रोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल!

6993
shivaji-maharaj-1

rokhthok

शिवाजी महाराजांचे ‘स्वामित्व’ कुणा एका पक्षाकडे नाही. महाराष्ट्र राज्य, 11 कोटी मराठी जनता हाच शिवरायांचा वंश. शिवराय हेच महाराष्ट्राचे ‘स्वामी.’ स्वामींना हवे तेच घडेल!

हाराष्ट्रात प्रत्येक कार्यात शिवरायांचे नाव घेण्याची प्रथा आहे. त्यातून राजकारणही सुटले नाही. आम्ही शिवरायांच्या मार्गावरून चालतो, असे राज्यकर्ते सांगत असतात. म्हणजे ते नेमके काय करतात हे शोधावे लागते. ‘‘शिवरायांचा आशीर्वाद फक्त आपल्याला म्हणजे भारतीय जनता पक्षालाच आहे,’’ असा प्रचार निवडणुकीत झाला. सातारचे शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश घेतला व आता छत्रपतीच आपल्या सोबत असल्याचे पंतप्रधान मोदी व भाजप नेत्यांनी सातारच्या प्रचारसभेत सांगितले. सातारच्या जनतेने उदयनराजे भोसले यांचा मोठा पराभव केला. हा पराभव छत्रपतींच्या विचारांचा नव्हता, तर व्यक्तीचा होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात ‘शिवाजी’ असा केला म्हणून लोकांना चीड आली व शेवटी अमिताभ बच्चन यांना माफी मागावी लागली. ही श्रद्धा महत्त्वाची. महाराष्ट्राचे राजकारण शिवरायांच्या विचाराने खरेच चालले आहे काय?

ते स्वराज्य होते

शिवाजी महाराजांचे राज्य खूप मोठे किंवा विशाल नव्हते, तरीही ते स्वराज्य होते. शिवाजी महाराजांचा प्रदेश नेहमी अस्थिर  (Unsettled in a flux) नव्हता असे सांगून मराठा साम्राज्याची विभागणी स्वराज्य व मोगलाई अशी होती हे दाखविले जाते. शिवरायांच्या पत्रिकेचे वर्णन करताना कवी परमानंद  ‘‘स्वराज्य संविधास्यति’’ अवतरणात देऊन सांगतात की, शिवाजीराजांनी औरंगजेबाच्या मस्तकावर पाय देऊन स्वराज्य स्थापन केले. तसेच ‘‘औरंगशहाला स्वतःलाच दिल्लीत कोंडीन’’ या इंग्रजी रेकॉर्डमधील शिवाजी महाराजांच्या वाक्याने बरेच काही स्पष्ट केले आहे. शिवाजी महाराजांचा उल्लेख काही इतिहासकारांनी ‘शिवाजी’ असा एकेरी केला. असा एकेरी उल्लेख केल्याने महाराष्ट्रीयांचा स्वाभिमान दुखावेल असा टोला दत्तो वामन पोतदार यांनी जदुनाथ सरकारांना हाणला होता. ‘शिवाजी’ किंवा ‘शिवाजी महाराज’ असा नामनिर्देश न करता फार्सी साधनातील ‘शिवा’ हेच नामाभिधान जदुनाथ सरकार वापरतात. यावर तीक्र प्रतिक्रिया व्यक्त करून पोतदार विचारतात की, त्यांना ‘जदुनाथ’ असे न संबोधता केवळ ‘जदू’ असे म्हटले तर कसे वाटेल? आपल्या युगपुरुषाला ‘शिवा’ असे म्हणण्याने संपूर्ण मराठी जगत आपलाच अपमान समजेल असे दत्तो वामन पोतदार यांनी तेव्हाच्या इतिहासकारांना ठणकावले होते. सध्या शिवाजी महाराजांवर एक जातीय अधिकार सांगणाऱ्यांनी दत्तो वामन पोतदारांनी दिलेली ही टक्कर विसरता कामा नये.

राजकीय व्यापार

शिवाजी महाराजांना आपण एका चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला. शिवाजीराजांच्या नावाचा राजकीय व्यापार अलीकडे झाला. गुजरातला सरदार पटेलांचे अति उंच स्मारक उभे राहिले, पण ‘युगपुरुष’ शिवाजीराजांच्या समुद्रातल्या स्मारकाची एक वीटही रचली गेली नाही. शिवरायांनी पराक्रम केला. त्यांच्या तोडीचा ‘योद्धा’ झाला नाही. त्या काळात आजच्यासारखी दळणवळणाची, संपर्काची साधने नव्हती तरीही शिवरायांच्या शौर्यकथा, त्यांच्या बातम्या सगळय़ांना कळत होत्या. महाराजांच्या पराक्रमाची कीर्ती दूरच्या आसामपर्यंत पसरलेली होती. आसामी भाषेत बखरींना ‘बुरंजी’ असे म्हणतात. या पादशाही बुरंजीचे इंग्रजी भाषांतर उपलब्ध आहे. औरंगजेबाच्या जवळचा नातेवाईक शाहिस्तेखान याचा शिवाजीराजांनी पराभव केला. ही कारवाई पुण्यात झाली. औरंगजेब हा कडक शिस्तीचा असल्याने त्याने शाहिस्तेखानाची बदली आसाम – बंगालच्या सुभेदारीवर केली. खान तेथे गेल्यावर त्याला तेथील स्थानिक राजा विचारतो, ‘‘शाहिस्तेखान? म्हणजे शिवाजीने ज्याची बोटे कापली तो तूच काय?’’ आजच्यासारखी जलद दळणवळणाची साधने नसतानाही आणि तार, दूरध्वनी, वार्ताहर, वृत्तपत्रे यापैकी काही नसतानाही ही ‘कथा’ आसामपर्यंत पोहोचली. कारण शिवाजीराजा या नावाभोवती असलेले शौर्याचे वलय!

लढाईचे हेतू

शिवाजी महाराजांच्या लढायांचा विचार करता आपण फक्त औरंगजेबाच्याच लढायांवर चर्चा करतो, पण या तोडीच्या अनेक लढाया महाराज लढत राहिले व जिंकले. फत्तेखानाची लढाई रंजक आहे. महाराजांनी आदिलशाहीविरुद्ध पहिला मोठा लढा शिरवळजवळच्या वेलसर या गावी दिला. फत्तेखानाचा त्यात संपूर्ण पराभव झाला. अशा केवळ नावांकडे न पाहता फत्तेखान कोण, मुस्तैद खान कुठला हे समजून घेतले पाहिजे. हा विजय तितकाच मोठा होता. त्यानंतर महाराजांनी अनेक विजय मिळवले. तो इतिहास सगळय़ांना ठाऊक असला तरी त्या लढाया, कारवाया, चढाया करण्यात आल्या त्याचा हेतू कोणता? त्यातून काय साध्य करायचे होते हे पाहावे लागते. शिवाजी महाराजांची प्रत्येक लढाई सत्तेसाठी नव्हती, कित्येकदा ती स्वाभिमानाची होती.

हिंदुस्थानात अनेक परदेशी लोक आले. त्यांनी शिवाजीराजे, अकबर बादशहा, औरंगजेबास पाहिले; पण इंग्रजी भाषेत चरित्रे लिहिली गेली ती मात्र शिवाजीराजांचीच! या मंडळींना शिवाजीराजांची चरित्रे (Biographies) का लिहावीशी वाटली? शिवाजीराजे असे कोण होते की, त्यांच्याविषयी त्यांना आपल्या भाषेत लिहावेसे वाटले?

ऍबे करे याचेच पहा. त्याने शिवाजीराजांच्या मुलखातून प्रवास केला. तो फ्रेंच माणूस राजापूरला (कोकणात) जात होता. तेथे फ्रेंचांची वखार होती. त्याने काय घडले ते स्वतःच सांगितले आहे. चौलच्या गव्हर्नरने त्याचे स्वागत केले आणि सांगितले, ‘‘मला राजापूरला जायचे असून तुझ्या प्रदेशातून जावे लागणार आहे.’’ पुढे झालेल्या चर्चेत फ्रान्स देशाचा विषय निघाला तेव्हा ‘‘तुमचा राजा कोण, तुमचे कायदेकानू कसे आहेत?’’ अशी त्याने चौकशी केली. उलट ऍबे करे याने शिवाजी महाराजांबद्दल माहिती विचारली. त्याला तेव्हा जे सांगण्यात आले ते महत्त्वाचे आहे. ‘‘माझे ते स्वामी आहेत. त्यांना सिंधूपासून गंगेपर्यंत प्रदेश जिंकावयाचा आहे.’’ इतर बरीच माहिती ऍबे करे याने दिली आहे, पण प्रश्न असा की, शिवरायांचे ध्येय कोणते होते? शिवाजी महाराजांच्या चौल येथील गव्हर्नरने करे याला जे सांगितले त्याचा त्याला का उल्लेख करावासा वाटला?

हे काही कल्पित, ललित नाही. तारीखवार दिलेले आहे. शिवाजी महाराज कारवारला जात असताना तेथे ब्रिटिश व्यापारी होते. त्यांनी फारच चांगले वर्णन केले आहे. ‘‘जुलियस सीझरसारखा शिवाजी जेथे जातो तेथे पाहतो आणि जिंकतो.’’ हे इंग्रज लेखक शिवरायांची जुलियस सीझरप्रमाणेच हानिबालशी आणि इतरांशी तुलना करतात. सीझर, हानिबाल, सार्टोरीस ही सामान्य माणसे नव्हती. युरोपच्या इतिहासात ती गाजलेली आहेत. ते सर्व असामान्य, महान योद्धे होते. त्यांना आपल्याविषयी काय वाटते? त्यांना या लढवय्यांशी शिवाजी महाराजांची तुलना का करावीशी वाटली? त्यांनी लिहिलेल्या पत्रात आणि प्रतिवृत्तात असे उल्लेख करावे असे त्यांना का वाटले? या सर्व गोष्टी पाहून त्यांचा विचार करावयास हवा. हे निरपेक्ष पुरावे आहेत.

इतिहासात पानापानांवर तसे दाखले आहेत. शिवाजी महाराजांनी जे पेरले तेच महाराष्ट्रात आणि देशात उगवले. महाराष्ट्राच्या मातीत ढोंग आणि अहंकार चालत नाही हीच शिवरायांची शिकवण. शिवाजी राजांच्या नावाने राज्य चालते. त्यांच्या नावाच्या शपथा घेतल्या जातात. शब्द दिले-घेतले जातात. ते शब्द न पाळणारे राज्यकर्ते म्हणून मिरवू लागले की, महाराष्ट्राचे अधःपतन सुरू झाले असे समजावे. महाराष्ट्राने ‘स्वामिकार्या’स प्राधान्य दिले. आज ‘स्वामिकार्य’ सुरू आहे. शिवराय एकजातीय, एकपक्षीय नाहीत. महाराष्ट्र हाच शिवरायांचा वंश. 11 कोटी जनता ही वंशावळ. ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल.

Twitter- @rautsanjay61
Email- [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या