कोल्हापूरच्या न्यू पॅलेसमध्ये शाही शिवराज्याभिषेक सोहळा

राज्यभरात आज सर्वत्र मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. ऐतिहासिक किल्ले रायगडावर युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. तर करवीर नगरीत नवीन राजवाडा येथे सकाळी साडेसात ते दहा या दरम्यान दरबार हॉलमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.

खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, याज्ञसेनीराजे छत्रपती महाराणीसाहेब, मालोजीराजे छत्रपती, मधुरीमाराजे छत्रपती, यशस्विनीराजे छत्रपती तसेच यशराजराजे छत्रपती यांच्यासह करवीर जनतेच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीवर वैदिक शाळेतील पुरोहितांच्या पारंपरिक वेदोक्त मंत्रोच्चारात सुवर्णाभिषेक करण्यात आला.

नेहमी नवीन राजवाडा परिसरातील लॉन्सध्ये साजरा होणारा हा शिवराज्याभिषेक सोहळा यंदा पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच नवीन राजवाडामधील दरबार हॉलमध्ये  साजरा करण्यात आला. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी रयतेला शुभेच्छा देताना, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा आदर्श घेऊन आपले कार्य सर्वांनी सुरू ठेवावे असे मार्गदर्शन केले. पारंपरीक सनई चौघडय़ांचे मंजूळ सुर, मराठा लाईट इन्फंट्रीच्या सिल्वर वाद्यवृंदाची मानवंदना, शाहिरांचा पोवाडा तसेच मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके अशा भारलेल्या वातावरणात राज परिवारातील सदस्य, मानकरी, शिवप्रेमी, शासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.