रोखठोक : स्वर्ग बदलण्याची स्पर्धा!

5276

rokhthokमहाराष्ट्रात आणि देशात पक्षांतराची लाट उसळली आहे. विरोधी पक्ष उरेल काय, हा प्रश्न आता पडतो. काँग्रेस व राष्ट्रवादी हा ज्यांच्यासाठी कालपर्यंत स्वर्ग होता ते सगळे नव्या स्वर्गाच्या दारात रांग लावून उभे आहेत. स्वर्ग बदलण्याची स्पर्धा लोकशाहीचा नरक करील!

सध्या जो उठतोय तो भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेत जात आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. काही वर्षांपूर्वी राजकारणात अस्पृश्य ठरलेले हे पक्ष. आज या दोन्ही पक्षांच्या बाहेर लोक रांगा लावून उभे आहेत. जे रांगेत आहेत यापैकी काही लोकांनी अनेकदा पक्ष सोडला आहे. त्यामुळे आजचे आयाराम हे उद्या गयाराम होणार नाहीत याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी सोडणारे जी कारणे देत आहेत तो राजकीय विनोद ठरावा. विचारांचा येथे काडीमात्र संबंध नाही. हे सर्वच स्तरांवर सुरू आहे. नीरज चंद्रशेखर हे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र. राज्यसभेत समाजवादी पार्टीचे खासदार. गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारच्या धोरणांविरुद्ध सगळय़ात जास्त हंगामा याच महाशयांनी केला. राज्यसभेत मोदी सरकारला अडथळे आणणारे म्हणून नीरज चंद्रशेखर सगळय़ात पुढे असत. एकवेळ मुलायम सिंग भाजपात जातील पण नीरज तत्त्वाशी प्रतारणा करणार नाहीत असे त्यांचे वागणे. आदल्या दिवसापर्यंत ते त्याच भूमिकेत होते. दुसऱया दिवशी त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला व स्वर्गाचा रस्ता पकडण्यासाठी भाजपवासी झाले. अमित शहा हे ‘उद्या’ कश्मीरमधून 370 कलम हटवणार हे नक्की झाले तेव्हा रात्री काँग्रेस संसदीय पक्षाची तातडीची बैठक झाली. राज्यसभेतील पक्षाचे प्रतोद भुवनेश्वर कलिता हे तावातावाने बोलण्यास उभे राहिले. सरकारने असे केले तर तो संविधानाशी विश्वासघात ठरेल, असे त्यांनी बैठकीत सांगितले. कामकाज चालू द्यायचे नाही व त्यासाठी ‘प्रतोद’ म्हणून राज्यसभेत स्थगन प्रस्ताव मांडणारी सूचना त्यांनी राज्यसभा चेअरमनला पाठवली. दुसऱ्या दिवशी सकाळी राज्यसभेत चेअरमन नायडू यांनी भुवनेश्वर कलिता यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला असल्याचे जाहीर केले. कलिता यांनी त्याच दिवशी काँग्रेसचाही त्याग केला. ते 24 तासांत भाजपात गेले. समाजवादी पार्टीचेच नरेश अग्रवाल हे संसदेत सगळय़ात जास्त मोदी सरकारवर प्रहार करीत होते. एका रात्रीत त्यांचे मतपरिवर्तन झाले. ते भाजपात गेले. मला सगळय़ात आश्चर्य वाटते ते मुंबईतील काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांचे. कृपाशंकर सिंह हे मुंबईतील उत्तर हिंदुस्थानींचे मोठे नेते. भ्रष्टाचार व बेहिशेबी संपत्ती प्रकरणात त्यांच्यावर ‘ईडी’ व ऑण्टिकरप्शन विभागातर्फे गुन्हे दाखल झाले. चौकशीत बरेच घबाड उघड झाले. हे सर्व चौकशी प्रकरण काँग्रेस राजवटीत सुरू झाले, पण भाजप राज्यात त्यांच्या सर्व फायली ‘वॉशिंग मशीन’मध्ये धुऊन स्वच्छ केल्याने त्यांच्या विरोधात खटला दाखल करण्यास नव्या राजवटीत परवानगी नाकारली. मुंबईच्या एका तत्कालीन पोलीस आयुक्ताने यात मोठी भूमिका बजावली. तेव्हाच कृपाशंकर हे भाजपात जातील हे नक्की झाले. तरीही ते बराच काळ थांबले. आता त्यांनी पक्षत्याग केला. अद्याप तरी त्यांना स्वर्गाचे दार उघडले गेलेले नाही, मात्र नजीकच्या भविष्यात काय होईल हे दिसेलच. मंगळवारी कृपाशंकर दिल्लीत होते. मुंबईतील काँग्रेस उमेदवारांची नावे नक्की करण्याकरिता पक्षाच्या छाननी समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कृपाशंकर यांनी भाग घेतला. त्यांनी काही सूचना केल्या. कलिना मतदारसंघातून मुलाला उमेदवारी देण्याची मागणी कृपाशंकर यांनी केली. मुलाने लढण्यापेक्षा तुम्ही स्वतः लढा अशी गळ पक्षाने घातली. यावर कृपाशंकर यांनी वेगळाच पवित्रा घेतला व ते 370 कलमावर बोलू लागले. घटनेतील 370 कलमानुसार जम्मू-कश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला विरोध करण्याची पक्षाची भूमिका चुकीची असल्याचे मत कृपाशंकर यांनी व्यक्त केले. त्यावेळी मुंबई उमेदवारांची नावे द्या, असे त्यांना बैठकीतील काँग्रेस नेत्यांनी विचारल्यावर उमेदवारीचा कागद बाहेर आहे, घेऊन येतो असे सांगून कृपाशंकर बैठकीतून जे बाहेर पडले ते परतलेच नाहीत. एवढेच नव्हे तर, काही वेळाने त्यांनी आपला राजीनामाच मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पाठवून दिला. नीरज चंद्रशेखर ते भुवनेश्वर कलिता आणि हर्षवर्धन पाटलांपासून गणेश नाईकांपर्यंत सगळय़ांनी भाजपात तर काहींनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. नारायण राणे अजून उंबरठय़ावर आहेत व छगन भुजबळ स्वतःच्या हातावरील रेषा स्वतःच पाहत बसले आहेत.

विरोधी पक्ष नको?
दिल्लीत म्हणजे लोकसभेत विरोधी पक्षनेता नाही व महाराष्ट्रातही तो ठेवायचा नाही हे काही मंडळींनी ठरवले असेल तर देशाचे अस्तित्व आणि लोकशाहीला ते मारक ठरेल. महाराष्ट्रात अनेक मतदारसंघ असे आहेत की, तेथे काँग्रेसला निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार मिळतील काय, असा प्रश्न आहे. काँग्रेस पक्षात असताना जे कमवले ते सर्व डबोले घेऊन लोक पक्षांतर करीत आहेत. पक्षांतर करणाऱ्यांचे वैशिष्टय़ असे की, ते जुन्या दैवतांना स्मरून पक्ष सोडीत आहेत. शिवसेनेतून भुजबळ, राणे, कोळंबकर वगैरेंनी पक्ष सोडला तेव्हा बाळासाहेब ठाकरे हेच आपले दैवत असल्याचे ते सांगत राहिले. आता पद्मसिंह पाटील, अकोल्याचे पिचड, सोलापूरचे दीपक साळुंखे, बार्शीचे सोपल वगैरे मंडळींनी शरद पवार हेच आपले दैवत असल्याचे सांगून पक्ष बदलला. यापैकी प्रत्येकाने शिवसेना-भाजपवर टीका केली आहे. कोकणातून भास्कर जाधव हेसुद्धा शिवसेनेत परतले. इथे एक लक्षात घेतले पाहिजे, स्वतःच्या कर्तृत्वावर जिंकून येण्याची पाच टक्के जरी खात्री असती तरी यापैकी कुणीच भाजप-शिवसेनेत सरकले नसते व 370 कलमाचे कारण देऊन पक्षांतर केले नसते. 370 कलमाच्या संदर्भात काँग्रेसमध्ये असताना यापैकी कुणीच बोलले नव्हते. एकदा खिडकी उघडली की, हवेबरोबर कीटकही आत येतात. येथे तर स्वर्गाचे सर्व दरवाजेच उघडून ठेवले आहेत. पाण्याचा योग्य वेळी विसर्ग केला नाही तर काय होते ते सांगली, कोल्हापूरच्या महापुराने दाखवून दिले. विसर्गाचे पाणी ज्यांच्या घरात शिरले त्यांनी सावध राहावे!

कोण कुठे?
छगन भुजबळ यांनाही शिवसेनेत यावे असे वाटत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. भुजबळ यांनी हे सर्व खोटे असल्याचे सांगितले व पुण्यात राष्ट्रवादीच्या बैठकीस जाऊन बसले. तीस वर्षांपूर्वी शिवसेना सोडणार नाही असेच ते शेवटपर्यंत सांगत होते. सध्याच्या राजकारणात चरित्र नावाची गोष्ट उरली नाही व चारित्र्यहनन हे मोठे हत्यार झाले. त्यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा सर्वच स्तरांवर वापरली जाते. सुप्रसिद्ध इंग्रजी लेखक मेकॉले याने कवी मिल्टन यांचे चरित्र कथन करताना तत्कालीन परिस्थितीचे जे वर्णन केले आहे त्याची प्रचीती आज येते. त्या परिस्थितीचे वर्णन करताना मेकॉले लिहितात, ‘‘…आणि मग असे दिवस आले की, त्या दिवसांचे स्मरण होताच लज्जेने मान खाली जावी! स्वामिभक्ती संपली! फक्त पोटार्थी मंडळीचाच जिकडे तिकडे सुळसुळाट झाला. झुडुपांच्या उंचीप्रमाणे समाजातील सद्गुण खुजे झाले आणि दुर्गुणांची उंची मात्र डोंगराइतकी वाढली. समाजात चारित्र्याचा मागमूसही शिल्लक उरला नाही.’’ चारित्र्याला अत्यावश्यक असलेल्या माणुसकी, श्रद्धा, सत्य, ज्ञान, सचोटी अशा सद्गुणांचा दुष्काळ पडला आहे. जेव्हा अतिवृष्टी होते किंवा अनावृष्टी होते तेव्हा दुष्काळ पडतो. महाराष्ट्रात दोन्ही झाले आहे. अतिवृष्टी आहेच, पण लातूरसारख्या ठिकाणी गणेश विसर्जन करण्याइतकेही पाणी उरले नाही. त्यामुळे विसर्जन करू नका, मूर्ती दान करा असे सांगावे लागले. 370 इतकेच लातूरसह मराठवाडय़ातील जलसंकटही महत्त्वाचे. त्यावर कुणी राजीनामा देत नाही व पक्षांतरही करीत नाही.

दुष्काळाकडे पाहा
सर्वत्र दुष्काळ असला तरी भाजप-शिवसेनेच्या झोळीत भरभरून माणसे पडत आहेत. राजकारण ही एक अवघड कला होती, पण आता ती काही मंडळींनी सोपी केली आहे. संसदीय परंपरा मोडून राजकीय कला जास्त सोपी करण्याचा प्रयत्न केला तर लोकशाही मोडून पडेल. पंडित नेहरू व काँग्रेस यांच्या बाबतीत मतभेद असू शकतात, पण संसदीय लोकशाहीतील परंपरांचा त्यांनी मान राखला. स्वातंत्र्यानंतरच्या संसदेत काही संकेत, परंपरा आणि प्रथा प्रामुख्याने काँग्रेसने निर्माण केल्या. लक्षवेधी सूचना ही संसद आणि विधिमंडळातील पद्धत काँग्रेसची देणगी आहे. कामकाज सल्लागार समिती (बिझिनेस ऍडव्हायझरी कमिटी) निर्माण झाली काँग्रेसमुळेच. इतर कोणत्याही देशात या दोन गोष्टी नाहीत. विरोधी पक्षाचे महत्त्व पंडित नेहरूंनीच वाढवले. सुरुवातीला विरोधी पक्ष कमजोर होता म्हणून ते एकदा म्हणाले होते की, ‘‘मला दोन्ही भूमिका कराव्या लागतात. पंतप्रधानाची आणि विरोधी पक्षाच्या नेत्याची.’’ अटल बिहारी वाजपेयी हे नेहरू- मार्गानेच पुढे गेले. विरोधी पक्ष नसेल तर देश कमजोर व लोकशाही ठिसूळ होते. राजकारण एकतंत्री बनते. आज ज्यांना स्वर्गाच्या दारात उभे राहून आत घुसायचे आहे त्यांच्यापासून सावध राहायला हवे. नंदनवनातील फुलबागांचे ते माळी बनले तर स्वर्गाचा नरक व्हायला वेळ लागणार नाही. आपापल्या दैवतांच्या आणाभाका घेत लोकांनी ‘स्वर्ग’ बदलले आहेत. कधी काँग्रेस तर कधी राष्ट्रवादी स्वर्ग होता. समाजवादी पक्ष, तेलगू देसम, तृणमूल काँग्रेसही हा सगळ्यांसाठी स्वर्ग होता. स्वर्ग बदलण्याच्या स्पर्धेत नंदनवनाचा ‘नरक’ होऊ नये.

Twitter : @rautsanjay61
Gmail : [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या