी.चे विद्यार्थी आंदोलनात उतरले. आंदोलनात उतरलेल्या एका विद्यार्थ्याने फैज यांची एक क्रांतिकारी कविता सगळय़ांसमोर गाऊन दाखवली.

हम देखेंगे
लाजिम है की,
हम देखेंगे!

या कवितेनंतर तेथील वातावरण भारावून गेले. सर्वच विद्यार्थी एका सुरात हे गीत गाऊ लागले. यावर एका विद्यार्थ्याने आय.आय.टी. प्रशासनाकडे तक्रार केली. फैजचे हे गीत हिंदूविरोधी आहे व त्यातील काही शब्दांमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या. यावर कानपूर आय.आय.टी.ने एक चौकशी समिती नेमली. हा सर्व प्रकार मूर्खपणाचा व हास्यास्पद आहे. देशाचा एक वर्ग स्वातंत्र्य, अभिव्यक्ती यावर गदा आणून देशात तालिबानी संस्कृतीचे रोपण करीत आहे. त्यांना भगवद्गीताही धड कळली नाही. त्यामुळे त्यांना फैजसारख्या कवींचा स्वातंत्र्य, लोकशाहीसाठी तळमळणारा आत्माही समजणार नाही. फैज धर्म मानत होते की नाही यावर कुणीही ठामपणे सांगू शकणार नाही. ‘लाजिम है, हम भी देखेंगे’ या कवितेचा जन्म एखाद्या उसळणाऱ्या लाव्ह्याप्रमाणे क्रांतीच्या उदरातून झाला आहे. पाकिस्तानचा क्रूर लष्करशहा झिया उल हक याच्या दडपशाहीविरोधात फैजच्या लेखणीतून 1979 साली हे गीत निघाले व जगभराचे क्रांतिगीत ठरले. फैजच्या क्रांतिकारी लेखणीला पाकिस्तानचे हुकूमशहा थरथर कापत होते. झिया उल हकने फैज यांना बेडय़ा ठोकल्या व तुरुंगात ढकलले. अशा तुरुंगवासाला फैज घाबरत नव्हते. त्यांनी त्याची सवय करून घेतली होती. फैजच्या ज्या कवितेस पाकिस्तानचे हुकूमशहा घाबरत होते त्याच कवितेस हिंदुस्थानचे राज्यकर्ते घाबरत आहेत. क्रांतीच्या कवीची हीच व्याख्या आहे.

तुरुंगवास
बोल की लब आजाद हैं तेरे
बोल जुबाँ अब तक तेरी है
तेरा सुतवा जिस्म है तेरा
बोल की जाँ अब तक तेरी है…

असे सांगणारा फैज कोण्या एका धर्माचा कसा असेल? फैजचा जन्म पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये 1911 मध्ये झाला. त्याने इंग्रजी आणि अरबीत एम.ए. केले. त्याने इंग्रज युवती एलिस जॉर्जबरोबर लग्न केले. त्याने सैन्यात प्रवेश केला व कर्नलच्या हुद्दय़ापर्यंत पोहोचला, पण त्याचा क्रांतिकारी विद्रोही स्वभाव स्वस्थ बसू देत नव्हता. पाकिस्तानातील लोकशाही स्वातंत्र्याचा गळा घोटणाऱ्या राजवटींनी तो गुदमरू लागला. तो याविरोधात खुलेआम बोलू लागला, लिहू लागला. एक दिवस व्हायचे तेच झाले. 1951 साली त्याला पाकिस्तानी लष्करशहाने अटक केली. सरकार उलथवण्याच्या कुख्यात रावळपिंडी कटात त्याचा सहभाग असल्याचे सांगून तुरुंगात डांबले. आत त्याचे अतोनात हाल झाले. चार वर्षे तो हा छळ सहन करीत होता. याच काळात त्याचे क्रांतिकारी काव्य जन्मास आले. वीर सावरकरांनी तुरुंगात काव्य लिहिले. तसे फैजनेही लिहिले. तो तुरुंगाबाहेर आला. कराचीतील एका कॉलेजचा प्रिन्सिपॉल म्हणून काम करू लागला. पुढे ‘पाकिस्तान टाइम्स’चा संपादक झाला, पण सरकारी दडपशाहीविरुद्ध सतत बंडाच्या ठिणग्या टाकत राहिला. अखेरचा श्वास घेईपर्यंत त्याची ही लढाई थांबली नाही. त्याची पाकिस्तानातूनच हकालपट्टी झाली. तेव्हा तो बैरुतला गेला. फैजने पाकिस्तानच्या सर्वच हुकूमशहांना सळो की पळो करून सोडले व आता मृत्यूनंतर हिंदुस्थानात त्याच्या नावाच्या वावटळी उठल्या.

