रोखठोक : एक होत्या सुषमा स्वराज!

2494

rokhthokसुषमा स्वराज यांचे जाणे धक्कादायक आहे. सुषमा स्वराज म्हणजे अटल बिहारी वाजपेयी नव्हत्या. पण भाजप वाढविण्यात त्यांचे योगदान अटलजींपेक्षा कमी नव्हते. सुषमांच्या निधनानंतर ज्यांना अश्रू अनावर झाले त्यांनी सुषमाजी मागचा एक महिना काय करीत होत्या हे समजून घेतले पाहिजे.

सुषमा स्वराज या चमकदार कामगिरी करून निघून गेल्या आहेत. त्या रेंगाळत राहिल्या नाहीत. मृत्यूची वाट पाहत अनेक जण अंथरुणावर खिळून पडले आहेत. सुषमा स्वराज एखाद्या बिजलीसारख्या लुप्त झाल्या आहेत. ‘इंग्रजी भाषा म्हणजे वाघिणीचे दूध’ असे विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी म्हटले, पण सुषमा स्वराज म्हणजे ‘शब्दांची वाघीण’ होत्या. त्या बोलायला उभ्या राहत तेव्हा भल्या भल्यांना ‘आईचं किंवा आजीचं दूध’ आठवत असे. यूपीए सरकारच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लोकसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला.मनमोहन सरकारमधील काही मंत्री भ्रष्टाचारात बरबटले होते. पंतप्रधान म्हणून मनमोहन सारवासारव करू लागले तेव्हा विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज ताडकन उठल्या व एक शेर सुनावला-
तू इधर-उधर की बात न कर
ये बता की काफिला क्यों लुटा?
मुझे रहजनों से गिला नहीं
तेरी रहबरी का सवाल है’
पुढे काही दिवसांनी हा शेर सुषमांनी थोडा आणखी पुढे नेला.
‘मैं बताऊं की काफिला क्यों लुटा,
तेरा रहजनों से वास्ता था
और इसिसे हमें मलाल हैं’
अचूक शब्दफेक, योग्य शब्दांची निवड, विषयाच्या अंतरंगात शिरण्याची हातोटी, हजरजबाबीपणा व नेमका लक्ष्यवेध यामुळे समोर जो कोणी असेल तो कोसळून पडत असे. गेल्या 40 वर्षांत सुषमा स्वराज यांच्यासारख्या वक्त्या मी पाहिल्या नाहीत.

कायद्याच्या विद्यार्थी
सुषमा स्वराज यांना किमान 30 वर्षे मी जवळून ओळखतो. ‘डिबेट’मध्ये त्यांनी कधीच हार मानली नाही. चंदिगढच्या कॉलेजात कायद्याचे शिक्षण घेत असल्यापासून त्या व्यासपीठ गाजवीत. सिनेमात आणि राजकारणात महिलांनी पाय ठेवू नये या मानसिकतेत आजही आपला समाज आहे, पण एक स्त्री स्वतःची प्रतिष्ठा, सन्मान, संस्कार कायम ठेवत राजकारणातली शिखरे कशी पार करू शकते ते श्रीमती स्वराज यांनी दाखवले. महिला म्हणून त्यांना कुणी अटकाव केला नाही व एखाद्या पदासाठी त्यांना ओंजळ पसरावी लागली नाही. त्यांनी कधी कारस्थान केले नाही व सत्तापद मिळविण्यासाठी शालीनता सोडून त्यांना आनंदीबाईंच्या भूमिकेत शिरावे लागले नाही. या बाईचे इथे काय काम? या बाईचा गॉडफादर कोण? असे प्रश्न कुणाला पडले नाहीत. अंबालाच्या सनातन धर्म कॉलेजातून त्यांनी ‘संस्कृत’ आणि ‘पॉलिटिकल सायन्स’ची पदवी घेतली. नंतर पंजाब विद्यापीठाची कायद्याची पदवी घेतली. कॉलेज जीवनापासूनच त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडल्या गेल्या. घरात ‘संघ’ विचार होताच. वडील हरदेव शर्मा अंबालातील संघाचे प्रमुख स्वयंसेवक होते. कॉलेज जीवनातच स्वराज कौशल त्यांच्या जीवनात आले. सुषमा संघ विचाराच्या तर स्वराज कौशल हे समाजवादी विचारसरणीचे. आणीबाणीत जॉर्ज फर्नांडिस भूमिगत असताना स्वराज कौशल त्यांचे निकटचे सहकारी होते. सुषमा व स्वराज यांनी सुप्रीम कोर्टात वकिली सुरू केली. 1975 मध्ये दोघांचा विवाह झाला. स्वराज कौशल यांचे स्वतःचे वेगळे विश्व होते. 34 व्या वर्षीच ते देशाचे सर्वात तरुण ‘महाअधिवक्ता’ झाले आणि 37 व्या वर्षी ते देशातील सर्वात तरुण राज्यपाल झाले. 1990-93 दरम्यान ते मिझोरामचे राज्यपाल होते. त्यांच्याच काळात मिझो बंडखोरांनी हिंदुस्थानबरोबर करार केला. स्वराज कौशल संसदेचे सदस्य होते. स्वराज कौशल यांनी पुढे पत्नी सुषमा यांच्यासाठी राजकारणाचा त्याग केला. घरातल्या एकाच व्यक्तीने राजकारणात राहावे असे स्वराज दांपत्याने ठरवले व स्वतःचे झळाळते करीअर सोडून त्यांनी सुषमांसाठी मार्ग मोकळा केला.देशाच्या राजकारणात ते एक आदर्श व सुसंस्कृत दांपत्य होते. पत्नीच्या प्रगतीत त्यांनी कधीच अडथळे आणले नाहीत. किंबहुना आपल्यामुळे पत्नीला राजकारणात त्रास होऊ नये म्हणून या कायदेपंडिताने अनेक महत्त्वाचे खटले नाकारले, याची किती जणांना कल्पना आहे?

मुख्यमंत्र्यांचे छापे
सुषमा स्वराज वयाच्या 27 व्या वर्षी हरयाणा सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाल्या. पुढे केंद्रात त्यांनी अनेक मंत्रीपदे भूषवली. काही काळ दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या. दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था तेव्हाही बिघडलेलीच होती, पण त्या रडत बसल्या नाहीत. त्यांनी रात्री- अपरात्री पोलीस ठाण्यांवर छापे मारायला सुरुवात केली. रात्री मुख्यमंत्र्यांनी जागल्याशिवाय लोकांना दिवसा शांतता मिळणार नाही हे त्यांनी ठरवले. पोलीस ठाण्यात जाऊन त्या झोपलेल्या अधिकाऱ्यांना फैलावर घेऊ लागल्या. त्यामुळे पोलीस कायदा सुव्यवस्थेसाठी जागू लागले. सुषमा स्वराज यांचे स्थान हिंदुस्थानी राजकारणात कितीही मोठे असू द्या, त्या शेवटपर्यंत एक संस्कारी हिंदुस्थानी महिलाच राहिल्या. हिंदुस्थानी सिनेसृष्टीस ‘उद्योगा’चा दर्जा देण्याचे श्रेय सुषमा स्वराज यांनाच जाते. 1998 साली वाजपेयींच्या मंत्रिमंडळात त्या माहिती व नभोवाणी मंत्री होत्या. ‘बॉलीवूड’मध्ये तेव्हा अंडरवर्ल्डच्या पैशांचा खळखळाट सुरू झाला होता. बॉलीवूडला सिनेमे बनविण्यासाठी बँकांचे कर्ज मिळत नव्हते. कारण त्यांना उद्योगाचा दर्जा नव्हता. त्यामुळे दाऊदपासून शकीलपर्यंत सगळ्यांचा पैसा त्यात घुसला. हे बंद करायचे असेल तर सिने जगतास उद्योगाचा दर्जा दिल्याशिवाय गत्यंतर नव्हते. सुषमांनी तो दिला व आज हा उद्योग त्यामुळेच वाढला. आज ‘रिलायन्स’पासून जगभरातील कॉर्पोरेट कंपन्या हिंदी सिने उद्योगात गुंतवणूक करीत आहेत. सुषमा स्वराज म्हणजे अटल बिहारी नव्हत्या, पण ‘भाजप’ वाढीत त्यांचे योगदान अटल-आडवाणींइतकेच होते. विरोधकांचा तोफखाना अंगावर घेऊन त्या प्रतिहल्ला करीत व विरोधकांना नामोहरम करीत. त्या सत्यवचनी होत्या. पक्षात त्यांना विरोधक होते, पण त्यांनी कुणालाच विरोधक मानले नाही. गोव्याच्या अधिवेशनात त्यांनी मोदी यांना विरोध केला नाही, पण त्या आडवाणी यांची बाजू मांडत राहिल्या. अध्यक्षपदी असलेल्या नितीन गडकरी यांची कोंडी त्यांच्याच सहकाऱ्यांनी केली. गडकरी यांना अध्यक्षपदाची दुसरी ‘टर्म’ मिळू नये म्हणून कारस्थान झाले. तेव्हाही त्या गडकरींची पाठराखण करीत राहिल्या. भाजपने शिवसेनेशी युती तोडली तेव्हा त्या हळहळल्या. शिवसेनाप्रमुखांनी पंतप्रधानपदाची योग्य व्यक्ती म्हणून सुषमांना पसंती दिली. त्यावेळी त्या एका श्रद्धेने बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी ‘मातोश्री’वर आल्या. पंतप्रधान नाही झाले तरी चालेल, पण बाळासाहेबांनी माझ्या नावाचा उच्चार केला हे भाग्य आहे असे त्या म्हणाल्या. देशाच्या राजकारणात ‘तडजोडी’चा उमेदवार ठरवायची वेळ आली असती तर पंतप्रधानपदासाठी सगळय़ांची पसंती सुषमा स्वराज यांनाच मिळाली असती, पण 2019 सालीच त्यांची प्रकृती बिघडली. त्यातून त्या सावरल्या, मात्र आता राजकारण पुरे, सन्मानाने जगूया असे त्यांनी ठरवले. 2019 ला निवडणूक लढवणार नाही असे सुषमा यांनी जाहीर करताच सगळ्यांना धक्का बसला, पण त्यांचे कुटुंब खूष झाले. 41 वर्षांपूर्वी सुरू झालेली एक राजकीय ‘मॅरेथॉन’ संपली. श्री. स्वराज कौशल यांनी पत्नीच्या निर्णयावर तेव्हा एक ‘ट्विट’ केले ‘‘मी तुझ्या या निर्णयासाठी तुझे आभार मानतो. मला आठवतंय, शेवटी एक अशी वेळही आली की, जेव्हा मिल्खा सिंगनीसुद्धा धावायचे बंद केले होते.’’ (‘‘मैं तुम्हारे इस निर्णय के लिए तुम्हारा शुक्रीया करता हूँ। मुझे याद है एक ऐसा वक्त भी आया था जब मिल्खा सिंह ने भी भागना बंद कर दिया था’’)
सुषमा स्वराज स्वतःच थांबल्या. त्यांनी ठरवून स्वर्गारोहण केले.

सगळ्यांचा पाठिंबा
सुषमा स्वराज यांच्या जाण्याने देश सुन्न झाला. आडवाणी, मोदी, व्यंकय्या नायडू यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. मी सुषमा यांना अनेकदा भेटलो. संसदेत, बाहेर, घरी आणि प्रवासात; त्यांचे हृदय ममतेने ओथंबलेले असे. दुसऱ्याचा ‘पत्ता’ कापून काही मिळवायचे नाही या तत्त्वाशी त्या शेवटपर्यंत चिकटून राहिल्या. त्या पंतप्रधानपदाच्या उमेदवार झाल्या असत्या तर त्यांना नक्कीच पाठिंबा मिळाला असता. देशभरातील राजकीय पक्षांचे प्रमुख सुषमांना मान देत, पण त्यांनी स्वतःला पक्षशिस्तीच्या चौकटीत बांधून घेतले. पक्षाने आणि पंतप्रधानांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी पार पाडली. सुषमा स्वराज हे नाव व त्यामागचे वलय सहज निर्माण झाले नाही. त्यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीची दगदग त्यांना झेपली नसती. तरीही त्यांच्या चाहत्यांना शेवटपर्यंत वाटत होते की, मोदी यांच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होईल. तसे झाले नाही. सुषमा स्वराज विदेश मंत्री होत्या. त्या खात्याचे सचिव जयशंकर यांना विदेश मंत्री केले गेले व नंतर गुजरातमधून राज्यसभेवर निवडून आणले गेले. असामान्य ‘सुषमा’ नंतर खासदारही राहिल्या नाहीत. सफदरजंग लेनवरील आठ नंबरच्या बंगल्यात त्या 22 वर्षे राहिल्या. तो बंगला त्यांना सोडावा लागला. जंतरमंतर रोडवरील एका इमारतीत त्या राहायला गेल्या. फक्त महिनाभरातच त्याच फ्लॅटमधून त्यांची अंत्ययात्रा निघाली. त्यांच्या अंत्यविधीसमयी संपूर्ण पक्ष आणि सरकार हजर होते, पण त्या आधी एक महिना त्या एकाकीच होत्या. वाघिणीस जणू सिमेंटच्या पिंजऱ्यात कोंडल्यासारखे वाटत असावे.
त्याच अवस्थेत त्या निघून गेल्या.
जातानाही त्यांनी स्वतःची प्रतिष्ठा आणि सन्मान राखलाच!

Twitter : @rautsanjay61
Email :[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या