रोखठोक – आणखी एक कश्मीर फाईल!

rokhthok

‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची सध्या चर्चा सुरू आहे. 32 वर्षांनंतर खरा इतिहास समोर आल्याचा दावा भाजपसारख्या पक्षाकडून होतोय. स्वतः पंतप्रधान मोदी हे या चित्रपटाचे मुख्य प्रचारक बनले आहेत. सत्य दडपून इतिहास कसा दाखवणार? कश्मीरबाबतचे खरे सत्य अद्याप पडद्यावर यायचे आहे.

उत्तर प्रदेशसह चार राज्यांतील विधानसभा निवडणुका भाजपने जिंकल्या. पंतप्रधान मोदी त्यानंतर लगेच गुजरातला गेले. दोन दिवसांचा विजय उत्सव तिथे साजरा केला. कारण पुढील निवडणुका गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशात आणि जम्मू-कश्मीरमध्ये आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीआधी ‘हिजाब’चा मुद्दा भाजपने लावून धरला. त्या निमित्ताने हिंदू-मुसलमान अशी दरी निर्माण केली. धर्म आणि जात याबाबत कमालीचा द्वेष निर्माण केला की लोकांना जगण्या-मरण्याच्या प्रश्नांचा विसर पडतो. हे सर्व प्रश्न ‘हिजाब’मध्ये बांधून गंगेत फेकले आणि वाहून गेले. आता पुढच्या निवडणुका जिंकण्यासाठी संघ परिवाराच्या प्रेरणेने ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट पडद्यावर आणला आहे. या चित्रपटाच्या प्रचाराची सूत्रे स्वतः पंतप्रधान मोदी यांनी हातात घेतली. कश्मीरच्या बाबतीत देशाला खरा इतिहास 32 वर्षांनंतर समजतोय असे या निमित्ताने सांगितले जात आहे. भाजपशासित राज्यांत हा चित्रपट करमुक्त केला गेला. इतकेच नव्हे तर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी आदेश काढला की, ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी पाहावा व त्यासाठी त्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली. चित्रपटाचे तिकीट दाखवा आणि सुट्टी घ्या. हा सर्व प्रकार मजेशीर म्हणावा लागेल! देशाच्या जनतेला कोणत्या गुंगीत व अफूच्या धुंदीत ठेवण्याची प्रयोगशाळा उघडली जात आहे, त्याचे हे उत्तम उदाहरण!

कश्मीरातून हिंदू पंडितांचे झालेले पलायन, त्यांच्या हत्या, त्यांच्यावरील अत्याचार, त्यांचा आक्रोश यावर आधारलेले हे कथानक मन अस्वस्थ करते. मात्र त्यातून पुन्हा हिंदू-मुसलमान अशी तेढ निर्माण करायची व पुढच्या निवडणुका जिंकायच्या हा प्रकार जास्त अस्वस्थ करतो. गुजरात, राजस्थानसारख्या राज्यांतील निवडणुका जिंकण्यासाठी कश्मीर फाईल उघडण्यात आली. देशात आज भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण बहुमताचे राज्य आहे. गृहमंत्री श्री. अमित शहा यांनी हिमतीने कश्मीरातील 370 कलम रद्द केले. कश्मीरातून लेह-लडाख वेगळे केले व कश्मीरला सरळ केंद्रशासित राज्य बनवले. कश्मीरातील विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेचे काम संपले आहे. या पद्धतीने जम्मू प्रांतातील विधानसभेच्या जागा वाढतील व त्या प्रांताचा मुख्यमंत्रीसुद्धा एखादा हिंदू होईल. हे चित्र चांगले आहे, पण नव्वदच्या दशकात परागंदा झालेल्या कश्मिरी पंडितांची ‘घरवापसी’ हा मोदी सरकारचा मोठा कार्यक्रम होता. 370 कलम काढल्यावरही पंडितांची घरवापसी होऊ शकली नाही. हे कोणाचे अपयश आहे? ‘द कश्मीर फाईल्स’मधून गळून गेलेल्या इतिहासाचे पान सर्वत्र फडफडताना दिसत आहे.

हे काही प्रश्न!

‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट अस्वस्थ करणारा किंवा एक हिंदू म्हणून मुठी आवळायला लावेल असा असेलही, पण पंडितांचा विलाप, हिंदू समाजाचे पलायन यावर राजकीय आक्रोश करणाऱ्यांनी पुढील प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत-

–  कश्मिरी पंडितांचे पलायन व त्यांच्या हत्या यादरम्यान दिल्लीत व कश्मीरात कुणाची राजवट होती?

– कश्मिरी पंडितांवर अत्याचार झाले व हत्या झाल्या. नव्वदच्या दशकांत 24 हजार पंडितांचे पलायन कश्मीर खोऱ्यातून झाले. त्याच काळात शीख व मुसलमानदेखील मारले गेले. पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी हजारो शीख व मुसलमानांचे शिरकाण केले. सुरक्षा दलांतील असंख्य मुसलमान जवानांची हत्या करण्यात आली.

– कश्मीरातील अतिरेकी संघटनांशी सरळ हातमिळवणी करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती व त्यांच्या पक्षाशी युती करून भाजपने जम्मू-कश्मीरात सरकार कसे स्थापन केले? पंडितांच्या पलायनाचा व हत्येचा तेव्हा साधा निषेधही या लोकांनी केला नव्हता. ‘पीडीपी’ने अफझल गुरूला स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा दिला व अतिरेकी बुरहान वानीला लष्कराने खतम करताच मुख्यमंत्री मेहबुबाने लष्कराच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. तेव्हा सरकारात असलेले भाजपचे मंत्री हा सर्व प्रकार थंडपणे का सहन करीत होते?

– पाकव्याप्त कश्मीर पुन्हा जिंकून अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करण्याच्या तुमच्या घोषणेचे काय झाले?

– नव्वदच्या दशकात पाक अतिरेक्यांनी अमरनाथ यात्रा होऊ देणार नाही म्हणून धमक्या देताच यात्रेसाठी पोहोचलेल्या हिंदूंमध्ये दहशत पसरली. कश्मीर खोऱ्यातील अमरनाथ यात्रेसाठी जमलेल्या गुजरातच्या श्रद्धाळूंनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना साकडे घातले. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी अमरनाथ यात्रा उधळण्याचे कारस्थान रचणाऱ्या पाक अतिरेक्यांना सरळ शिंगावरच घेतले. अमरनाथ यात्रेसाठी आलेल्या एका जरी हिंदूंच्या केसाला धक्का लागला तरी मुंबईतून काय, तर देशातून हजला जाणारे एकही विमान उडू देणार नाही, असे ठणकावताच अतिरेकी थंड झाले. त्या काळात भाजपच्या एकाही नेत्याने पाठिंब्यासाठी तोंड का उघडले नाही?

– निर्वासित कश्मिरी पंडितांच्या मुलांचे शिक्षण रखडू नये, त्यांना समाजात उभे राहता यावे म्हणून शिवसेनाप्रमुखांनी महाराष्ट्रात कश्मिरी पंडितांच्या मुलांसाठी वैद्यकीय आणि इंजिनीअरिंग क्षेत्रात पाच टक्के जागा राखीव ठेवल्या. कश्मिरी पंडितांसाठी असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले आणि एकमेव राज्य होते. भाजपशासित इतर राज्यांनी हा असा निर्णय कधीच का घेतला नाही?

– 2019 च्या निवडणुकीच्या आधी कश्मीर खोऱ्यात झालेला ‘पुलवामा’ हल्ला. 40 जवानांना त्यात वीरमरण आले. हे चाळीस जवान ‘पंडित’ नसतीलही, पण एकाच वेळी इतक्या जवानांना वीरमरण कोणाच्या चुकीमुळे आले? उरी, पठाणकोट ते पुलवामा अशा हल्ल्यांनी कश्मीर घटनांची फाईल आपल्याच रक्ताने माखली नाही काय?

–  शेवटी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न! कश्मिरी पंडितांची घरवापसी कधी होणार? की त्यांचा आक्रोश, त्यांचे पलायन, त्यांचा रक्तपात यावर राजकारणच होत राहणार.