वाजपेयी भेटले
मुझ से पहली सी मोहब्बत मेरी महबूब न माँग!
हे रोमँटिक गीतसुद्धा फैजचेच आणि-
बस नाम रहेगा अल्ला का
जो गायब भी है हाजिर भी
जो मंजर भी है नाजिर भी
उठेगा अन-हल-हक का नारा
जो मैं भी हूं और तुम भी हो…

फैजच्या या ओळींनी देशाचे वातावरण तापवून सोडले आहे.

या गाण्याचा अर्थ समजून न घेता त्यावर हिंदूविरोधी ठपका मारण्यात आला. फैज यांना आज भारतीय जनता पक्षाचे समर्थक विरोध करीत आहेत, पण याच फैजना भेटून अटलबिहारी वाजपेयींना एकदा अश्रू अनावर झाले होते. हा किस्सा आहे 1977-78 चा. देशात प्रथमच जनता पक्षाचे बिगर काँग्रेजी सरकार आले होते. अटलबिहारी वाजपेयी त्या सरकारमध्ये विदेश मंत्री होते. ते पाकिस्तानच्या अधिकृत दौऱ्यावर गेले. विदेश मंत्र्यांचा एक प्रोटोकॉल असतो. त्यांनी काय करायचे, कुठे राहायचे, कुठे जायचे, कुणास भेटायचे हे सर्व शिष्टाचार ठरलेले असतात. अटलबिहारींसाठीही हाच प्रोटोकॉल होता. वाजपेयींनाही तो पाळायलाच हवा होता, पण वाजपेयी ऐकायला तयार नव्हते. त्यांना इस्लामाबादेत काही करून फैजना भेटायचे होते, पण तेथील सरकार व हिंदुस्थानी दूतावास परवानगी देत नव्हते. शेवटी प्रोटोकॉलची बंधने तोडून वाजपेयी फैजना भेटायला त्यांच्या घरी गेले. फैज तेव्हा आशयाई आफ्रिकन लेखक संघाचे अध्यक्ष होते. बैरुत, जे लेबनॉनमध्ये आहे, तेथून काम करीत होते. त्या काळात तेदेखील पाकिस्तान भेटीवर आले होते. वाजपेयी व फैज यांच्या विचारधारा दोन ध्रुवाच्या होत्या. तरीही दोघे भेटले. एकमेकांची गळाभेट झाली. अटल बिहारी यांनी फैजचा हात हातात घेऊन सांगितले, ‘मी फक्त एक शेर ऐकण्यासाठी आपणास भेटू इच्छित होतो.’ फैजनी विचारले, ‘कोणता शेर?’ अटलजींनी तो शेर फैजनाच ऐकवून दाखवला.

मकाम फैज कोई राह में
जचा ही नहीं
जो कु-ए-यार से निकले
तो सू-ए-दार चले
(कू-ए-यार म्हणजे प्रियतमा किंवा तिची गल्ली आणि
सू-ए-दार, म्हणशे मृत्यूचा रस्ता.)

आपला शेर अटलजींच्या तोंडून ऐकताच फैज भावुक झाले. त्यांनी ती संपूर्ण गझल अटलजींना ऐकवली. दोघांनी बराच वेळ एकत्र घालवला. अटलजींनी फैजना हिंदुस्थानात येण्याचे निमंत्रण दिले व निरोप घेतला. फैज त्यानंतर 1981 मध्ये हिंदुस्थानात आले व त्यांनी अटलजींची भेट घेतली.

फाशीची तयारी
ज्या ‘लाजिम है…’ पंक्तीवरून हिंदुस्थानात गोंधळ सुरू आहे ती गजल फैज यांनी 1979 साली लिहिली होती. जानेवारीचा महिना होता. फैज तेव्हा पाकिस्तानच्या मॉन्टोगुमरी जेलमध्ये होते. 1951 ते 1955 पर्यंत पाकिस्तानी तुरुंगात ते होते व त्यांच्यावर राजद्रोहाचा, बंडास चिथावणी दिल्याचा आरोप होता. फैज जेलमध्ये असताना त्यांच्यावर जे आरोपपत्र दाखल झाले त्यानुसार फैजला फासावरच लटकवले जाईल, असेच सगळ्यांनाच वाटत होते. पण फैजवर शेवटी आरोप सिद्ध झाले नाहीत. ते सुटले. फैज पाकिस्तान आणि हिंदुस्थानातील लोकप्रिय शायर होते आणि आहेत. यापुढेही राहतील.

