मोदींऐवजी अमित शहांना हटवण्याकडे संघाचा कल, गडकरींना अधिक बळ देणार

27

सामना प्रतिनिधी । नागपूर

भारतीय जनता पक्षाला तीन राज्यांतील सत्ता गमावावी लागल्यानंतर ‘राजतिलक की करो तैयारी, आ रहे है नितीन गडकरी’ अशी मागणी भाजपच्याच काही गोटातून पुढे येत आहे, मात्र अंतस्थ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संघ परिवार सध्या पंतप्रधानपदाबाबत कोणताही बदल करण्याच्या मानसिकतेत नाही. मात्र वरिष्ठ स्तरावर फेरबदल करून नितीन गडकरींना अतिरिक्त बळ देत मोंदीचे पंख छाटण्याचा संघ परिवाराचा विचार असल्याची माहिती मिळत आहे.  तसेच मोदींना धाकात ठेवण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा यांना पदावरून हटवण्याकडे संघाचा कल झुकला आहे.

अंतस्थ गोटातील माहितीनुसार मोदींनी परिवारातील ज्येष्ठांचा सल्ला डावलत अमित शहा यांना राष्ट्रीय अध्यक्ष केले. त्यामुळे संघ आणि भाजप वर्तुळातील फार मोठा वर्ग दुखावला आहे. त्यातच अमित शहा यांची एकाधिकारशाही सर्वांना गृहीत धरून चालण्याची प्रवृत्ती पक्षाला अडचणीची ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त होतो आहे. आज पक्षाला पुढच्या निवडणुकीतही यश हवे असेल तर मोदींना हटवावे आणि त्या ठिकाणी नितीन गडकरी किंवा राजनाथ सिंह यांना आणावे अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

अंतस्थ गोटातील माहितीनुसार या तीन राज्यांतील पराभवानंतर लगेचच मोदींना बाजूला करणे धोक्याचे ठरेल असे संघ परिवारातील ज्येष्ठांना वाटते. असे केल्याने चुकीचा संदेश जाऊ शकतो असे मान्यवरांचे मत आहे. मात्र मोदी आणि शहा यांच्या एकाधिकारशाहीला लगाम घातला जाणे गरजेचे आहे या मुद्दय़ावर परिवारातील ज्येष्ठांचे एकमत झाल्याची माहिती आहे.

आपली प्रतिक्रिया द्या