ड्रोनच्या घिरट्यांनंतर रोषणगावात शेतवस्तीवर घरफोड्या

बदनापूर तालुक्यातील रोषणगाव येथे काही दिवसांपूर्वी घरांवर घिरट्यांनंतर बुधवारी मध्यरात्री दोन घरांमधून अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून अडीच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला.

यामध्ये सोन्याचांदीच्या दागिन्यांसह इतर घरगुती मालाचा समावेश आहे. याप्रकरणी गुरूवारी सदरील दोन्ही चोरीच्या प्रकरणात बदनापूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासकामी एक पथक रवाना झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक भागवत यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनस्थळी आंतरवाली सराटी येथे ड्रोनच्या ‘घिरट्या’ सुरू असल्याच्या चर्चेने खळबळ उडाली होती. गोंदी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अशा घिरट्या पाहिल्याची चर्चा सुरू होती. परंतु पोलिसांकडून प्रत्यक्षात काही कार्यवाही झाल्याचे ऐकिवात नाही. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी बदनापूर तालुक्यातील रोषणगाव येथे दुधना नदी परिसरात ड्रोनच्या ‘घिरट्या’ सुरू झाल्याची चर्चा होती. याच भागातील दोन घरांमधून बुधवारी मध्यरात्री तीन ते चार चोरट्यांनी सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. सुरेश सुखदेव खरात यांच्या घरातून सुमारे चाळीस हजारांपेक्षा अधिक किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. मध्यरात्री सुरेश खरात व त्यापाठोपाठ त्याच भागात

शेतवस्तीवरील कैलास धिंग्राजी यांच्या शेतवस्तीसमोर येऊन चोरट्यांनी कुत्र्यांना दगड मारून घायाळ केले व धिंग्राजी यांच्या घराची कडीकुलूप तोडून आत प्रवेश करून पेटीतील दागिने व इतर ऐवज लंपास केला.

चोरट्यांची हिंमत म्हणजे ती पेटीच त्यांनी चोरून नेली. या चोरीचा प्रकार खरात व धिंग्राजी या दोन्ही कुटुंबियांना पहाटे चारच्या सुमारास निदर्शनास आला. आज सकाळी दोन्ही कुटुंबियांच्या वतीने बदनापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिस निरीक्षक भागवत व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व त्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली.