
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊनही सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करताना आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची केल्याने चाकरमान्यांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर होणारी गर्दी पाहता महामार्ग आणि रेल्वे स्थानकावर प्रचंड गोंधळ उडणार आहे. त्यामुळे सरकारने लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस झालेल्यांना विना अट प्रवेश देण्याचीही मागणी होत आहे.
मागील वर्षी ऐन गणपतीला कडक लॉकडाऊन असल्याने एसटी आणि रेल्वे सेवा पूर्णत: बंद होती परिणामी मुंबईकर चाकरमान्यांना आपल्या गावी जाणे शक्य झाले नाही. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना कोरोना होण्याची शक्यता फारच कमी आहे आणि झालाच तर मृत्यूचा धोका नाही हे सिद्ध झाल्याने केंद्र सरकार आणि आयसीएमआर यांनी लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना देशात सर्कत्र फिरण्याची मुभा दिली. किंबहुना त्यांना आरटीपीसीआर टेस्टची आवश्यकता नाही असेही जाहीर केले. त्यानंतर राज्य सरकारनेही मुंबईसह सर्वच जिह्यांत दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे, मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये मुभा दिली.
गणेशोत्सवात जाता यावे यासाठी चाकरमान्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस आधीच घेऊन पूर्ण केले आहे. रेल्वेने कोकणसाठी 200 हून जास्त अतिरिक्त गाडय़ा आणि एसटी महामंडळानेही दोन हजारांहून अधिक बसेस सोडल्या आहेत. चाकरमान्यांनी या सर्व गाडय़ांचे आरक्षण केले आहे. अशा वेळी त्यांची आरटीपीसीआर टेस्टच्या नावाखाली अडवणूक केली गेली तर केवळ खारेपाटण किंवा कशेडी या तपासणी नाक्यावरच नाही तर संपूर्ण महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
परप्रांतीयांची टेस्ट का केली जात नाही?
लसीचे दोन डोस घेतलेल्यांना केंद्र आणि राज्य सरकारने सर्वत्र फिरण्याची मुभा दिलेली असतानाच दुसरीकडे सिंधुदुर्ग जिह्यात दोन डोस घेतलेल्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्याची सक्ती केली जाते. मात्र केंद्र सरकारचा नियम दाखवून गोवा, केरळ, कर्नाटक,आणि देशभरातून येणाऱया परप्रांतीय नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट केली जात नाही. मग मुंबई आणि पुणे येथील नागरिकांची अडवणूक का केली जात आहे असा चाकरमान्यांचा संतप्त सवाल आहे.





























































