
चालती लोकल पकडण्याच्या घाई गडबडीत एका महिलेच्या कुशीत असलेला तिचे लहान बाळ कुशीतून निसटले. त्याचवेळी आरपीएफच्या कॉन्स्टेबलने चित्त्याच्या चपळाईने झेप घेत या चिमुकल्याला अलगद झेलले आणि वाचविले. यानंतर या मुलाची आईही फलाटावर कोसळल्याने तेव्हा एका सजग प्रवाशाने तिला पटकन खेचून गॅपमध्ये जाण्यापासून वाचविले. ही थरारक घटना मंगळवारी दुपारी मानखुर्द स्थानकात घडली असून सीसीटीव्हीत ती कैद झाली आहे. या घटनेत मायलेकांचे प्राण वाचविणार्या दोघांचे कौतुक होत आहे.
मानखुर्द रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सीएसएमटीला सुटणारी लोकल अन्य महिला सहकार्यांसह घाईने पकडताना एका महिला प्रवाशाचा तोल सुटला ते पाहुन येथे गस्तीवर असलेल्या साध्या वेषातील कुर्ला पोलीस ठाण्याच्या गुप्तचर शाखेचे इन्सपेक्टर एस.एम.कोटवाल, हेडकॉन्स्टेबल आर.आर.पाटणे आणि कॉन्स्टेबल अक्षय सोये यांनी लोकलच्या प्रवाशांना सजग करीत या महिलेला आत खेचण्यास सांगितले. परंतू लोकलच्या दारात प्रचंड गर्दी असल्याने ही महिला आत शिरू शकली नाही. लोकलने वेग पकडल्यामुळे त्या महिलेचा तोल जाऊन ती पडणार हे पाहून कॉन्स्टेबल अक्षय सोये यांनी तिच्या कडेवरील बाळाला अलगद पकडुन प्लॅटफॉर्मवरील गॅपमध्ये त्याला पडण्यापासून वाचविले. तर त्या महिलेला एका सजग प्रवाशाने खेचून बाजूला केल्याने तिचे प्राण वाचले. या दोघांच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतूक होत आहे.



























































