रोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण

563
rokhthokसरदार पटेलांचा पुतळा हा जगातील उंच पुतळा ठरला. देशाची अर्थव्यवस्था कोसळत असताना जनतेच्या तिजोरीतील हजारो कोटी या पुतळ्यावर खर्च केले. त्यावर टीका सुरू आहे. सरदार पोलादी पुरुष होते. ते पोलाद आज वितळताना दिसत आहे.
देशाची आजची अवस्था दयनीय, तितकीच अस्थिर झाली आहे. त्यामुळे बऱ्याचदा असे कानावर पडते की, ‘‘आज सरदार पटेल हयात असते तर हिंदुस्थानात अशी दयनीय स्थिती दिसली नसती.’’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीसुद्धा सरदारांच्या बाबतीत असेच गौरवोद्गार जाहीरपणे काढले आहेत. सरदार पटेल यांचा उल्लेख पोलादी पुरुष म्हणून केला जातो. हे पोलाद त्यांच्या मनात होते. राजकीय स्वार्थासाठी हे पोलाद कधी वितळले नाही. अशा सरदारांचा विचार ज्यांना अमलात आणता आला नाही त्या राजकारण्यांनी गुजरातेत सरदार पटेल यांचा अतिभव्य पुतळा उभा केला आहे. हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. अमेरिकेत स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा तसा पटेलांचा एकात्मतेचा, म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी बनला आहे व त्यावर जो तीन हजार कोटी रुपयांवर खर्च झाला तो टीकेचा विषय बनला आहे. कश्मीरपासून दहशतवादापर्यंत एकही प्रश्न सुटलेला नाही. सरदार पटेलांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी मोदींचे सरकार सत्तेवर आले, पण एकतरी प्रश्न नीट सुटला आहे काय? सगळीकडे नुसता गोंधळ आणि घोटाळे आहेत. याच लोकांनी सरदारांचा पुतळा उभारला.
पैसा कसा आला?
सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारायला हवा, पण त्यासाठी जो पैसा उभा केला तो गरीबांचे खिसे कापून गोळा केला. ब्रिटनसारख्या राष्ट्राने तर मोदी सरकारची खिल्लीच उडवली. महिलांचे प्रश्न, शिक्षण, पर्यावरण अशा क्षेत्रांत विकासकामे करण्यासाठी हिंदुस्थानने ब्रिटनकडून शंभर अब्ज रुपये कर्ज घेतले. त्यातील 32 अब्ज रुपये सरदारांचा पुतळा उभारण्यासाठी खर्च केले. तुमच्याकडे पैशांचे अजीर्ण झाले म्हणून गोरगरीबांचा पैसा पुतळय़ांवर खर्च करता काय, असा प्रश्न पीटन बोन या ब्रिटनच्या प्रमुख राजकीय नेत्याने विचारला आहे. या भव्य पुतळय़ासाठी सरकारने पैसा कमी पडू दिला नाही, पण हा पैसा गुजरात सरकारच्या खिशातून गेला नाही. उरलेला पैसाही जनतेच्याच कामाचा होता. अनेक बडय़ा कंपन्या व सार्वजनिक उपक्रम त्यांच्या फायद्यातील दोन टक्के रक्कम CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी योजनेसाठी राखीव ठेवतात. म्हणजे हा पैसा समाजोपयोगी कार्यासाठी वळवला जातो. अपंग, मागासवर्गीय, शिक्षणासाठी काम करणाऱया संस्थांना हा पैसा मिळतो. पण गेली दोन वर्षे सीएसआर योजनांतील दमडा सामाजिक संस्थांना मिळाला नाही. त्यामुळे अनेक शाळा, अपंगांच्या संस्था बंद पडल्या. हा पैसा सरदार पटेलांच्या पुतळा-निर्माणासाठी वळवला. या पुतळा कार्यासाठी पंडित नेहरूंनी स्थापन केलेल्या सार्वजनिक उपक्रमांतील कंपन्यांनी किती प्रचंड पैसे दिले ते पहा-
rokhthok-11-nov-box
शिवाय राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्ससारख्या कंपन्यांनीही आपला शंभर टक्के निधी मोदींच्या व्यक्तिगत स्वप्नपूर्तीसाठी वळवून सामाजिक कार्यासाठी काम करणाऱ्या संस्थांवर व लाखो गरीबांवर अन्याय केला आहे. ठाण्यात व इतरत्र अपंगांसाठी काम करणाऱया संस्थांना उदरनिर्वाहासाठी सीएसआर फंडातील दोन-पाच लाख रुपये मिळावेत म्हणून या कंपन्यांना विनंती करताच त्यांनी पैसे शिल्लक नाहीत. पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशाने सर्व पैसा सरदार पुतळय़ासाठी वळवला, असे सांगितले गेले. हा प्रकार सरदारांच्या आत्म्यासही वेदना देऊन गेला असेल.
गांधी, नेहरू व पटेल
महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्यापेक्षा सरदार पटेल हे महान होते असे चित्र राजकीय फायद्यासाठी रंगवले जात आहे, ते चुकीचे आहे. नेहरू व पटेलांसाठी गांधी हे दैवत होते व नेहरू-पटेलांचे नाते सलोख्याचेच होते. जवाहरलाल विचारवंत आहेत आणि सरदार कार्यकर्ते आहेत असे गांधीजींनी 1931 मध्ये कराची येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात म्हटले होते. सरदारही विचारवंत होते, परंतु त्यांचे विचार अव्यवहारी नव्हते. पटेल हे कणखर प्रशासक होते, पण प्रशासनामध्ये मंत्र्यांनी कधीही फालतू हस्तक्षेप करता कामा नये असे पटेलांचे मत होते. पटेलांचा पुतळा उभारणाऱ्यांनी हा विचार मोडून पाडला आहे. सीबीआय, रिझर्व्ह बँक, अर्थ खात्यात, पोलिसांत ज्याप्रकारे हस्तक्षेप सुरू आहे, त्यातून अराजक निर्माण झाले आहे.
खोटेपणाचा राग
पटेल यांनी देशातील सर्व राजे-महाराजांची संस्थाने हिंदुस्थानात विलीन केली व हैदराबादच्या बंडखोर निजामाच्या राज्यात सैन्य पाठवून त्याला गुडघे टेकायला लावले हे खरे आहे. पण ते खरोखरच व्यवहारी होते व फसवी आश्वासने देत नव्हते. आपण गरीबांचे एकमेव तारणहार आहोत किंवा समाजवादी आहोत असा दावा त्यांनी कधी केला नाही. एकदा एक अतिउत्साही समाजवादी वल्लभभाईंकडे जाऊन सांगू लागला की, आर्थिक विषमता तुम्ही दूर केली पाहिजे. बोलण्याच्या ओघात त्यांनी काही कोट्यधीश लोकांची नावे सांगितली. या सगळ्यांची संपत्ती जप्त करायची व गरीबांना वाटून टाकायची असे ते गृहस्थ तावातावाने बोलू लागले. त्यांचे आवेशपूर्ण भाषण आटोपल्यावर पटेल त्यांना शांतपणे सांगू लागले,
‘तुम्ही सांगता त्या लोकांकडे किती संपत्ती आहे ते मला ठाऊक नाही असे नाही. त्यांच्याजवळचा सारा पैसा सर्व लोकांना सारख्या प्रमाणात वाटायचा असे ठरविले तर तुम्हाला चार आणे तीन पैसे मिळतील. तुम्ही ही बाष्कळ बडबड पुन्हा कधीही करणार नसाल तर मी तुम्हाला माझ्या खिशातून पावणेपाच आणे द्यायला तयार आहे.’ विद्यमान राज्यकर्त्यांनी श्रीमंतांचा काळा पैसा परदेशातून आणण्याच्या वल्गना आणि नोटाबंदीचे नाटक करून गरीबांच्या बँक खात्यात 15 लाख रुपये टाकण्याचे वचन दिले, पण रुपयाही जमा झाला नाही. त्या सगळ्यांनी सरदारांचे जीवन व विचार समजून घेतले पाहिजेत.
असे होते पटेल
सरदार पटेल हे प्रखर हिंदुत्ववादी नव्हते. हिंदू राष्ट्र ही संकल्पना त्यांना मान्य नव्हती. गांधी हत्येनंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली. भाषावार प्रांतरचना व प्रादेशिकता यास त्यांनी विरोध केला. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनास त्यांची सहानुभूती नव्हती. भाषावार प्रांतरचनेमुळे देशाचे भाषावार विभाजन होईल. संपूर्ण देश एक आहे ही त्यांची भूमिका होती. देशाची प्रगती आणि स्थैर्य तसेच राष्ट्रीयतेची भावना यांची वाढ खुंटेल आणि विघातक शक्तींना वाव मिळेल याची खात्रीच त्यांना होती. सरदारांच्या आयुष्यातील एकमेव ध्येय होते ते म्हणजे अखंड भारत, मजबूत भारत निर्माण करणे. 1950 साली प्रथम खलिस्तानची मागणी शिखांनी करताच ही ‘खुळचट मागणी’ असेच म्हणाले. अशा मागण्या मान्य होऊ लागल्या तर हिंदुस्थानचे लवकरच ‘पागलीस्तान’ होईल असेच म्हणत. कश्मीर त्यांना हिंदुस्थानातच विलीन व्हायला पाहिजे होते. कश्मीरचा स्वतंत्र दर्जा त्यांना मान्य नव्हता. सर्व राज्यांचा कारभार चालवताना कश्मीर त्यातून वेगळे काढले जावे हे दुर्दैव असे त्यांचे कडवट मत होते. पण ज्यांनी सरदारांचा पुतळा उभा केला त्यांनी सरदारांचे किती विचार अमलात आणले?
एक दिवस हा हिंदुस्थान देश पाकिस्तान होईल, असे सांगणारे सरदार आज हयात नाहीत. सर्वात उंच पुतळ्याच्या निमित्ताने सरदारांच्या आठवणी ताज्या झाल्या. जनतेच्या तिजोरीतील शेकडो कोटी सरदारांच्या उंच पुतळ्यासाठी खर्च झाले. गरीबांचे हक्क मारून हे झाले. सरदार लोकप्रियतेच्या कोणत्याच स्पर्धेत नव्हते.
आता फक्त स्पर्धा आहे. पुतळे उंच; माणसे खुजी.
देश उंच कधी होणार?
ट्विटर – @rautsanjay61
जीमेल – [email protected]
आपली प्रतिक्रिया द्या