रोखठोक – शिंदे गटाचे कॉण्ट्रॅक्ट किलिंग! तरीही शिवसेनाच राहील!!

मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या गटाचा वापर शिवसेनेविरोधात ‘कॉण्ट्रॅक्ट किलर’प्रमाणे होत आहे. ‘शिंदे’ नामाचा महाराष्ट्रातील इतिहास शौर्याचा व इमानाचा आहे, पण सध्याचे शिंदे हे महाराष्ट्राचे खलपुरुष ठरत आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही. मुख्यमंत्रीपद म्हणजे प्रतिष्ठा नाही. महाराष्ट्रात रोज अनेक नातवंडे, पतवंडे जन्माला येतात. त्यांचे आशीर्वाद खऱ्या शिवसेनेलाच असतील. शिंदे यांनी कुठेतरी स्वतःला ब्रेक लावायला हवा.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रचंड कष्टातून निर्माण केलेली शिवसेना दिल्लीतील राज्यकर्त्यांनी कपट-कारस्थानाचे घाव घालून कागदोपत्री संपवली. त्याकामी महाराष्ट्रातील एक शिंदे व त्यांच्या चाळीस गारद्यांची मदत घेतली. शिवसेना हे ज्वलंत नाव गोठवले गेले. बाळासाहेब ज्याची रोज पूजा करीत ते धनुष्यबाण चिन्हदेखील गोठविण्यात आले. महाराष्ट्राची कवचकुंडलेच शिंदे व त्यांच्या गारद्यांनी दिल्लीच्या चरणी अर्पण केली. जीवनात काही गोष्टी पवित्र मानाव्यात, राजकारणाच्या पलीकडे मानाव्यात, हे सध्याच्या राज्यकर्त्यांना समजण्यापलीकडे आहे. शिवरायांची भवानी तलवार ही कथा की दंतकथा ते माहीत नाही, पण शिवसेना म्हणजे मराठी माणसांच्या रक्षणासाठी उपसलेली भवानी तलवारच आहे. राजकारण या भवानी तलवारीपर्यंत भिडले. त्या भवानी तलवारीचे असे अधःपतन ‘‘आम्ही शिवरायांचे मावळे’’ वगैरे म्हणणाऱ्यांनीच केले. शिवसेनेच्या कोणत्याही गोष्टीसंबंधात मराठी माणसांच्या भावना तीव्र आणि नाजूक आहेत. शिंदे नावाचे गृहस्थ आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आहेत व ते सत्तेच्या बळावर राज्यात प्रतिशिवसेना स्थापन करू पाहत आहेत. हे म्हणजे मोगलांत सामील झालेल्या एखाद्या गद्दाराने ‘‘शिवराय कोण? हिंदवी स्वराज्याचे खरे मालक आम्हीच!’’ असा दावा करण्यासारखे आहे. महाराष्ट्रात दोन शिवसेना निर्माण करून दुष्मनांनी त्यांचे काम केले आहे. शिंद्यांनी हरून अल रशीदप्रमाणे वेषांतर करून संध्याकाळनंतर बाहेर पडावे व जनता आपल्याविषयी काय बोलतेय ते समजून घ्यावे. लोक एकच चर्चा करतात, ‘‘कोण शिंदे? महाराष्ट्र मोडण्याचा व शिवसेना खतम करण्याचा अधिकार या माणसाला कोणी दिला?’’

शिंदे नावाचा एक इतिहास आहे. तो इतिहास इमानाचा आणि शौर्याचा आहे, पण या शिंद्यांमुळे अनेक शिंदे खजील झाले. पानिपतावर दत्ताजी शिंदे यांनी शौर्याने बलिदान दिले. महाराष्ट्र त्यांचे सदैव स्मरण करतो.

संसदेत ‘गोडसे’ हा शब्द असंसदीय ठरवला तसा ‘शिंदे’ शब्द महाराष्ट्रात तिरस्करणीय, असंसदीय ठरेल काय? ‘लखोबा लोखंडे’स पर्यायी शब्द म्हणून सध्याच्या शिंद्यांचा उल्लेख होऊ शकतो. या घडीस एकनाथ शिंदे यांचे वर्तन महाराष्ट्रात सगळय़ात तिरस्करणीय ठरत आहे. ‘एकनाथ शिंदे’ हे नाव ‘most hated speech’ प्रमाणे ‘most hated name’ ठरत आहे. इतर सर्व निष्पाप, कर्तबगार शिंद्यांची क्षमा मागून हे लिहावे लागते. एका शिंद्याने महाराष्ट्राच्या पाठीत खंजिरावर खंजीर खुपसून शिंद्यांच्या इतिहासाला, परंपरेला काळिमा फासला आहे!

