अमुक एका पक्षाचे काम करायला स्वयंसेवकांना ‘संघ’ सांगत नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

‘संघ’ आपल्या स्वयंसेवकांना कुठल्याही विशिष्ट पक्षाचे काम करायला कधीच सांगत नाही. राष्ट्राच्या हितासाठी काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहा, एवढाच संघाचा त्यांना सल्ला असतो, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज येथे सांगितले. संघ सरकारच्या कामात कधीच हस्तक्षेप करत नाही. नागपुरातून सरकार चालत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ते दिल्लीत भरलेल्या संघाच्या तीन दिवसांच्या अधिवेशनात बोलत होते.

संघाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी सरसंघचालकांनी काँग्रेसचा मुक्त कंठाने गौरव केला होता. आपल्या स्वातंत्र्यलढय़ात काँग्रेसचे योगदान महत्त्वपूर्ण असून त्या पक्षाने देशाला अनेक ‘महापुरुष’ दिलेत, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले होते.

सरसंघचालक भागवत यांनी आपल्या आजच्या भाषणातून संघ आणि भाजप यांच्यातील फरक स्पष्ट करण्यावर भर दिला. संघ आणि भाजप यांचे कार्य आणि कार्यपद्धतीसुद्धा भिन्न आहे, असे भागवत यांनी सांगितले. संघात जडणघडण झालेले अनेक जण भाजपमध्ये आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक म्हणाले की, विशिष्ट पक्षाच्या कामकाजात ‘संघ’ हा महत्त्वाची भूमिका बजावतो, असा समज पसरलेला आहे. पण तो साफ चुकीचा आहे. ‘संघ’ हा राज्चकारणापासून अलिप्तच असतो. केवळ राष्ट्रहिताच्या प्रश्नांवर संघाची निश्चित मते, भूमिका असते. ती संघ मांडत राहतो.

सत्तेचे केंद्र हे देशाच्या राज्यघटनेला अभिप्रेत असल्याप्रमाणेच हवे. तसे ते नसेल तर अत्यंत चुकीचे आहे अशी ‘संघा’ची भूमिका आहे- मोहन भागवत, सरसंघचालक