ऑफिसला चला ‘रो पॅक्स’ने; लोकलची गर्दी, ट्रफिक जाममधून होणार सुटका

1365
ropak-service-seaway

नवी मुंबई ते मुंबई दरम्यान प्रवास करणाऱया हजारो प्रवाशांसाठी ‘रो पॅक्स’ ही जलवाहतूक सेवा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, तर हॉवरक्राप्ट टॅक्सी सेवा जुलैपासून उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या वॉटर टॅक्सीची सध्या चाचणी सुरू आहे. त्यामुळे ट्रफिक तसेच लोकलमधून खचाखच प्रवास करणाऱया हजारो चाकरमान्यांना दिलासा मिळणार असून अथांग समुद्राचा आनंद घेत ‘ऑफिस’ गाठता येणार आहे.

20 वर्षांपूर्वी वाशी ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान सुरू असलेली हॉवरक्राप्ट सेवा पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने सिडको, मेरीटाइम बोर्डाची चाचणी सध्या सुरू आहे. बेलापूर ते भाऊचा धक्का यादरम्यान ही सेवा चालणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईच्या वाहतूककोंडीत अडकणाऱया प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. बेलापूर ते भाऊचा धक्का या दरम्यान चालणारी ही सेवा नंतर नेरूळ, वाशी, ऐरोली आणि नियोजित नवी मुंबई विमानतळ दरम्यान विकसित केली जाणार आहे. या जलवाहतुकीने केवळ 20 ते 22 मिनिटांत मुंबई गाठता येणार आहे. या हॉवरक्राप्ट सेवेची क्षमता 10 ते 25 प्रवाशांची राहणार आहे. सहा वॉटर टॅक्सी ऑपरेटरनी ही सेवा सुरू करण्यासाठी रस दाखविला आहे. हॉवरक्राफ्ट सेवेदरम्यान प्रवाशांबरोबरच वाहनांची वाहतूक करणारी ‘रो पॅक्स’ सेवा फेब्रुवारीमध्ये सुरू होण्याची शक्यता मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सूत्रांनी व्यक्त केली.

120 वाहनांची एकाच वेळी वाहतूक

‘रो पॅक्स’ सेवेत एकाच वेळी 120 वाहनांची वाहतूक केली जाणार आहे. नवी मुंबई आणि मुंबईतून मांडवा अलिबागपर्यंत ही सेवा सुरू केली जाणार आहे. त्यासाठी लागणारी जेट्टी सिडको, मेरीटाइम बोर्ड आणि बीपीटी मिळून नेरूळ येथे बांधत आहे. या दोन सेवांमुळे रस्ते वाहतुकीवर पडणारा वाहनांचा ताण कमी होणार आहे.

‘रो पॅक्स’ वाहतुकीची चाचणी सध्या सुरू असून ही सेवा फेब्रुवारी, मार्च दरम्यान सुरू केली जाणार आहे, तर हॉवरक्राफ्ट सेवा जुलैपर्यंत सुरू होणार आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारी ही एक जलद सेवा ठरणार असून महामार्गावरील वाहनांची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
– संजय भाटिया, अध्यक्ष, मुंबई पोर्ट ट्रस्ट.

आपली प्रतिक्रिया द्या