रोखठोक : ‘स्वराज्य’ म्हणजे काय?

rokhthokस्वातंत्र्य दिन देशभरात साजरा झाला. स्वातंत्र्य मिळून 72 वर्षे झाली, पण ‘स्वराज्य’ आले काय? 72 वर्षांत लाल किल्ल्यावरून फक्त घोषणाच झाल्या. ‘स्वराज्या’ची व्याख्या स्वातंत्र्यापूर्वी ‘काँगेस’ने केली. मोदी तीच व्याख्या पुढे नेत आहेत!

“स्वराज्य’ म्हणजे काय हे जनतेपेक्षा आपल्या राज्यकर्त्यांनी आधी समजून घेतले पाहिजे. अटलबिहारी वाजपेयींचे निधन 16 ऑगस्ट रोजी झाले, पण साधारण 12-13 ऑगस्टपासून त्यांचा श्वास मंद होऊ लागला. स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय शोक नको व लाल किल्ल्यावरील तिरंगा अर्ध्यावर उतरवायला नको, पंतप्रधानांचे सविस्तर भाषणही लाल किल्ल्यावरून व्हायचे होते या राष्ट्रीय विचाराने अटलबिहारी वाजपेयी यांनी 16 ऑगस्ट रोजी जगाचा निरोप घेतला (किंवा त्यांच्या निधनाची घोषणा केली). याला म्हणतात स्वातंत्र्य. वाजपेयींच्या शोकसभेत डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी ‘भारतमातेचा जय’ अशा घोषणा दिल्या, ‘जय हिंद’चे नारे दिले म्हणून डॉ. अब्दुल्लांना श्रीनगरात धक्काबुक्की केली व सरकारने गुन्हेगारांना पाठीशी घातले. हेसुद्धा नवे स्वातंत्र्य उदयास आले आहे.

दिल्लीत घातपाती कारवाया करण्यासाठी घुसलेले अतिरेकी पकडण्यात पोलिसांना यश आले की समजावे, स्वातंत्र्य दिन जवळ येऊन ठेपला आहे. या वेळीही परंपरेप्रमाणे हे घडले. स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उधळून लावण्यासाठी दिल्लीत घुसलेल्या 10 अतिरेक्यांना अटक झाली. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा पकडला गेला. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांनी बेडरपणे स्वातंत्र्य दिन साजरा केला. सध्या देशभरात सर्वत्र बंद, जाळपोळी सुरू आहेत. त्यात देशाची घटना जाळण्याचा प्रकार दिल्लीत घडला. हे काँग्रेस राजवटीत घडले असते तर संविधान जाळणाऱयांना काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे एव्हाना जाहीर झाले असते, पण ज्यांनी दिल्लीत अतिरेकी पकडल्याचा बनाव केला त्यांच्या डोळय़ांसमोर डॉ. आंबेडकरांचे संविधान जाळले गेले. देशाचे स्वातंत्र्य कोणत्या वळणावर आहे याचे हे उदाहरण. सबंध जगात हिंदुस्थान हा एकमेव देश असावा की, जेथे कोणतेही काम करणे माणसाला मुश्कील व्हावे.

नेमके काय?
पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून भाषण केले. गोरगरीबांसाठी त्यांनी अनेक घोषणा केल्या. आधीच्या राज्यकर्त्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे स्वातंत्र्य वाया गेले असा त्यांच्या भाषणाचा रोख होता. स्वातंत्र्याची व्याख्या जो तो आपापल्या सोयीप्रमाणे करतो. हिंदुस्थानची जनता ‘स्वातंत्र्य’ देण्याच्या लायकीची नाही. ते स्वातंत्र्य विकून खातील असे विधान ब्रिटनचे पंतप्रधान चर्चिल यांनी तेव्हा केले होते. ‘चर्चिल’ खरे होते हे सिद्ध करण्याची स्पर्धाच गेल्या 70 वर्षांत झाली. स्वातंत्र्य आणि स्वराज्य म्हणजे नेमके काय, स्वराज्याची व्याख्या काय याबाबत स्वातंत्र्यपर्वात जितका गोंधळ नव्हता त्यापेक्षा जास्त आज आहे. बॅ. नाथ पै यांनी त्यांच्या भाषणांतून अनेकदा स्वराज्याची व्याख्या केली. ती व्याख्या खरी मानली तर आज आपल्याला त्या स्वराज्याचा लाभ खरोखरच झाला आहे काय, असा प्रश्न पडतो.

स्वराज्याचा खरा अर्थ
‘‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, याला अनेक अर्थ होते. एक अर्थ इंग्रज जावेत, परकीयांचं राज्य जावं, साम्राज्याचा अंत व्हावा, स्वराज्याचा उदय व्हावा हा होता. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ याचा अर्थ या भूमीमध्ये ज्यांनी जन्म घेतला असेल त्या त्या हिंदुस्थानींना हा वाटा मिळणार होता, हा वारसा मिळणार होता, हा हक्क मिळणार होता. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे – याचा अर्थ या भूमीत जन्म घेतल्यानंतर शिक्षण मिळवणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. ज्ञान प्राप्त करणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. ज्ञान प्राप्त केल्यानंतर नोकरी मिळवणं, धंदा मिळवणं, रोजगार मिळवणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि नोकरी करून, चाकरी करून, हाडाची काडं करून, समाजाची सेवा करून मी नागरिक, मी गावकरी, मी शेतकरी, मी कामकरी, मी कारकून, मी मास्तर, मी शिक्षक, मी पोलीस, मी सैनिक होतो. मी थकलो-भागलो की, मग ज्या समाजाची मी उभ्या आयुष्यभर सेवा केली तो समाज म्हातारपणी माझी काळजी घेईल, माझी चिंता वाहील. दुसऱयाच्या कृपेवर, दुसऱयाच्या मेहरबानीवर मला अवलंबून राहावं लागणार नाही, हा स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे याचा अर्थ होता. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, म्हणजे मला मानानं जगता येणं हा माझा जन्मसिद्ध हक्क, स्वाभिमानानं मान ताठ ठेवून, निढळाच्या घामानं जगता येणं हा माझा हक्क हा ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ याचा अर्थ होता. हा अर्थ लाभला का? हा अर्थ जीवनात प्रतिबिंबित झाला का? हे आपल्या वाटय़ाला आलं का? स्वातंत्र्याकरिता यज्ञ आरंभिण्यात आलेला होता. ज्यामध्ये आमच्या अनेक देशभक्तांनी, अनेक नरशार्दुलांनी, अनेक नरपुंगवांनी आत्माहुती दिली होती. या यज्ञामध्ये अर्पण केलेल्या समिधा प्राणाच्या होत्या, त्या आयुष्याच्या होत्या. त्या आत्मसमर्पणाच्या होत्या. म्हणून हे स्वातंत्र्याचं यज्ञकुंड या ठिकाणी तेवत राहिलेले होतं आणि त्याच्यातून आम्हाला आमच्या मुक्तीचा यशःकुंभ लाभलेला होता. यशःकुंभ लाभला आणि मग असं वाटलं होतं की, ही अमृतसंजीवनी, हे यश, ही स्वातंत्र्याची पावनगंगा ही हिंदुस्थानच्या गावागावात जाईल, घराघरात जाईल, झोपडी-झोपडीत जाईल आणि अशा रीतीनं आमचं स्वातंत्र्य हे अजिंक्य होईल, अमर होईल, अविनाशी होईल. स्वातंत्र्याची आलेली पावनगंगा केवळ दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये, दिल्लीच्या सचिवालयामध्ये, मुंबईच्या सचिवालयामध्ये राहून भागणार नाही; तर ज्यांच्याकरता ही संजीवनी आणली, ज्यांच्याकरता हा यशःकुंभ आणला, त्यांच्या घरापर्यंत, त्यांच्या दारापर्यंत, त्यांच्या उंबरठय़ावर आणि त्यांच्या घरात हे स्वातंत्र्य गेलं पाहिजे!
स्वातंत्र्याच्या संजीवनाचे वारसदार हिंदुस्थानची ही बावन्न कोटी लेकरं आहेत. त्यांना त्यांचा तो वारसा, त्यांना त्यांचा तो वाटा, त्यांना त्यांचा तो हिस्सा मिळाला पाहिजे ही आमची इच्छा होती, ही आमची तळमळ होती. वधस्तंभाकडे जाणाऱया राजगुरूला, सुखदेवला आणि भगतसिंगला जे चित्र दिसलेलं होतं ते हे होतं की, बंधमुक्त झालेली भारतमाता, रिपुमुक्त झालेली भारतमाता ही पराक्रमी असेल, सामर्थ्यशाली असेल, वैभवशाली असेल, समृद्ध असेल, सुखी असेल, आनंदी असेल अशी चित्रं हे देशभक्त पाहत होते.’’

काँग्रेसची व्याख्या
स्वातंत्र्यापूर्वी 1929 मध्ये काँग्रेसने संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली. कराची काँग्रेसने एक ठराव पास करून स्वराज्याची जी व्याख्या केली ती नव्या पिढीने समजून घेतली पाहिजे. महात्मा गांधी म्हणाले होते, ‘‘गरीबांचे दुःख दूर करण्यासाठी, उपाशी, निर्वस्त्र्ा लोकांना अन्न-वस्त्र्ा देण्यासाठी ‘स्वराज्य’ स्थापन केले पाहिजे. आर्थिक विषमता नष्ट करू. धनिक आणि गरीब यांच्यातील दरी दूर करून ‘राम राज्य’ आणणे हेच आमचे स्वराज्य आहे. पिता आणि पुत्र या दोघांत जसे आदर व प्रेम असते, तसे सरकार आणि जनता यांचे नाते राहावे, तरच दोघांचे कल्याण होईल. ज्या वेळी एकांगी स्वार्थाचा विनाश होईल, ज्या क्षणी माणुसकीचा जय होईल त्याच वेळी खरे ‘स्वराज्य’ निर्माण झाले असं मानता येईल.’’ ही गांधींची स्वराज्याची व्याख्या होती आणि ती व्याख्या सोपी होती. गांधीजींच्या स्वप्नातले ‘स्वराज्य’ आज कोठे दिसते आहे काय?

20 कलमे!
स्वराज्याबाबत काँग्रेसने जो ठराव केला तो काय होता? ‘स्वराज्य’ ठरावात काँग्रेस म्हणते, ‘‘जनतेत बेचैनी, निराशा आणि असंतोष आहे. तो संपविण्यासाठी राजकीय स्वातंत्र्याबरोबर आर्थिक स्वातंत्र्यही हवे आहे. त्यामुळे कोटय़वधी गरीबांना रोटी मिळेल. काँग्रेसने स्वराज्याची व्याख्या करणारी 20 कलमे मांडली व त्या स्वराज्याची कदर करावी असे म्हटले.
1) मनुष्याला काही अधिकार जन्मसिद्ध मिळाले आहेत. त्यात विचारस्वातंत्र्य, वृत्तपत्रस्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य, नोकरी व्यापार अशा मामल्यांत जात-धर्माची बंधने नकोत. सर्व नागरिकांना समान अधिकार. रस्ते, विहिरी, दळणवळण यांच्या वापरांचे समान स्वातंत्र्य.
2) धार्मिक प्रकरणांत तटस्थता.
3) कारखान्यात राबणाऱया मजुरांची कामाची वेळ निश्चित असेल. कामगारांच्या आरोग्याची आर्थिक स्थिती आणि वृद्धापकाळाची काळजी घेतली जावी.
4) वेठबिगारी, गुलामी बंद होईल.
5) महिला मजुरांसाठी खास लक्ष दिले जाईल. त्यांना सुट्टय़ा आणि बाळंतपणासाठी वेगळी रजा दिली जाईल.
6) बाल मजुरीवर बंधणे आणली जातील. ज्या मुलांचे वय शिकायचे आहे त्यांना कारखान्यात राबविणाऱयांवर कारवाई केली जाईल.
7) आपल्या हक्कांसाठी आवाज उठवता येईल. यासाठी कामगारांना ‘संघटना’ बांधण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य असेल.
8) जमिनीवरील कर, भाडी ही शेतकऱयांची आर्थिक दशा पाहून निश्चित केली जातील. आवश्यक पडल्यास हे कर माफ केले जातील.
9) शेतीवर विशेष लक्ष दिले जाईल. शेतीच्या निश्चित उत्पन्नांवरच ‘कर’ लावले जातील.
10) वादग्रस्त संपत्तीवरदेखील कर लावला जाईल.
11) प्रत्येक ‘प्रौढ’ व्यक्तीस मतदानाचा अधिकार मिळेल.
12) मोफत प्राथमिक शिक्षण.
13) लष्करी किंवा संरक्षण खर्च आहे त्यापेक्षा निम्म्याने केला जाईल.
14) सरकारी खात्यातील नोकरशाहीवर होणारा प्रचंड खर्च, गलेलठ्ठ पगार कमी केले जातील. काही विशेष कारण असेल तरच वेतनवाढ होईल. पण पाच रुपयांपेक्षा जास्त वेतनवाढ होणार नाही.
15) विदेशी कपडे, विदेशी सूत यांना देशात बंदी असेल. स्वदेशीला प्रोत्साहन मिळेल.
16) दारूसह सर्वच मादक, नशिल्या पदार्थांवर बंदी आणली जाईल.
17) मिठावरील कर रद्द करू. मीठ सगळय़ांना खुले करू.
18) शेअर बाजार, व्यापार, विनिमय याबाबत सर्वप्रथम देशाचे व जनतेचे हित पाहिले जाईल.
19) कला, संस्कृतीचे रक्षण होईल. सामान्य लोकांच्या प्रशिक्षणावर भर दिला जाईल.
20) प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ‘सावकारी’ करणाऱयांवर नियंत्रण ठेवले जाईल.

नवे स्वराज्य!
स्वातंत्र्य मिळाल्यापासून जनता ‘स्वराज्य’ शोधीत आहे. स्वातंत्र्याचा सूर्य उगवला, पण त्या सूर्याची किरणे मूठभर लोकांनी चोरून नेली. स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसने ‘स्वराज्या’चा ठराव केला. देश त्याच ठरावाने आतापर्यंत चालला आहे. लाच घेणाऱयांवर मोठी कारवाई होतेय असे पंतप्रधानांनी सांगितले, पण लाचखोरी कमी झालेली नाही. जे लोक प्रामाणिकपणे कर भरतात त्यांच्यामुळे देशाच्या योजना चालतात हेसुद्धा खरेच आहे. याच कराच्या पैशातून पंतप्रधानांचे परदेश दौरे होतात व जाहिरातींवर हजारो कोटी खर्च होतात. नवे ‘स्वराज्य’ हे असे आहे.

ट्विटर- @rautsanjay61
जीमेल – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या