
इंग्रजांच्या काळात सविनय कायदेभंग करणे ठीक होते. पण आज आपले स्वराज्य आहे. आपला देश संविधानानुसार चालतो. त्यामुळे आपल्याच माणसांना आपल्याच पुढे शत्रू म्हणून उभा करण्याचे जी कारस्थाने केली जात आहेत ती हाणून पाडा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात केले आहे.
प्रत्येकाने आज घर आणि कुटुंबानंतर आपल्या समाजासाठी आवर्जून वेळ काढला पाहिजे. समाजाच्या उन्नतीसाठी प्रत्येकाची लढाई वेगवेगळय़ा प्रकारची असली तरी दिशा एकच असली पाहिजे. संकट आले की आपण एकजूट होतो हे वारंवार सिद्ध झाले आहे. पण संकट येऊच नये यासाठी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, असे मोहन भागवत म्हणाले. अनेकांच्या त्याग आणि बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्या मार्गाने पुन्हा जायचे असेल तर त्यागाची तयारी ठेवा. संपूर्ण जगाला जोडण्याचा मंत्र देणारा, जगाला अहिंसा देणारा, अपार शक्ती देणारा आपला देश आहे. त्यामुळे यापुढेही अहंकार आणि विकारांवर मात करत पुढे जायचे आहे, असेही भागवत यांनी स्पष्ट केले.
हिंदुस्थानला मोठे करण्यासाठी जोशाबरोबरच होशही हवाच
आज आपण तरुणाईचे दुसरे नाव जोश असल्याचे पाहत आहोत, पण त्या जोशासोबत होशही असायलाच हवा. 2047 मध्ये आपल्याला हिंदुस्थानला मोठे करायचे आहे. त्यासाठी जोशासोबत होश हवाच, असेही मोहन भागवत यांनी सांगितले.























