‘द कश्मीर फाईल्स’च्या निमित्ताने निर्माण झालेले हे प्रश्न आहेत. ‘द कश्मीर फाईल्स’ हा पुढच्या निवडणुकांचा अजेंडा आहे. कश्मीरातील सत्य दडपण्याचा प्रयत्न झाला, असे पंतप्रधान मोदी यांनी भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत सांगितले व ‘द कश्मीर फाईल्स’ची प्रशंसा केली. कश्मिरी पंडितांचे पलायन, त्यांचा नरसंहार हे सत्य कधीच कोणी लपवले नाही. देशभरातील निर्वासित छावण्यांत, आपल्याच देशात, आपल्याच हिंदू पंडितांना जीवन कंठावे लागले हे उघड सत्य तेव्हा होते, आजही आहे. त्यांच्या जखमांवर फुंकर घालण्याचे आणि आधार देण्याचे काम तेव्हा फक्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केले.

‘द कश्मीर फाईल्स’चे हे दडपलेले सत्य आहे!

सत्य काय आहे?

‘द कश्मीर फाईल्स’सारखे चित्रपट निर्माण व्हायला हवेत, पण अशा चित्रपटांचा सध्याचा अजेंडा हा राजकीय विरोधकांबाबत द्वेष आणि भ्रम फैलावणे असाच झाला आहे. याच चित्रपटाच्या निर्मात्याने ‘द ताश्कंद फाईल्स’ हा चित्रपट बनवला होता. तोदेखील एका विशिष्ट गटाचाच अजेंडा ठरला. लाल बहाद्दूर शास्त्रींच्या मृत्यूला फक्त गांधी परिवार जबाबदार असल्याचा ‘प्रपोगंडा’ या चित्रपटातून करण्यात आला. चित्रपट निर्मितीमागचा जणू तोच एकमेव हेतू होता. देशाचा इतिहास फक्त पुस्तकांतूनच बदलला जात नाही, तर आता चित्रपटांसारख्या माध्यमांतूनही तो बदलण्याचा प्रयत्न होतोय. भारतीय जनता पक्ष व संघ परिवाराने आता काय सांगितले? तर रिचर्ड ऍटनबरोने गांधींवर चित्रपट निर्माण करेपर्यंत महात्मा गांधी जगाला माहीत नव्हते. त्या चित्रपटामुळे ते जगाला माहीत झाले! आता 32 वर्षांनंतर कश्मिरी पंडितांबाबतचे सत्य त्याच माध्यमांतून जगासमोर येत आहे. या चित्रपटात एक डायलॉग आहे, ‘‘खोट्या बातम्या दाखवणे हा इतका मोठा गुन्हा नाही, जितका मोठा गुन्हा सत्य बातम्या दडपणे हा आहे!’’ ‘द कश्मीर फाईल्स’मध्ये सत्य बातम्या दाखवताना इतर अनेक प्रखर सत्य दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. कश्मीरचा माहोल 32 वर्षांपूर्वी फक्त कश्मिरी पंडितांसाठीच खराब नव्हता, तर सगळ्यांसाठीच खराब होता आणि कश्मिरी पंडित त्यात सगळय़ांत जास्त भरडून निघाले. त्या वातावरणात पंडितांबरोबरच कश्मिरी शीख, मुसलमानांच्याही हत्या झाल्या. कश्मिरात पहिली राजकीय हत्या नॅशनल कॉन्फरन्सचा नेता मोहम्मद युसूफ हलवाईची यांची ऑगस्ट 1989 मध्ये झाली. त्या आधी प्रशासकीय अधिकाऱ्यावर जो पहिला हल्ला झाला होता तो पोलीस महानिरीक्षक जी. एम. बटालीवर. त्यात बटालीचा अंगरक्षक ठार झाला. त्यानंतर थोड्याच दिवसांत बटालीचे लहान भाऊ गुलशन बटालींची हत्या करण्यात आली. अशा अनेक गोष्टींचे सत्य ‘द कश्मीर फाईल्स’मधून लपविले गेले आहे. 1947 नंतर 43 वर्षे कश्मिरी पंडितांवर पळून जाण्याची नौबत कधीच आली नव्हती. 1990 साली 4 लाख हिंदू-शिखांना कश्मीर सोडण्यास भाग पाडले. तेव्हा केंद्रात भाजपच्या पाठिंब्यावर व्ही. पी. सिंगांचे सरकार होते. भाजपचे नेते जगमोहन हे कश्मीरचे राज्यपाल होते. खोऱ्यांत हिंदू मरत होते, पळत होते तेव्हा ‘कश्मीर फाईल’ थंड बासनात पडून होती. मुंबईतून एकच आवाज कश्मीरातील हिंदूंसाठी गर्जत होता, तो म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे!

Twitter – @rautsanjay61
Email – [email protected]