सिंहासने उलथवून टाका
फैजच्या कवितांची ताकद आजच्या नव्या पिढीस माहीत नाही. डेव्हीड लोच्या व्यंगचित्रांचा धसका दुसऱया महायुद्धादरम्यान हिटलरने घेतला होता. डेव्हीड लो यास ‘जिंदा या मुर्दा’ हजर करण्याचे आदेश हिटलरने दिले होते. पाकिस्तानच्या बहुतेक सर्व हुकूमशहांनी फैजचा असाच धसका घेतला होता. 13 फेब्रुवारी 1986. पाकिस्तानात फैज अहमद फैजच्या निधनानंतर त्याच्या पहिल्या जयंतीचा कार्यक्रम होता. लोकांची गरिबी, भूक, बेरोजगारी, लोकशाहीची हत्या अशा अनेक वेदना फैजच्या मनात उसळत व कवितेतून व्यक्त होत. आशूक-माशूकचा रोमान्स यांशिवाय इतर अनेक विषय आहेत ज्यावर लेखणी चालायला हवी. ते काम फैज यांनी केले. फैज यांच्या कवितेची ओळ न् ओळ सिंहासनावर बसलेल्या लोकांच्या काळजाचा थरकाप उडवीत असे. पाकिस्तानचे सत्ताधारी त्यांना घाबरत होते. फैज त्या काळात झिया उल हक याला आपल्या लेखनातून सतत आव्हान देत होते. त्यामुळेच त्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाचे नाव होते ‘फैज मेला.’ झिया उल हक हा असा खतरनाक हुकूमशहा होता, ज्याने पाकिस्तानात इस्लामी धर्मांधता व दहशतवादाला उत्तेजन दिले. शालेय शिक्षणापासून न्यायदानापर्यंत इस्लामचाच प्रचार करण्याचे त्याचे फर्मान होते. त्याचे फर्मान असे होते की, देशात कोणीही काळय़ा रंगाचा वापर करायचा नाही. पाकिस्तानात काळय़ा रंगावर त्यावेळी बंदीच आणली गेली. कशासाठी? तर काळा रंग आंदोलने व निषेधासाठी वापरला जातो म्हणून. त्या वेळीच या हुकूमशहाच्या नाकावर टिच्चून लाहोरच्या अल हमरा आर्ट कौन्सिलमध्ये इतिहास घडला. स्टेजवर एक महिला मेकअप करून काळय़ा रंगाच्या साडीत आली. प्रेक्षकांत सन्नाटा पसरला. कारण झिया उल हकने साडीवरही बंदीहुकूम बजावला होता. झियाच्या मते साडी हिंदू महिलांचा पेहराव आहे, मुसलमान महिलांचा नाही. या काळय़ा साडीतल्या महिलेने झिया उल हकच्या फतव्याच्या चिंधडय़ा चिंधडय़ा उडवल्या. तिने स्टेजवर एक गीत गायला सुरुवात केली. हे गाणे कोणते? तर फैज अहमद फैज यांची रचना होती-

हम देखेंगे… लाजिम हैं की हम देखेंगे

त्याबरोबर तेथे जमलेल्या हजारो लोकांत विजेचा संचार झाला. एक ऊर्जेची लाट तेथे उसळली. त्या गायिकेचा आवाज घुमू लागला व तिच्याबरोबर हजारो लोक ‘इन्कलाब झिंदाबाद’चे नारे देत, फैजचे गाणे तिच्या सुरात गाऊ लागले. ‘इन्कलाब झिंदाबाद’चे नारे प्रत्येक कोपऱयात घुमू लागले. त्या महिलेचे नाव होते इक्बाल बानो. या रचनेतून पुन्हा पाकिस्तानात क्रांतीची ठिणगी पडली. फैज मृत्यूनंतरही तितकाच शक्तिमान ठरला. कुणी तरी इक्बाल बानोचे हे गाणे रेकॉर्ड केले. (त्यावेळी इंटरनेट वगैरे नव्हते.) रातोरात एडिट केले व हा सर्व सोहळा त्या माध्यमातून दिल्लीपर्यंत पोहोचला. त्यानंतर या गाण्यावर पाकिस्तानात बंदी आणली गेली. आता कानपूर आय.आय.टी.त तेच गाणे ‘हिंदूविरोधी’ ठरवून चौकशीच्या फेऱयात अडकले. हे क्रांतीचे आणि स्वातंत्र्याचे भोग आहेत. पाकिस्तानच्या हुकूमशहांनी फैज यांना जिवंतपणी तुरुंगात टाकले. आपल्याकडे त्यांना कबरीतून काढून हिंदूविरोधी म्हणून फासावर लटकवतील.

फैज यांनी त्यांच्या कवितेत सिंहासन उलथवण्याची व पुतळे, मूर्ती उलथवण्याची भाषा केली. या सर्व प्रतिमा आणि प्रतीके आहेत. उठा, लढा, स्वातंत्र्याचा एल्गार करा हीच त्यामागची प्रेरणा आहे, पण देशातील शेंडीबाज, तालिबान्यांना वेगळे काहीतरी करायचे आहे. फैज यांच्यासारख्या कवींना देश नसतो. धर्म नसतो. त्यांच्या अंतरात उसळणाऱया वेदनेच्या ठिणग्या हाच त्यांचा धर्म. आपण तो मान्य केला पाहिजे.

– @rautsanjay61
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या