रोखठोक – मराठी रंगभूमी: राजाश्रय आहेच, लोकाश्रय कसा मिळेल?

134

rokhthokमुलुंड येथे पार पडलेल्या ९८ व्या मराठी नाट्य संमेलनात नवीन काय घडले? मराठी निर्मात्यांना नाट्यगृहांची भाडी परवडत नाहीत, ती कमी करा अशी मागणी पुन्हा झाली. सोमवार ते शुक्रवार हा मराठी नाटकांचा मंदीचा काळ. या दिवशी प्रेक्षक मिळाले तर नाट्य व्यवसाय भरभराटीस येईल. मराठी रंगभूमीस राजाश्रय जुनाच आहे, लोकाश्रयासाठी काय करायचे?

मराठी नाट्यसृष्टीचे भवितव्य चांगले आहे’’ असा संदेश देऊन ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे सूप वाजले तेव्हा मी त्या भव्य शामियान्यातच होतो. सतत साठ तास हा नाट्य सोहळा चालत राहिला व रसिकांनी त्यास उदंड प्रतिसाद दिला. या समारोपप्रसंगी श्री. सुशीलकुमार शिंदेंनी उत्तम भाषण केले व ‘‘राजकारण्यांनी मराठी साहित्य संमेलन व मराठी नाट्य संमेलनाच्या मंचावर येण्यात गैर काय?’’ असा प्रश्न विचारला. शिंदे यांचा रोख ‘सामना’तील याच स्तंभातील लेखावर असावा. सर्वच कलांना राजाश्रय हवा. तो देणे आपले कर्तव्य आहे, पण ‘मराठी’चे मारेकरी म्हणून जे हातात सुरे घेऊन वावरतात व मराठी भाषा, मराठी माणसांचा द्वेष करतात अशा उपऱ्या राजकारण्यांनी अशा मंचावर पायही ठेवू नये आणि ‘मराठी बाणा’ असलेल्या आयोजकांनी त्यांना मंचावर येण्यापासून रोखावे एवढय़ापुरताच तो विषय मर्यादित होता. अशा मराठीद्वेष्ट्यांना मराठी सारस्वतांच्या सोहळ्यात सन्मानित करणे म्हणजे औरंगजेबास रायगडावर व अफझलखानास प्रतापगडावर पायघडय़ा घालून स्वागत करण्यासारखे आहे. एका बाजूला शालेय शिक्षणात एक भाषा म्हणून मराठीला विरोध करायचा व दुसऱ्या बाजूला मराठी नाट्य संमेलनाच्या दिंडीत सगळय़ात पुढे नाचायचे, माझा विरोध या ढोंगास आहे.

राजकारणी व नाटक
राजकारणी असणे हा गुन्हा नाही. मच्छिंद्र कांबळी हे नाटय़ चळवळीतले बिनीचे शिलेदार. ‘वस्त्रहरण’सारखे मालवणी नाटक त्यांनी रंगमंचावर आणले व त्याचे हजारो प्रयोग केले. श्री. कांबळी हे ‘चळवळे’ होते व ते राजकीय आखाड्यात होते म्हणून त्यांची नाट्यसेवा कमी झाली नाही. कांबळी यांचे तरुण पुत्र प्रसाद कांबळी आता नाट्य परिषदेचे अध्यक्ष झाले व मुलुंडचे ९८ वे मराठी नाट्य संमेलन त्यांनी सगळ्यांना घेऊन यशस्वी केले. संगीत नाटकाचे ‘पंडितराज’ विद्याधर गोखले हे शिवसेनेचे खासदार होते व नाट्य मंदारचे राजाराम शिंदे हे काँग्रेसचे आमदार होते. नाना पाटेकर हे मनाने शिवसैनिक आहेत व अनेक राजकीय व्यासपीठांवरून ते त्यांची मते मांडत असतात. नटाला, अभिनेत्याला स्वतःचा राजकीय विचार हवा. वीर सावरकर हे राजकारणी म्हणून जसे थोर तसे नाटककार व कवी म्हणून थोर होते. सुशीलकुमार शिंदे हे राजकारणी कमी व रसिक जास्त. सुरुवातीच्या काळात मराठी नाटकांत ते ‘स्त्री पार्टी’ करीत असा स्फोट त्यांनी केला. शिवसेनेचे मोठे नेते दत्ताजी साळवी यांनी रंगमंचावर ‘संभाजी’ अजरामर केला व आता शिवसेनेचेच अमोल कोल्हे यांनी संभाजीराजांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. यशवंतराव चव्हाण हे एक रसिक म्हणून मराठी नाटकांना गुपचूप येऊन बसत. देशाचे गृहमंत्री म्हणून सुरक्षा व राजशिष्टाचाराची कवचकुंडले लांब उभी करून ‘थँक यू मि. ग्लॅड’ या नाटकास शिवाजी मंदिरला आलेले मी पाहिले. नाटक संपल्यावर ते लेखक अनिल बर्वेंना पडद्यामागे जाऊन भेटले. ही परंपरा संपलेली नाही, पण ज्या पक्षाची सत्ता फक्त त्याच पक्षाचा मंचावर वावर हे घडू नये.

भांडण आणि नाटक
‘‘मराठी माणूस जिथे जातो तिथे भांडण करतो आणि नाटक करतो,’’ असे पु. ल. देशपांडे म्हणत. अमेरिकेतील शिकागोचे मराठी मंडळ ही त्या खंडातील मराठी चळवळीची गंगोत्री. तेथील मराठी लोकांनी पहिले मराठी नाटक केले. आजही काही निर्माते आपली नाटके घेऊन परदेश भ्रमण करतात व त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो, पण ‘मराठी’ नाटक कुठेही गेले तरी त्यांचे एक दुखणे कायम असते. ते म्हणजे मराठी नाटकांना थिएटर मिळत नाहीत व जी आहेत ती परवडत नाहीत. नाट्यगृहे सरकारने किंवा महानगरपालिकांनीच उभारावीत या भूमिकेतून आपण अद्यापि बाहेर पडलेलो नाही. आजही मराठी नाटकं शिवाजी मंदिर, दीनानाथ, फार तर कालिदास नाट्य मंदिरच्या पलीकडे जायला तयार नाहीत. वांद्रे येथील बालगंधर्व नाट्यगृहाचे ७५ हजार रुपये भाडे परवडत नाही अशी वेदना नाट्य संमेलनात मांडण्यात आली आणि श्री. उद्धव ठाकरे यांनी त्यात लक्ष घालण्याचे वचन दिले. ठाण्यात काशीनाथ घाणेकर नाट्यगृह उभे राहिले. तिथे नाटके होत नाहीत. त्यामुळे सगळा भार पुन्हा गडकरी रंगायतनवर पडतो. पुण्यात तो बालगंधर्ववर आणि नवी मुंबईत विष्णुदास भावेवर येतो. ही सर्व नाट्यगृहे महापालिकांची. यापैकी अनेक नाट्यगृहांची डागडुजी नसते हा नट व नाट्य निर्मात्यांचा मुख्य आक्षेप. नरीमन पॉइंटच्या एनसीपीएपर्यंत अद्यापि मराठी नाटक पोहोचले नाही. नाट्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून शरद पवार यांनी नाट्यगृहाची व्यथा मांडली व आपल्या बारामतीत दोन उत्तम नाट्यगृहे कशी उभी केली ते सांगितले, पण मराठी नाटकाला ‘आठवड्या’चा प्रेक्षक नाही. शनिवार आणि रविवार हाच प्रेक्षकांचा दिवस. त्यामुळे १७५ वर्षांची मराठी रंगभूमी आज सोमवार ते शुक्रवार प्रेक्षकांच्या शोधात असते.

लंडनचा आदर्श
मराठी लोक नाटकवेडे आहेत, पण त्या वेडास मर्यादा पडल्या आहेत. सर्व नाटके आता ‘टीव्ही’वरच होतात. मराठी टीव्ही चॅनल्स आता सिनेमा, नाटकांची निर्मिती करू लागली. मराठी मालिकांमुळे रंगमंचावर काम करणाऱ्या मोठय़ा वर्गास कायमस्वरूपी रोजगार मिळाला हे मान्य करावेच लागेल. वि. वा. शिरवाडकर, वसंत कानेटकर, त्याआधी गडकरी, खाडिलकर असे महान नाटककार निर्माण झाले. त्यांची नाटके तुफान चालली. लंडनच्या लोकांच्या नाटकप्रेमामुळे एकामागोमाग एक याप्रमाणे नाट्यगृहे उभी होत गेली. लंडनमध्ये 21 नाट्यगृहे उभी राहिली तेव्हा पॅरिसमध्ये पहिले नाट्यगृह उभारले गेले. याखेरीज काही सराया होत्या. त्यांच्या पुढचा चौक ऐसपैस असे आणि तिथे नाटकांचे प्रयोग होत. लोकांना पावसात उभे राहून नाटक पाहायला लागू नये अशा रीतीने बरबेजने नाट्यगृह बांधले. तीन हजार प्रेक्षक सामावतील इतके मोठे ते होते. हॅम्लेट, ऑथेल्लो, मॅकबेथ व किंग लियर या चार शोकांतिकांनी इतिहास निर्माण केला. शेक्सपियरने ही नाटके वेगळय़ा उंचीवर नेली. शेक्सपियरला यश व पैसा मिळत गेला, त्याबरोबर त्याने लंडनमधल्या नाट्यगृहांत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. प्रथम त्याने बरबेजच्या बरोबरीने ग्लोब या नाट्यगृहात गुंतवणूक केली. मग ब्लॅकफायर्स. अनेक बंद पडलेल्या ‘चर्च’चे रूपांतर त्याने नाटय़गृहांत केले व त्यात गुंतवणूक केली. आपल्याकडे किती नट व नाटककारांनी हे केले?

उत्तम दर्जा
मराठी नाटकांचा दर्जा आजही उत्तम आहे. नेपथ्य, दिग्दर्शन, संहितेत नव्या पिढीने नवे प्रयोग सुरू केले, पण आजही मोठय़ा आर्थिक उलाढालीचे गणित जमलेले नाही. अशोक सराफ, निळू फुले, भरत जाधव ही नावे मराठी चित्रपटांत स्थिरावली, पण त्यांचे मूळ मराठी रंगभूमीवर आहे. मुलुंडच्या मराठी नाट्य संमेलनात भरत जाधव, गिरीश ओक, सुबोध भावे, शरद पोंक्षेपर्यंत नटमंडळी कार्यकर्त्यांच्या भूमिकेत वावरली. ‘नाटक’ अमर आहे. मराठी नाटकाला राजाश्रय आहेच, पण सोमवार ते शुक्रवार ‘लोकाश्रय’ हवा आहे. तो मिळवायलाच हवा.

Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या