आमची शाळा कधी सुरू होणार? न्यायालयातील सुनावणी खोळंबली…आरटीई लॉटरी लांबणीवर

विदर्भ वगळता राज्यभरातील शाळा उद्या 15 जूनपासून सुरू होणार असल्या तरी आरटीईद्वारे शाळा प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत दाखल होण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. आरटीई प्रवेशाबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवरील सुनावणी 18 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशाची लॉटरीदेखील लांबणीवर पडली आहे. जोपर्यंत न्यायालयात पुढे सुनावणी होत नाही, तोपर्यंत प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून लॉटरीतील प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली जाणार नाहीत, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.

आरटीई प्रवेशाबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर 12 जून रोजी सुनावणी होणार होती, परंतु ही सुनावणी होऊ शकली नाही. दुसऱया दिवशी तरी सुनावणी होण्याची अपेक्षा होती, परंतु तसे झाले नाही. आता पुढील सुनावणी 18 जून रोजी होणार आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. न्यायालयाच्या सुनावणीनंतरच प्रवेशाचा निर्णय घेतला जाणार आहे.

– राज्यातील 9 हजार 217 शाळांमधील 1 लाख 8 हजार 216 जागांवरील प्रवेशासाठी 2 लाख 43 हजार 104 प्रवेश अर्ज आले आहेत.
– 7 जून रोजी शिक्षण विभागातर्फे प्रवेशासाठी ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली. मात्र न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचा निर्णय न आल्याने अद्याप लॉटरीचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही.
– या लॉटरीत सर्वाधिक अर्ज पुणे जिह्यातील पोदार इंटरनॅशनल स्कूल, आंबेगावला आले आहेत. सदर शाळेत प्रवेशासाठी 2217 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
– न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच लॉटरीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे.