रोखठोक: दोन ‘इडियटस्’!

127

rokhthokराजकारणात चिखलफेक आणि हिंसाचाराचा उद्रेक माजला असतानाच हिंदुस्थानातील दोन ‘मूर्ख’ माणसांचा जगाने सन्मान केला. लेह-लडाखचे सोनम वांगचूक आणि मुंबईचे डॉ. भारत वाटवानी. माणुसकी, सचोटी व देशभक्ती जपण्याचा मूर्खपणा त्यांनी केला.

आपल्या समाजात सचोटी आणि माणुसकी शिल्लक आहे. ती शिल्लक ठेवणारी मोजकी माणसे येथे जन्मास आली म्हणून आपला देश महान आहे. सोनम वांगचूक आणि डॉ. भारत वाटवानी या दोन व्यक्तींना नोबेलच्या बरोबरीचा ‘मॅगसेसे’ पुरस्कार मिळाला. त्यांच्याविषयी आता भरभरून लिहिले गेले. पण वांगचूक आणि वाटवानी हे आतापर्यंत अंधारात राहूनच काम करीत होते. ज्यांना दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करायचा असतो त्यांनी स्वतः अंधाराची भीती बाळगायची नसते, प्रकाशझोताची किरणे अंगावर खेळवत मिरवायचे नसते. आपल्या पंतप्रधानांपासून सर्वच राजकारण्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे. वांगचूक व डॉ. वाटवानी यांच्यावर ‘मॅगसेसे’ पुरस्काराचा झोत पडेपर्यंत ते अंधारातच होते. सोनम वांगचूक आणि डॉ. वाटवानी यांनी समाजासाठी मोठे काम केले, पण केलेल्या कामाचा मोबदला मागितला नाही व टीव्ही कॅमेरे बोलावून कामावर झोत पाडले नाहीत. महाराष्ट्रासह देशातील तरुणवर्ग मनाने अस्थिर झाला आहे. जातीचे आरक्षण हवे म्हणून हिंसाचार करीत रस्त्यावर उतरला आहे. वांगचूक आणि डॉ. वाटवानी यांनी राखीव जागा व नोकऱ्यांच्या मृगजळाची पर्वा न करता मोठे काम केले.

लेहचा संघर्ष
जेथे घोटभर पाण्यासाठी आणि चिमूटभर प्राणवायूसाठी रोजचा संघर्ष करावा लागतो अशा दुर्गम, बर्फाळ, पहाडी लेह, लडाख भागात सोनम वांगचूक यांचे बालपण गेले. जम्मू-कश्मीरचा हा निसर्गरम्य भाग. सोनम वांगचूक यांचे बालपण इथेच गेले. लेहमधील अल्ची गावात त्यांचे कुटुंब राहत होते. तेथे एकही शाळा नव्हती. मुलांना शाळेत पाठवायचे असते हा विचारच तेथे नव्हता. कारण भौगोलिक आणि पर्यावरणाच्या अडचणी. दहा वर्षांचा होईपर्यंत सोनम शाळेत गेला नाही. आईला लिहिता-वाचता येत होते. तिने मुलाला घरीच शिकवायला सुरुवात केली. वडील स्थानिक राजकारणात होते. पुढे ते कुटुंबास घेऊन श्रीनगरला आले. सोनम वांगचूक यांचे पुढील शिक्षण श्रीनगरात सुरू झाले. अर्थात, वांगचूक यांचे शाळेतले दिवस बरे नव्हते. वर्गातील मुले त्यांच्याशी नीट वागत नव्हती. त्यांचा चेहरा, त्यांची शरीरयष्टी इतर मुलांच्या तुलनेत वेगळी होती. कश्मिरी मुलांत ते त्यांच्या वेगळ्याा चेहऱ्याने विचित्र दिसत होते. जणू हा मुलगा परग्रहावरून आला आहे, हा आपल्यातला नाही असेच वर्गातील इतर विद्यार्थ्यांचे वागणे होते. वांगचूक यांना कश्मिरी भाषा येत नव्हती. आईने घरी लेहच्या स्थानिक भाषेतून आतापर्यंत शिकवले. श्रीनगरमध्ये इंग्रजी किंवा उर्दूमधून शिकवले जात होते. पुस्तकांतले शब्द त्यांच्या मेंदूत जात नव्हते. बोलणे तर दूरच राहिले. शिक्षक त्यांना एखादा प्रश्न विचारीत तेव्हा ते मख्खासारखे उभे राहत. शिक्षकांनी काय विचारले हे त्यांना समजत नव्हते. वर्गातील इतर मुले त्यांची चेष्टा करीत. हा मुलगा वेडा आहे. कोठून कोणी पकडून आणला कुणास ठाऊक, असे इतर मुले बोलत. वांगचूक त्या आठवणीने आजही उदास होतात. मात्र त्यांनी त्याच वेळी ठरवले की यावर मात करायची. त्यादृष्टीने त्यांनी परिस्थितीशी जुळवून घेतले. शिक्षणाबाबत त्यांची दृष्टी वेगळीच होती. डिग्रीचे भेंडोळे मिळावे म्हणून ते शिकले नाहीत. ज्ञान मिळावे म्हणून ते शिकले. बारावीनंतर त्यांना मेकॅनिकल इंजिनीयर व्हायचे होते. वडील म्हणाले, सिव्हिल इंजिनीयर हो. तेथे बाप-बेट्यात वाजले. नोकरी करावी व स्थिर आयुष्य जगावे असे घरचे म्हणाले, पण वांगचूक यांना त्यांचे लेह गावातले जुने दिवस आठवत. बर्फाळ वाळवंटातील मुलांना जाऊन शिकवावे असे त्यांना वाटले. ही अशी मुले होती की, ज्यांना देशातील इतर मुलांप्रमाणे शिकायची इच्छा असली तरी सुविधांअभावी ते शक्य होत नाही. अशा मुलांसाठी वांगचूक इंजिनीयरिंगची डिग्री घेऊन परत घरी म्हणजे लेहला गेले. १९८८ मध्ये त्यांनी लडाखमध्ये शिकू पाहणाऱ्या मुलांसाठी एक संस्था सुरू केली. ही मुलं शिकवून तयार करणे म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ब्रिटिशांशी लढण्यासारखे होते. मात्र तरीही अभ्यासात ‘ढ’ व एकाच वर्गात वारंवार नापास होणाऱ्या या मुलांना घेऊन वांगचूक एक क्रांती करीत होते. खरे म्हणजे ते एक मिशन इम्पॉसिबल होते, पण ते त्यांनी अखेर यशस्वीपणे साध्य केले.

कच्ची मडकी
वांगचूक यांनी काम सुरू केले. ते यशस्वी झाले. त्यांनी तयार केलेली मुलं इंजिनीयर, वैज्ञानिक, डॉक्टर्स झाली. काही विद्यार्थी उद्योजक बनले. जगात त्यांनी नाव केले. १९९४ मध्ये वांगचूक यांनी ‘ऑपरेशन न्यू होप’ ही चळवळ सुरू केली. अभ्यासात कच्ची मडकी असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाबद्दल रुची निर्माण करायची हा या चळवळीचा मुख्य हेतू होता. या चळवळीअंतर्गत त्यांनी ७०० शिक्षकांना अभ्यासात कच्च्या असलेल्या मुलांना शिकण्याची प्रेरणा देण्याविषयी ‘ट्रेनिंग’ दिले. त्यांची ही चळवळही यशस्वी झाली. लडाखमध्ये त्यांचा ‘नवा पॅटर्न’ निर्माण झाला व मॅट्रिक पास होणाऱ्यांची संख्या वाढली. एका समारंभात त्यांची भेट आमीर खानशी झाली. त्यांच्या कार्यामुळे आमीर प्रभावित झाला.

‘थ्री इडियटस्’ सिनेमातील आमीरने रंगवलेला फुनसूक वांगडू म्हणजे सोनम वांगचूक होय; पण सोनम अत्यंत विनम्रतेने सांगतात, ‘तो मी नव्हेच!’ मला माझे काम पूर्ण करायचे आहे. सोनम यांनी त्या बर्फाळ वाळवंटात ‘जलसिंचन’ प्रयोग केले. लडाख परिसरात बर्फ पडत असूनही पाणीटंचाई हे ऐकायला विचित्र वाटत असले तरी सत्य होते. त्यावर मात करण्यासाठी वांगचूक यांनी कडाक्याच्या थंडीत बर्फाचे स्तूप बनवले. उन्हाळय़ात हाच बर्फ वितळून शेतकऱयांना पाणी मिळू लागले. त्यामुळे लेह-लडाखमधील ४० हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. स्तूप बनवण्याची प्रेरणा त्याला चवांग येथील एका ग्रामीण नॉर्फेलकडून मिळाली. त्या खेडुताने कृत्रिम ग्लेशियर्स बनवले होते. लेहमध्ये वांगचूक यांनी ‘सोलर पॉवर’च्या माध्यमातून काम केले. त्यांनी कोणत्याही अपेक्षेशिवाय काम केले. ते सरकारकडे गेले नाहीत. ते लढत राहिले. त्यांच्या लोकांसाठी.

वेड्यांचा माणूस
डॉ. भारत वाटवानी यांनाही सोनम वांगचूकप्रमाणे ‘मॅगसेसे’ पुरस्कार मिळाला. ज्यांना आपण ठार वेडे म्हणून रस्त्यावर फेकून देतो अशा हजारो वेड्यांना शहाणे करून पुन्हा माणूस बनवणे हे सोपे काम नाही. रस्त्यावर, फुटपाथवर, रेल्वे फलाटावर सडत पडलेल्या वेड्यांना उचलून आणायचे, त्यांची सेवा करायची असे काम करणाऱ्यांना खरे तर भारतरत्न, नोबेल पुरस्कार मिळायला हवा. मदर तेरेसा यांनी हेच काम केले. तेव्हा त्यांना डोक्यावर घेतले गेले. व्हॅटिकनने त्यांना संतपद बहाल केले. या कामासाठी जगभरातून त्यांना देणग्या मिळत राहिल्या. पण डॉ. वाटवानी व त्यांच्या पत्नीने हे सर्व स्वबळावर केले. कालचा ‘मॅगसेसे’ पुरस्कार मिळाला नसता तर डॉ. भारत वाटवानी तरी कुणाला माहीत झाले असते? सोनम वांगचूक आणि डॉ. वाटवानी करतात तेसुद्धा सर्वांत मोठे देशकार्य आहे. सैनिकांच्या शौर्याइतकेच ते काम मोठे आहे. मात्र आपला समाज हे मानायला तयार नाही. धर्म, जातीच्या झगडय़ाचे राजकारण हेच आमचे देशकार्य बनले आहे. अशा वातावरणात जात आणि धर्म न पाहता हे दोन ‘इडियटस्’ वेगळे काम करतात व जग त्यांची दखल घेते. सोनम वांगचूक, डॉ. वाटवानी हे ज्या प्रकारचे काम करतात तो आपल्या स्वातंत्र्याचा पराभव आहे. जतीन दास हेदेखील आजच्या पिढीस माहीत नाही. त्यांच्या चरणाजवळ बसून नेहरू रडले होते. स्वातंत्र्यासाठी त्याने बलिदान केले. तुरुंगातील कैद्यांना हीन वागणूक दिली जाते. गोऱ्या व हिंदुस्थानी कैद्यांत वर्णभेद केला जातो यासाठी ६२ दिवसांचे उपोषण करून देह ठेवणाऱया जतीन दासांचे चरित्र नव्या पिढीला माहीत असण्याची शक्यता नाही. ‘तू मरण का पत्करतोस?’ असा प्रश्न त्यास तुरुंग अधिकाऱयांनी विचारला असता ‘माझ्या देशासाठी आणि तुरुंगातील कैद्यांच्या उद्धारासाठी’ असे उत्तर त्यांनी दिले होते. सोनम वांगचूक आणि भारत वाटवानी तरी हे सर्व कोणासाठी करीत आहेत? देशासाठी व जनतेसाठी असे कार्य करणे आमच्या राज्यकर्त्यांना कधीच जमले नाही. देशभरात सध्या जाती-धर्माच्या पेटलेल्या लोळाने फक्त अंधारच दिसतो आहे. धूर व धुळीने काळोख दाटला आहे. त्या काळय़ा धुरात हे ‘दोन इडियटस्’ स्वयंप्रकाशाने चमकत आहेत. त्यांची जात व धर्म कुणी विचारू नये!

पडद्यामागे
डॉ. भारत वाटवानी यांनी कार्याची प्रेरणा बाबा आमटे यांच्याकडून घेतली. प्रकाश आणि विकास आमटे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. मनोरुग्ण म्हणजे कुष्ठरोग्यांपेक्षा भयंकर असे मानणाऱया आपल्या समाजाने त्यांचे दहिसर येथील इस्पितळ बंद पाडले. तेव्हा ते सर्व पसारा घेऊन मुंबईबाहेर गेले. सोनम वांगचूक हे परिस्थितीतून स्वतःच घडत गेले. आमीर खानने त्यांचे ‘चरित्र’ पडद्यावर आणले, पण वांगचूक स्वतः पडद्यामागचे कलाकार म्हणून राबत राहिले. आज ते आणि वाटवानी जगाच्या पडद्यावर आले तेव्हा ‘मन’ असलेली असंख्य माणसे त्यांना मानवंदना देण्यासाठी उठून उभी राहिली. सोनम वांगचूक यांना चार दिवसांपूर्वीच कुणीतरी प्रश्न विचारला, ‘स्वातंत्र्यदिन येतोय. युवकांना काय संदेश द्याल?’ सोनम शांतपणे म्हणाले, ‘‘कोणते स्वातंत्र्य राजा? मी तर आजही स्वातंत्र्याची प्रतीक्षा करतोय. इंग्रज यंत्रणेचे अवशेष आजही आम्हाला गुलामीच्या शृंखलात जखडून ठेवत आहेत. आम्ही आजही पोलीस आणि प्रशासनाला तितकेच घाबरतोय, जसे इंग्रज काळात आमचे पूर्वज घाबरत होते. किती लोक आज पोलीस आणि प्रशासनास आपले सेवक मानतात? प्रत्येक संपन्न व्यक्ती दुर्बलांना आपल्या टाचेखाली ठेवू इच्छिते यालाच तुम्ही स्वातंत्र्य म्हणता काय? देशात शिकायचे आणि परदेशात नोकरीला जायचे हेच स्वातंत्र्य आहे काय? हा फरक आपल्याला समजून घेतला पाहिजे. आपल्या युवकांनी आपल्या क्षेत्रात आपला समाज आणि आपल्या देशासाठी वाहून घेतले पाहिजे!’’

‘दोन इडियटस्’ना माझा सलाम!

ट्विटर – @rautsanjay61
जीमेल – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या