महाराष्ट्रावर घाव घातले

शिंदे, सत्तार, भुसे, सामंत, आबीटकर, सरवणकर, कुडाळकर, सरनाईक या टोळीने महाराष्ट्रावर घाव घातला. हा एकप्रकारे व्यभिचारच आहे. शिवसेनेचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला, धनुष्यबाणाशी दावा मांडला. त्याची गरज होती काय? शिंदे व त्यांच्या टोळीने शिवसेना सोडली इथपर्यंत ठीक. त्यांनी त्यांचा मार्ग निवडला. राजकारणात हे असे घडायचेच, पण या टोळीने शिवसेनेचा ‘रिपब्लिकन पार्टी’ करण्याचा प्रयत्न केला. देवळात घुसून 56 वर्षे पुजलेल्या मूर्तीवर घाव घालून तुकडे करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नव्हे, शिंदे व त्यांच्या टोळीने मोगलांप्रमाणे मंदिर व मूर्ती तोडली आहे. अशा मूर्तिभंजकांना दिल्लीचे आशीर्वाद मिळाले आहेत. महाराष्ट्राला भाजपने काय दर्जाचे मुख्यमंत्री दिले आहेत ते पहा व श्री. फडणवीस अशा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहेत. काही बातम्या पहा.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’ या अधिकृत निवासस्थानासह एकूण पाच सरकारी बंगले ताब्यात घेतले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात असताना शिंदे यांनी ‘नंदनवन’ बंगला वास्तव्यासाठी घेतला. दोन सरकारी बंगले एकत्र करून त्यांनी ‘नंदनवन’ बंगल्याचा विस्तार केला. मुख्यमंत्री म्हणून ‘नंदनवन’मध्येच राहीन असे त्यांनी जाहीर केले, पण आता त्यांनी ‘नंदनवन’वर ताबा ठेवून ‘वर्षा’वर मुक्काम हलवला. आता कार पार्किंग आणि भेटायला येणाऱ्यांची गर्दी या सबबीखाली ‘अग्रदूत’ व ‘तोरणा’ हे बंगले ताब्यात घेतले. त्याहीपुढे ते गेले व पक्ष कार्यालयास जागा हवी म्हणून मंत्रालयासमोरील ‘ब्रह्मगिरी’ बंगल्याचाही ताबा घेतला. मुख्यमंत्रीपदावरील ‘निःस्वार्थी व्यक्ती’ एकाच वेळी पाच-सहा बंगल्यांवर ताबा ठेवते हा महाराष्ट्राच्या राजकारणातील विक्रम आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आपले हिंमतबाज मुख्यमंत्री शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल आला. त्यावर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. गृहमंत्री फडणवीस यांनी ‘झेड प्लस’च्या वरची सुरक्षा मुख्यमंत्र्यांना दिली. देशविरोधी प्रवृत्ती ठेचल्यानेच शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली असे प्रवीण दरेकर यांनी जाहीर केले. ‘‘कितीही धमक्या येऊ द्यात, मी जनसेवा सुरूच ठेवणार’’ असे मुख्यमंत्री म्हणाले, पण या धमकीमागचे सत्य म्हणजे मोठाच विनोद निघाला. कॉल सेंटरमधील एका तरुणाने पाण्याच्या बाटलीची किंमत जास्त लावल्याच्या रागातून दारूच्या नशेत हॉटेल मॅनेजरला त्रास देण्यासाठी ‘‘मुख्यमंत्री शिंदे यांना जीवे मारण्याचा प्लॅन चालू आहे’’ असा कॉल ‘100’ नंबरवर केल्याचे नंतर उघड झाले, पण भाजपवाल्यांनी प्रकरण देशविघातक प्रवृत्तीपर्यंत नेऊन ठेवले.

उद्धव ठाकरे हे मंत्रालयात जात नाहीत, असा शिंदे व फडणवीस यांचा आक्षेप होता, पण मुख्यमंत्री शिंदे हे फक्त आठ दिवसांतून एकदाच कॅबिनेटच्या दिवशी मंत्रालयात जातात हे आता समोर आले. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय त्यांच्या टोळीचे आमदारच चालवितात.

मुख्यमंत्री म्हणून मी जनतेची सेवा करतोय, असे श्री. शिंदे वारंवार सांगतात. शिंदे कोणती सेवा करतात ते आता स्पष्ट झाले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कारवाईच्या धमक्या देऊन आपल्या गटात आणणे हीच त्यांची जनसेवा. जे ऐकत नाहीत त्यांना तडीपारीच्या नोटिसा, शिवसैनिकांच्या पोटापाण्याच्या उद्योगांवर नोटिसा बजावून त्यांना बेघर, बेरोजगार करण्याची जनसेवा शिंदे करीत आहेत. ठाणे-पालघर जिल्हय़ातील अनेक शिवसैनिकांची राहती घरे अचानक बेकायदेशीर ठरवून ती बुलडोझर लावून तोडण्याच्या शेकडो नोटिसा गेल्या असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. ही वेगळीच ‘जनसेवा’ दिसत आहे.

ठाण्यात महाप्रबोधन यात्रेसाठी गेलेल्या शिवसेना नेत्यांवर गुन्हे दाखल झाले. विनायक राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारे यांचा गुन्हा इतकाच की, त्यांनी ठाण्यातील शिवसेना मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांची नक्कल केली व लोकांनी त्या नकलांना दाद दिली. त्यामुळे शिंदे व त्यांचे सरकार चिडले.

