रोखठोक – त्यांचं नक्की कसं चाललंय?

rokhthok

काळ तर मोठा कठीण आला आहे. कोरोना संकटाने 10 कोटी बेकार निर्माण केले. 40 कोटी कुटुंबांच्या चुली विझल्या. मध्यमवर्गीय समाजातील नोकरदारांच्या नोकर्‍या गेल्या. त्यांच्या प्रश्नावर उतारा काय? राममंदिराचे भूमिपूजन होईल, राजस्थानात भाजपला हवे ते घडेल. फ्रान्सवरून राफेल विमानेही अंबालात उतरली. पण ज्यांनी या काळात नोकर्‍या गमावल्या त्यांचं नक्की कसं चाललंय, हे राज्यकर्ते कधी सांगतील काय? 

अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होत आहे. हा सोहळा 5 ऑगस्टला फक्त 200 निमंत्रितांच्या उपस्थितीत होईल. हे निमंत्रित कोण ते भारतीय जनता पक्ष किंवा संघ परिवारच ठरवणार. अयोध्या दिवाळीप्रमाणे सजू लागली आहे असे वाचले. त्याचबरोबर राममंदिराचे पुजारी व तेथील सेवक, सुरक्षा रक्षकांवर कोरोनाने हल्ला केल्याची बातमी समोर आली. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गात भूमिपूजन सोहळा नक्की कसा होणार ते पाहावे लागेल. मंदिराचे भूमिपूजन होत आहे हे महत्त्वाचे. रामाचा वनवास भक्तांनी संपवला असला तरी सध्याचा काळ मोठा कठीण आला आहे हे आपले पंतप्रधानसुद्धा मान्य करतील. जीवनासंबंधी एवढी विवंचना आणि असुरक्षितता आजपर्यंत कधी कुणाला वाटली नसेल. कोरोना व्हायरस महामारीमुळे आपल्या देशात 10 कोटी लोक रोजगार गमावणार आहेत. हा वरवरचा आकडा आहे. ‘कोरोना मंदी’मुळे किमान 40 कोटी कुटुंबांच्या उपजीविकेवर आक्रमण होईल असा माझा अंदाज आहे. चार लाख कोटींचा फटका व्यापार उद्योगास बसला आहे. त्यात लहान व्यापारी, दुकानदार मोठ्या प्रमाणात आहेत. लोकांच्या संयमालाही मर्यादा आहेत. नुसत्या आशेवर आणि आश्वासनांवर लोकांनी कुठवर दम काढायचा? गेल्या पंधरा वर्षांत लोकांची एकही अडचण दूर झाली नाही. उलट अडचणी वाढत गेल्या. कोरोनामुळे आज जगायचे कसे, हा एकच प्रश्न अक्राळविक्राळ स्वरूप धारण करून प्रत्येक घरात उभा ठाकला आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू हे पंतप्रधान मोदी यांचे मित्र आहेत. आर्थिक डबघाई आणि कोरोनासंदर्भातले अपयश यामुळे संतापलेल्या इस्रायली जनतेने जागोजागी रस्त्यावर उतरून निदर्शने सुरू केली आहेत. इस्रायलची जनता पंतप्रधान नेतान्याहू यांचा राजीनामा मागत आहे. ही वेळ हिंदुस्थानवरही येऊ शकते.

या आहेत उपाययोजना

हिंदुस्थानातही कोरोनाचे संकट भयंकर आहे. त्यावर ‘मात’ करण्यासाठी सरकारी पातळीवर काय उपाययोजना सुरू आहेत पहा –

1) क्षेपणास्त्र, घातक बॉम्ब यांनी भरलेली पाच फायटर जेट राफेल हिंदुस्थानात पोहोचली. अंबाला एअरफोर्स स्टेशनवर त्यांचे आगमन झाले व या विमानांच्या सुरक्षेसाठी आसपासच्या परिसरात
144 कलम लागू केले आहे.

2) राजस्थानमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण करून काँगेसचे गेहलोत यांचे सरकार अडचणीत आणले. तेथे आता राष्ट्रपती राजवट लावली जाईल असे वातावरण दिसते.

3) भाजपच्या एक नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सांगितले, रोज एकाग्रतेने हनुमान चालिसा पठण केल्याने कोरोनासह सर्व संकटांपासून मुक्ती मिळेल. (40 कोटी लोकांनी रोजगार गमावला. त्यांना काम मिळेल काय?)

4) सोन्याचा भाव 51 हजार रुपये तोळा असा झाला.

5) भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जाहीर केले, आता महाराष्ट्रात स्वबळावरच सत्ता आणू.

या बातम्यांचे महत्त्व असे की, संकटावर कुणी बोलत नाही. भूक, बेरोजगारीवर कुणी तळमळ व्यक्त करताना दिसत नाही. ‘संकट हीच संधी’ अशी वाक्ये तोंडावर फेकणे सोपे आहे, पण लोक संकटाशी कसे मुकाबला करीत आहेत हे कुणालाच माहीत नाही!

