रोखठोक – अ‍ॅक्ट ऑफ गॉड!

मोरबी येथील झुलत्या पुलाच्या दुर्घटनेत सुमारे 140 बळी गेले. हा सदोष मनुष्यवध; पण या पुलाच्या दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या ओरेवा कंपनीच्या मॅनेजरने ही दुर्घटना ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ आहे असे सांगून स्वतःची जबाबदारी देवावर ढकलली. देव कुणालाच वाचवत नाही. देवाच्या मूर्तीही चोरल्या जातात व श्रीरामासमोर शरयू नदी साधूंच्या रक्ताने लाल होते. धर्माच्या राज्यात जगभरात सर्वाधिक माणसे मारली जातात. आज इराणमध्ये काय सुरू आहे?

देशात भारतीय जनता पक्षाचे राज्य आल्यापासून धर्माचे राज्य आले व देशावर आता देवाची कृपा झाली आहे, असा प्रचार केला जातो. भाजपची नेते मंडळी प्रचार करतात म्हणजे ते खरेच असेल; पण जगभरातच देवांच्या आणि धर्माच्या राज्यांत सध्या मृत्यूचे तांडव सुरू आहे, ते कोणत्या देवाने थांबवायचे? गुजरातमधील ‘मोरबी’ पुलाच्या दुर्घटनेने देशाचे काळीज फाटले आहे. मोरबीमधील 143 वर्षांचा जुना ऐतिहासिक झुलता पूल अचानक तुटला. या दुर्घटनेतील बळींची संख्या 140च्या आसपास आहे. पूल कोसळला तेव्हा पंतप्रधान मोदी हे गुजरातमध्येच केवडिया येथे भाषण देत होते व तेसुद्धा मोरबीच्या अपघाताने दुःखी झाले. मात्र मोरबीच्या दुर्घटनाग्रस्त पुलाची देखभाल पाहणाऱ्या ओरेवा कंपनीचा मॅनेजर दीपक पारेख याने ही दुर्घटना ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ असल्याचे धक्कादायक विधान केले. मुळात जबाबदारी नीट सांभाळली नाही, योग्य खबरदारी घेतली नाही हा दोष त्या कंपनीचा आणि कंपनीचा अधिकारी म्हणून त्या मॅनेजरचा. मात्र दुर्घटनेतील 140 मृतांची जबाबदारी थेट देवावर ढकलून तो मोकळा झाला. हे महाशय सध्या अटकेत आहेत आणि न्यायालयासमोर त्याने हा धक्कादायक दावा एका निर्लज्जपणे केला. ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ म्हणजे देवाची करणी! खरे म्हणजे मोरबी येथील झुलत्या पुलाचा अपघात हा सदोष मनुष्यवध आहे. मृतांमध्ये महिला, मुले, तरुण, वृद्ध आहेत. हा अपघात बिगर भाजपशासित राज्यांत झाला असता तर केंद्र सरकारने व संपूर्ण भाजपने देशभरात वातावरण गरम केले असते. त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी झालीच असती व एव्हाना पुलाच्या बांधणीत व दुरुस्तीत काही घोटाळा झालाय का, हे पाहण्यासाठी सीबीआय आणि ईडीचे पथक पोहोचले असते, पण झुलत्या पुलाचे 140 बळी हे गुजरातेत ‘देवाचे बळी’ ठरले. Act of God!

धर्माच्या नावावर

झुलता पूल दुर्घटनेत 140 बळी गेले. त्याच्याआधी दोन दिवस दक्षिण कोरियाच्या सेऊलमध्ये ‘हॅलोविन’ या धार्मिक उत्सवादरम्यान दीडशेच्या वर लोक चेंगरून मरण पावले. आपल्या पूर्वजांच्या, नातेवाईकांच्या आत्म्यांना बोलावून त्यांच्याशी संवाद साधण्याचा हा ‘श्राद्धा’सारखा कार्यक्रम असतो, पण स्वर्गातून आत्मे मोठय़ा प्रमाणात त्या कार्यक्रमाला आले व त्यात मनुष्यप्राणी चेंगरून मेले. ना देवाने वाचवले, ना आत्म्यांनी बचावकार्य केले. तेथेही तसे ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’च घडले. काही वर्षांपूर्वी ‘ओ माय गॉड’ या हिंदी चित्रपटातही ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ हा मुद्दा आला होता. देवाच्या नव्या मूर्ती जुन्या भासवून जास्त किमतीला विकणाऱ्या नास्तिक दुकानदाराची कहाणी या चित्रपटात होती. भूपंपात फक्त त्याच्याच दुकानाचे नुकसान होते, विमा कंपनीकडे तो नुकसानभरपाईचा दावा ठोकतो. मात्र ‘भूकंप ही नैसर्गिक आपत्ती’ म्हणजे ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ आहे आणि अशा आपत्तीत कोणतीही नुकसानभरपाई दिली जात नाही या नियमावर बोट ठेवत विमा कंपनी भरपाई नाकारते. पुढे प्रकरण न्यायालयात जाते, इतरही बरेच काही घडते. धर्माच्या स्वयंघोषित ठेकेदारांचे खरे रूप, मानवी अंधश्रद्धा, स्वार्थ अशा अनेक गोष्टींबाबत प्रेक्षकांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला होता. भूकंप ही तशी ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ असूनही चित्रपटातील विमा कंपनी नुकसानभरपाईची जबाबदारी नाकारते आणि आता मोरबी येथील पूल दुर्घटना, त्यात झालेले 140 दुर्दैवी मृत्यू ही ‘अ‍ॅक्ट ऑफ मॅन’ असूनही तिला ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ ठरविण्याचा खटाटोप दुर्घटनेस जबाबदार कंपनीचा मॅनेजर करीत आहे. आणखी एका ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ने लोकांचे काळीज फाटले. विठूरायाच्या दर्शनाच्या ओढीने कार्तिकी यात्रेसाठी कोल्हापुरातून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीत सांगोला तालुक्यात कार घुसली व सात वारकरी ठार झाले, यासारखे दुःख नाही. भक्त दर्शनास निघाले व देवाच्या दारात पोहोचण्याआधीच कायमचे देवाघरी गेले. मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त करून मृतांना प्रत्येकी पाच लाख जाहीर केले. त्यांचे कर्तव्य संपले! अशा ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’च्या कहाण्या वर्षानुवर्षे सुरू आहेत. ज्या अयोध्येतील राममंदिराचे उद्घाटन आता होत आहे व जे श्रीराम आपल्या अस्मितेचे प्रतीक बनले त्या राममंदिराच्या निर्माणासाठी तुंबळ युद्धच झाले. अयोध्येतील शरयू नदी साधुसंतांच्या रक्ताने लाल झाली. पोलिसांच्या गोळीबारात साधुसंतांच्या प्रेतांचा खच पडला. त्यातील अनेक प्रेते शरयूच्या प्रवाहात सोडण्यात आली. ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’चे यापेक्षा भयंकर उदाहरण नसेल!

देवाचे अवतार

मोरबीच्या अपघाताने, त्यातील आक्रोशाने अनेक प्रश्न निर्माण झाले. सर्व काही देवावरच सोडायचे असेल तर राजाने सत्तेच्या सिंहासनावर का बसायचे? ‘राजा कालस्य कारणम्’चा अर्थ काय? घडणाऱ्या प्रत्येक घटनेस राजा जबाबदार आहे. अलीकडे वारंवार सांगितले जाते की, पंतप्रधान मोदी हे सुपरमॅन किंवा महाबली आहेत. मोरबीचा ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ होण्याआधी फक्त चोवीस तास उत्तर प्रदेशच्या शिक्षण राज्यमंत्री गुलाबदेवी यांनी जाहीर केले होते, ‘‘पंतप्रधान मोदी हे देवाचे अवतार आहेत. त्यांनी मनात आणले तर ते तहहयात पंतप्रधानपदी राहू शकतात. संपूर्ण हिंदुस्थान त्यांचे म्हणणे ऐकतो.’’ मोदी यांना देवाचे अवतार मानायचे तर मोरबीतील ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ची जबाबदारी त्यांची आहे हे भाजपने स्वीकारले पाहिजे, पण तसे नाही. श्री. मोदी हेदेखील एक मनुष्यच आहेत व साधारण माणसाप्रमाणेच मोरबीतील ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’मुळे त्यांचे डोळे भरून आले, मन रडू लागले. अनेकदा अनेक प्रसंगांनी मोदी यांना हुंदका फुटतो व ते रडू लागतात. हे मोदी भक्तांनी समजून घेतले पाहिजे. लोकांच्या त्यांच्यावर श्रद्धा आहेत. अंधश्रद्धाही असतील, पण ते देव नाहीत. जालन्याच्या जांब येथील मंदिरातून समर्थ रामदासांच्या मूर्ती, प्रत्यक्ष देवांच्या पुरातन मूर्ती देवळातून चोरीस गेल्या. ती चोरी करणाऱ्या चोरांना देवांनी प्रतिकारही केला नाही. सर्वत्र चोऱ्या, लुटमार, खोटेपणा यांचा ऊतमात सुरू आहे. देवाच्या नावाने शपथा घेतल्या जातात व स्वार्थासाठी त्या मोडल्या जातात. शिंदे यांच्याबरोबर जे चाळीस आमदार गेले त्यांनी देवावर हात ठेवून निष्ठेच्या शपथा घेतल्या होत्या, पण त्यांनी नंतर देवच बदलले! गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी मंदिर आणि चर्चमध्ये एकत्र प्रार्थना करत काँग्रेसशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती, पण शपथ घेणाऱ्या दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली ते सर्व आमदार फुटले. ही देवाशी बेइमानी नाही काय? पुन्हा यावर दिगंबर कामत म्हणाले, ‘‘काँग्रेस सोडणार नाही अशी शपथ मी घेतली होती, मात्र मी पुन्हा देवाकडे गेलो आणि ‘आता परिस्थिती बदलली आहे, तेव्हा काय करू?’ असे देवाला विचारले त्यावर देवाने मला सांगितले की, ‘तुझा निर्णय घे. मी तुझ्या पाठीशी आहे.’ त्यामुळे देवाच्या सल्ल्यानेच मी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला.’’ म्हणजे आपले देव राजकीय सल्ले देतात, पक्षांतरे घडवतात. हासुद्धा वेगळय़ा प्रकारचा ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ आहे!

