रोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता

394


rokhthokएकेकाळी ‘लखनौ’ शहर म्हणजे कमालीचे बकाल. मोगली नबाबी पद्धतीचे पडके वाडे हाच लखनौचा चेहरा. आता हे शहर बदलत आहे. भगव्या वस्त्रातील शासनप्रमुख योगी आदित्यनाथ यांनी नवे काही घडविण्याचे योजले आहे. यादवांच्या राजवटीतील गुन्हेगारी मोडून पडली आहे. उत्तर प्रदेशातून काँग्रेस, स.पा. व बसपाचे दिवस संपले आहेत. योगींनी राज्याची पकड घेतली आहे हे स्पष्ट दिसते.

योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात दोन दिवस होतो. अलिगढ येथील टप्पल येथे अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या झाली. टप्पल घटनेचे पडसाद योगी सरकारच्या प्रशासनात, राजकीय वर्तुळात व खासकरून मीडियात उमटलेले दिसले. उत्तर प्रदेशातील अभूतपूर्व विजयाबद्दल जो मीडिया योगी यांच्या नेतृत्वाचा, मोदी यांच्या करिश्म्याचा जयजयकार करीत होता, तोच मीडिया योगी सरकारला ‘टप्पल’ घटनेबद्दल जबाबदार धरत होता. एखाद्या घटनेचे राजकारण, जातकारण व धर्मकारण कसे होते याचे टप्पल हे मोठे उदाहरण. ‘टप्पल’ची घटना हा भयंकर अपराध आहेच. त्यापेक्षा जास्त ती एक विकृती आहे. ही विकृती कधी उफाळून येईल ते कुणीच सांगू शकत नाही. असे मनोरुग्ण चेहऱयावर सभ्यतेचा मुखवटा लावून समाजात फिरत असतात. त्यांना जात, धर्म नसतो. अलिगढच्या प्रकरणात हेच सांगता येईल. सोमवार, 10 जून रोजी संध्याकाळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मी भेटलो. आजारी असलेल्या मुलायमसिंग यादव यांना भेटून मुख्यमंत्री येत होते व टप्पल घटनेबद्दल मुलायमपुत्र अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर त्याच वेळी ठपका ठेवला होता, पण मनात कटुता न ठेवता बुजुर्ग मुलायम यांना भेटण्यासाठी योगी गेले. श्रीमती मायावती लखनौला असूनही गेल्या नाहीत, पण राजकीय विरोधक असलेले योगी गेले. लखनौचे राजकारण योगींच्या मोठय़ा विजयामुळे आता झळाळले आहे. मायावती आणि अखिलेश यादव यांची युती शेवटी औटघटकेची ठरली व पराभवानंतर मायावती यांनी युती मोडली. ‘‘हे तर होणारच होते!’’ अशा प्रतिक्रिया यावर अनेकांनी दिल्या.

मुख्यमंत्र्यांचे कार्यालय

‘लोक भवन’ हे मुख्यमंत्री योगी यांचे कार्यालय. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे इतके भव्य कार्यालय आपल्या देशात दुसरे नसेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर बसतात. त्यांचे प्रशासकीय काम तिथे चालते. लखनौमध्ये काही एकरांवर वसलेले विक्रमादित्य मार्गावरील ‘लोक भवन’ फक्त उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे आहे. ‘लोक भवन’ हा वास्तुकलेचा अभूतपूर्व नमुना आहे. जिथे मुख्यमंत्री बसतात ती जागा जणू लाकडाच्या चमकदार कोरीव कामाचे नयनरम्य लेणे. आतापर्यंत किमान पाच वेळा योगींना येथेच भेटण्याचा योग आला. महाराष्ट्राच्या मंत्रालयात मी जात नाही, पण जे जातात ते तेथील अडथळे व सुरक्षा कुंपणांविषयी आवर्जून सांगतात. आपल्या मंत्रालयात जाऊन मंत्री, अधिकारी व मुख्यमंत्र्यांना भेटणे एक दिव्य ठरते. जशी दिल्ली दूर तसा सहावा मजलाही दूर, पण ‘लोक भवना’त मला हे अडथळे, ब्रेक जाणवले नाहीत. सुरक्षा आहे, पण त्या सुरक्षाव्यवस्थेत विनम्रता आहे. लोक भवनात जाणे व तेथील दालनांत फिरणे हा अनुभव ठरतो. महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी हा अनुभव घ्यायला हवा.

नव्या इमारती, नवा थाट

लखनौमध्ये अनेक सरकारी इमारती आता नव्याने उभ्या राहिल्या. मोगलकालीन इमारती व पडक्या नबाबी वाडय़ाच्या कोंदट वातावरणातून सरकारी कार्यालये बाहेर पडत आहेत. मुळात लखनौचा नबाबी चेहरा पूर्ण बदलत आहे. मंत्री, अधिकारी व तिथे जाणाऱया लोकांना मोकळा श्वास घेता येईल अशी भव्य कार्यालये उभी आहेत. एक वर्षापूर्वी उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक ओ. पी. सिंह यांना त्यांच्या जुन्या कार्यालयात भेटलो होतो. मोठय़ा राज्याच्या पोलीसप्रमुखांना इतक्या लहान व बैठय़ा बराकीत बसताना मी पाहिले. पुन्हा त्यांचे इतर सर्व विभाग वेगवेगळ्या जागी विखुरलेले. पोलीस महासंचालकांना आता नव्या लखनौमधील भव्य मुख्यालयात भेटलो. नरीमन पॉइंट किंवा बीकेसीमधील अतिभव्य ‘कॉर्पोरेट’ कार्यालयात शिरल्यासारखे क्षणभर जाणवले. उत्तर प्रदेश पोलिसांनी ‘डायल 100’ हा उपक्रम सुरू केला आहे आणि ‘डायल 100’ याच नावाने त्यांचे पोलीस मुख्यालय उभे आहे. कायदा, सुव्यवस्थेच्या संदर्भातील बहुतेक सर्व विभाग आणि अधिकारी आता एकाच इमारतीत बसतात. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक व मुंबईचे पोलीस आयुक्त ब्रिटिशकालीन वास्तूत बसतात. या जागा ऐतिहासिक, पण सामान्य जनतेला येथे जाता येत नाही. पुन्हा कोंडवाडे येथेही झालेच आहेत. सरकारी कार्यालयांचे कोंडवाडे होतात. त्या कोंडवाडय़ांत फायलींचे ढिगारे, त्या ढिगाऱयाखाली लोकांचे प्रश्न दबून जातात. उत्तर प्रदेशातील अलिगढ घटनेचे पडसाद देशभर उमटले. अलिगढात 144 कलम लागले इथपर्यंत संतापाचा उद्रेक झाला. लखनौच्या नव्या पोलीस मुख्यालयावरची जबाबदारी वाढली आहे.

भाजपचा बोलबाला

उत्तर प्रदेश हे देशातले सगळय़ात मोठे राज्य. 78 लोकसभा मतदारसंघ दिल्लीचे भविष्य ठरवतात, देशाचे पंतप्रधान ठरवतात. 2014 साली 71 व आता 61 खासदार भाजपचे निवडून आल्यावर भाजपचा आकडा 303 वर गेला. मायावती-अखिलेश यादवांचे जातीय समीकरण लोकांनी फेकून दिले. यादव आणि दलितांची मते सरळ भाजपला पडली. अमेठीत बहुसंख्य मुसलमान असलेल्या बूथवर राहुल गांधी मागे पडले. बागपतला या वेळी जाट नेते जयंत चौधरी जिंकतील असे चित्र होते. अजित सिंग यांचे ते पुत्र, पण एका सभेत मायावती यांनी अजित सिंग यांना ‘चपला’ उतरवून मंचावर येण्याचे फर्मान सोडले व अजित सिंग यांनी ते फर्मान पाळले. त्यामुळे जाटांचा अपमान झाला. ‘‘चौधरींना राजकारणात किंमत नाही, ते कमजोर निघाले’’ असे मत चौधरी अजित सिंगांच्या बाबतीत व्यक्त झाले आणि जाटांनी भाजपास मतदान केले. इतक्या टोकाची जात या राज्यात भिनलेली आहे. तरीही अनेक ठिकाणी जातीची कुंपणे तोडून मतदान झाले. हिंदू आणि मुसलमान अशीदेखील विभागणी झाली. काँग्रेसचे उरलेसुरले शेपूटही त्यात तुटले. हिंदू म्हणून योगी यांची निर्माण झालेली ओळख, पाकिस्तानला धडा मोदीच शिकवतील हा विश्वास व धर्मांध मुसलमानांना अमित शहा रोखतील हा विचार यातून उत्तरेचे वारे भाजपास अनुकूल ठरले. एक मोठे राज्य सर्व प्रश्नांचे ओझे घेऊन उभे आहे. नव्या इमारती, नवी कार्यालये, भगव्या कपडय़ांतील शासनप्रमुख हे अनोखे चित्र नबाबांच्या लखनौमध्ये आज आहे. नबाबांचे लखनौ आता पूर्णपणे भगव्या वस्त्रधारी योगींचे झाले आहे.

गोरखपूरचा महंत
उत्तर प्रदेशसारख्या मोठय़ा राज्यांचा विकास झाला तर देशाचा विकास होईल, पण यादवांच्या राज्यात ‘गुन्हेगारी’, ‘खंडणीखोरी’ म्हणजे ‘रंगदारी’ हाच मुख्य व्यवसाय बनला होता. योगींनी हे सर्व संपवले आहे. गोरखपूरच्या या महंतास राज्य चालवता येईल काय, अशी शंका ज्यांच्या मनात होती तेसुद्धा योगी यांना शंभरपैकी ऐंशी गुण देतात. उत्तर प्रदेशातील रस्ते उत्तम आहेत. लखनौप्रमाणे अनेक शहरे कात टाकत आहेत. दाढी, मिश्या व लुंग्यांची जागा आधुनिकतेने घेतली. रस्त्यावरची नमाज प्रकरणे कमी झाली. एक दिवस मशिदीवरचे भोंगेही उतरलेले दिसतील. फक्त चव्वेचाळीस वर्षांचे योगी उत्तर प्रदेशचे नवे भाग्यविधाते बनत आहेत. धर्म म्हणजे जळमट नाही. धर्मकारणात राजकारण आणि विकास याचाही मिलाफ होतो. उत्तर प्रदेशची जनता म्हणजे बेरोजगारी व अनिष्ट प्रकारांचे ओझे नाही. राज्याची प्रतिमा आणि प्रतिष्ठा वाढविणाऱया योजना सुरू आहेत. त्या राज्याला आपण शुभेच्छा देऊया!

Twitter : @rautsanjay61
Gmail : [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या