सर्व बंद आहे

कॉलेज, कारखाने, दुकाने बंद आहेत. मॉल्स, रेस्टॉरंट बंदच आहेत. लोकल ट्रेन्स, सार्वजनिक वाहतूक ठप्प आहे. शेतीची उत्पादने पडून आहेत. जिथे जावे तिथे निराशेचे सुस्कारे आणि हताशपणाचे हातवारे याखेरीज दुसरे काहीच ऐकायला आणि पाहायला मिळत नाही. महाराष्ट्रात एस.टी. कामगारांचे पगार झाले नाहीत. त्याची तरतूद सरकारी पातळीवर होईल. सरकारी कर्मचार्‍यांचे पगारही कर्ज काढून केले जातील, पण याशिवाय एक मोठा वर्ग समाजात आहे. त्याला कुणीच वाली नाही! रस्त्यावर ‘चर्मकार’ असतो. प्रत्येक गल्लीत एकतरी असतो. दिवसभरात त्याच्याकडे पन्नास फाटक्या चपला शिवायला व पॉलिशला येतात. पावसाळ्यात तो छत्र्याही दुरुस्त करून देतो. चार महिन्यांपासून हा रस्त्यावरचा चर्मकार व त्याचे कुटुंब कसे जगते आहे? पंतप्रधानांचे 20 लाख कोटींचे शिंतोडे त्याच्यावर उडाले आहेत काय? अनेक ओळखीची माणसे भेटतात. त्यांना आपण विचारावे, ‘‘सध्या काय करता?’’ तर त्यातली तरुण पोरेही निर्विकारपणे उत्तरे देतात, ‘‘काही नाही, सध्या घरीच असतो.’’ आपण त्यांना पुढे विचारावे, ‘‘मग घर चालते कसे?’’ यावर ‘‘कुठे काय चालले आहे?’’ असे उत्तर देऊन निघून जातात. या सगळ्यांचे चालते कसे? हा प्रश्न कोणत्याही सरकारला पडायलाच हवा व यांचे हे असे किती काळ चालत राहणार? हा प्रश्न स्वतःच्याच मनाला विचारायला हवा.

बेकारांचे काय?

लाखो नव्हे, कोट्यवधी लोक आज बेकार होऊन घरी बसले आहेत. आभाळाला अनेक भोके पडली आहेत. अनेक धंदे बंद पडले आहेत. दुकानाला टाळी लागली आहेत. उद्योगांचे दिवाळे वाजले आहे. शिक्षण बंद पडले आहे. नोकरकपात आहेच, पण नोकर्‍या आहेत त्यांची पगारकपात झाली आहे. महागाई, गरिबी आणि बेकारी यांचे असंख्य वणवे समाजात भडकले आहेत. कोविडचे युद्ध हे रणांगण आहेच. या रणांगणात सरकार उतरलेच आहे. रणांगणाच्या आघाडीपेक्षाही आर्थिक आघाडी महत्त्वाची आहे. जे प्राण कोविडच्या रणांगणात वाचवले, ते प्राण आर्थिक आघाडीवर गमावले तर नक्की कमावले काय, हा प्रश्नच राहील. हनुमान चालिसा पठणाने कोरोना जाईल हे खरे असेल तर हनुमान चालिसा पठणाने रोजगार गमावलेल्या 10 कोटी लोकांना जगण्यापुरते तरी काम मिळेल काय?

पाच राफेल लढाऊ जेट विमाने अंबाला एअरफोर्स स्टेशनवर उतरली. हे चांगलेच झाले. पण याआधीही सुखोईपासून मिगपर्यंत अनेक फायटर जेट विमाने परदेशातून आपण येथे आणलीच आहेत. त्यांचा हा असा इतका उत्सव कधी झाला नव्हता. सुखोई, मिगनेही दुश्मनांवर हवाई हल्ले करून विजय मिळवलेच आहेत. पण लोकांना उत्सवाची, जत्रांची भांग पाजून मूळ प्रश्नांपासून दूर न्यायचे धोरण सुरू आहे. बॉम्ब आणि क्षेपणास्त्रवाहक राफेल विमाने देशासमोरच्या बेरोजगारी व आर्थिक आव्हानांचा विध्वंस करतील काय?

आज देशातली सामाजिक व आर्थिक परिस्थिती नेमकी कशी आहे? एका वाक्यात सांगायचे तर, लोक स्वतःला ‘गुलाम’ म्हणून विकायला तयार होतील. पूर्वी फिजी, मॉरिशस, गयाना, सुरिनाम अशा बेटांवर इंग्रजांनी हिंदुस्थानींना गुलाम म्हणून नेले. तसे ‘गुलाम’ म्हणून जायला लोक तयार होतील याचे भान आमच्या राज्यकर्त्यांना नसेल तर त्यांनी राफेलचे उत्सव साजरे करावेत.

राजाने प्रजेसाठी तळमळावे. उत्सवात मग्न असू नये. जगभरातले चित्र हताश करणारे आहे. लोकांचे नक्की कसे चालले आहे? ते कसे जगत आहेत?

स्थिती गंभीर आहे!

@rautsanjay61

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या