श्रीमंतांचे लाडू

लालबागच्या राजाच्या दरबारातील सोन्याच्या मोदकाचा लिलाव झाला व एका भाविकाने यंदा हा मोदक 60 लाख रुपयांना विकत घेतला. हैदराबाद येथील बालापूर गणपतीला नैवेद्य दाखवलेल्या 21 किलोच्या लाडूचा तब्बल 25 लाख रुपयांना लिलाव करण्यात आला. स्थानिक व्यापारी व्ही. लक्ष्मी रेड्डी यांनी हा लाडू श्रद्धेने खरेदी केला. हा लाडू घेणाऱ्यास आरोग्य व सुख, संपत्ती मिळते अशी स्थानिक लोकांची श्रद्धा आहे. या लाडवाचे तेज व शक्ती मोरबीच्या झुलत्या पुलापर्यंत पोहोचायला हवी होती. अनेक मुले, आया, भाऊ, बहिणींचे प्राण ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’मुळे वाचले असते, पण ते श्रीमंत नव्हते. त्यांना लाडू विकत घेता आला नाही!

येशू काय सांगतो?

येशू ख्रिस्ताला लोकांनी विचारले, ‘‘तुमच्याबरोबर स्वर्गप्राप्तीचे सौख्य कुणाला मिळणार आहे?’’ तेव्हा येशू ख्रिस्ताने सांगितले, ‘‘संपूर्ण जीवन पार करून क्रोध, मोह, लोभ, काम या शिडय़ा चढून-उतरून ज्यांच्या वृत्ती एखाद्या बालकाप्रमाणे शांत झाल्या आहेत, अशा वृद्धांना मिळेल.’’ आपल्याकडे असे कोणी दिसतात काय? मोदींमुळे सत्ता मिळते म्हणून त्यांचे भक्त त्यांना आज देव मानतात. हा स्वार्थ आहे. कारण स्वतः मोदी एक मानव आहेत. त्यांना राग, लोभ, मत्सर, द्वेष सर्व आहे. देवांतही हे सर्व होते. इराण हे धर्माचे राज्य आहे, पण ‘हिजाब’वरून तेथे रण पेटले आहे व हिजाबला विरोध करणाऱ्या मुलींना धर्मराज्यवाले गोळय़ा घालून मारत आहेत. हा वेगळय़ाच प्रकारचा ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ दिसतो. शेवटी सत्य हेच आहे की, माणसांचे प्रश्न माणसांनीच सोडवायचे असतात. अनेकदा महान महान नेत्यांचाही जेव्हा ‘हॅम्लेट’ होतो किंवा त्यांच्या भोवतालचे लोक श्रद्धेचा बाऊ करून त्यांचा ‘हॅम्लेट’ करतात, तेव्हा विश्वासघाताची भुते विश्वासाने वावरतात व एक महान शोकांतिका जन्म घेते. शोकांतिकेने जगात जागोजाग जन्म घेतला आहे. प्रत्येक धर्मात, जातीत ही शोकांतिका आज दिसते. आधी नेत्यांचे ‘हॅम्लेट’ होत असे. आता नेते देवांचाही ‘हॅम्लेट’ करू पाहत आहेत. ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ हा त्या ‘हॅम्लेट’चाच प्रकार! गुजरातच्या मोरबीत तो दिसला. देवाचे अवतार ठरवलेले श्री. मोदी तरी काय करणार?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, ‘‘या देशात दगडाला शेंदूर लावणे सोपे आहे, पण नंतर तो खरवडून काढणे कठीण आहे.’’ अशा सगळय़ा ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’वाल्यांसाठी संत गाडगे महाराजांनी जे म्हटले आहे ते देतो व विषय संपवतो –

।। म्हसोबा ।।

शेंदूर माखोनिया धोंडा
पाया पडती पोरे रांडा।
देव दगडाचा केला
गवंडी त्याचा बाप झाला
देव सोन्याचा घडविला
सोनार त्याचा बाप झाला
सोडोनिया खऱ्या देवा
करी म्हसोबाची सेवा!
– गाडगे महाराज

[email protected]