सध्या आपल्या मुख्यमंत्र्यांसंदर्भात अशा गमतीदार, खमंग बातम्या रोजच प्रसिद्ध होत आहेत. राज्यकर्त्याने टीका सहन केली पाहिजे, संयम बाळगला पाहिजे. आश्चर्य असे की, शिंदे यांच्यावर टीका करण्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते आघाडीवर, पण शिंदे प्रतिहल्ला करतात शिवसेनेवर. कारण भाजपला ते हवे आहे.

वाईट अंताची सुरुवात

श्री. शिंदे यांच्या जनसेवेचे आणखी एक ताजे उदाहरण देतो. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर तेथे पोटनिवडणूक जाहीर झाली. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांची उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. निवडणूक लढवायची हे ठरल्याने श्रीमती लटके यांनी मुंबई महानगरपालिकेतील त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिला, पण पालिका आयुक्तांनी तो मंजूर केला नाही. लटके या शिंदे गट व भाजप युतीच्या उमेदवार झाल्या तरच राजीनामा मंजूर करू, असे त्यांना सांगण्यात आले. राजीनामा मंजूर झाला नाही तर लटके यांची कोंडी होईल व त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. लटके यांनी शिंदे गटात यावे हा पहिला दबाव व पालिकेने त्यांचा राजीनामा तोपर्यंत मंजूर करू नये हा दुसरा दबाव! जनसेवेचे हे अनोखे उदाहरण राज्यात घडले आहे. श्री. शिंदे यांना शिवसेना फोडल्याचे इनाम म्हणून राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळाले. नारायण राणे व त्याआधी भुजबळांसारख्या नेत्यांनाही हा ‘लाभ’ झाला नाही, पण शिंदे यांनी राज्याचे नेतृत्व करण्याची व नेता म्हणून प्रतिष्ठा कमावण्याची संधी गमावली. आता असे दिसते की, भाजप त्यांचा वापर ‘कॉण्ट्रक्ट किलर’प्रमाणे शिवसेनेचा काटा काढण्यासाठी करून घेतोय. हे लोकांना पसंत नाही. बीकेसीचा दसरा मेळावा व त्यात दीड तासाचे वाचून दाखवलेले भाषण यामुळे शिंदे हे नेते नसून ‘कॉण्ट्रॅक्ट किलर’च्या भूमिकेत आहेत या भूमिकेवर ठसा उमटला. पुन्हा ‘‘माझीच शिवसेना खरी’’ व त्यासाठी भाजपची यंत्रणा हाताशी धरून त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवली हा चीड आणणारा, हळहळ निर्माण करणारा विषय. शिंदे यांच्या अधःपतनाची ही सुरुवात आहे. माझ्या नातवाचा जन्म झाला व उद्धव ठाकरे यांचे अधःपतन सुरू झाले, असे ते बीकेसी मेळाव्यात म्हणाले ते खरे नाही. शिवसेना फोडल्यानंतर शिंदे हे खलनायक ठरले व लोक त्यांचा तिरस्कार (Hate) करीत आहेत. हे कोणाचे अधःपतन? मुख्यमंत्रीपद हे यश नसून लाचारी व गुलामी आहे. महाराष्ट्र ते पाहतोय. पुन्हा शिवसेनेला ‘मशाल’ चिन्ह मिळताच त्या मशालीस आव्हान देण्यासाठी समता पार्टीचे लोक शिवसेनेच्या विरोधात उभे केले गेले. गेल्या अनेक वर्षांत समता पार्टी व त्यांची मशाल कोठेच नव्हती. हे सर्व आर्थिक उलाढालीचे व खोक्यांचे प्रताप आहेत. व्यभिचारातून मिळालेल्या सत्तेचे मोल नसते व शिवसेना संपविणे याच ईर्षेतून काम करणारे महाराष्ट्रात टिकले नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. महाराष्ट्रात रोज अनेक नातवंडे व पतवंडे जन्म घेत असतात. त्यांच्या आशीर्वादाने शिवसेना मशालीसारखी धगधगत राहील.

महाराष्ट्राची, मराठी माणसाची गरज म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. जन्मदात्यांशी व्यभिचार करून मिळालेले सुख फार टिकत नाही, असे हिंदू शास्त्र सांगते. अयोध्येतून आलेल्या संतमहंतांनी शिंदे यांना या शास्त्राची जाणीव करून देऊ नये याचे आश्चर्य वाटते!

शिवसेनेपासून दूर होऊन स्वतंत्रपणे काम करायला हरकत नव्हती, पण शिंदे यांना भाजपने कॉण्ट्रॅक्ट किलर म्हणून वापरले. अशा कॉण्ट्रक्ट किलर्सचा राजकीय अंतही वाईट होतो. महाराष्ट्राचा इतिहास व हिंदू धर्मशास्त्र हेच दर्शवते!
अशा वेळी खोके निरुपयोगी ठरतात याची प्रचिती लवकरच येईल.

शिंदे, अद्यापि वेळ गेलेली नाही! स्वतःला आवरता आले तर बघा!!

[email protected]