Rupali Chakankar Resign – राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांची सारवासारव; काय म्हणाल्या? वाचा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रुपाली चाकणकर यांनी अखेर राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी अजित पवार गटाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्त केला. राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी चाकणकर यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, “अशोक खरात याने केलेले कृत्य अत्यंत घाणेरडे असून त्याचे समर्थन कधीच करणार नाही. तपासात पारदर्शकता राहावी आणि पदाचा अडथळा येऊ नये यासाठी राजीनामा देत आहे.”

खरात कुटुंबाशी असलेल्या संबंधांवर स्पष्टीकरण देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, “शिविका संस्थान या महादेवाच्या मंदिर ट्रस्टवर मी अनेक वर्षांपासून सदस्य होते. खरात पती-पत्नीला माझ्या परिवाराने गुरु मानलं होतं. त्यामुळेच गुरुपौर्णिमा किंवा महाशिवरात्रीसारख्या कार्यक्रमांना आम्ही सहकुटुंब जात होतो. माध्यमांमध्ये दाखवले जाणारे पाद्यपूजेचे व्हिडीओ ५-६ वर्षांपूर्वीचे आहेत. एखाद्या व्यक्तीला आपण गुरु मानतो, पण ती व्यक्ती पुढे जाऊन काय कृत्य करणार आहे किंवा तिचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, याची आम्हाला सुतराम कल्पना नसते.”

“या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे व्हावा यासाठी मी स्वतः पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पत्र दिले आहे,” असे सांगत चाकणकर यांनी आयोगाच्या कामाचा पाढाच वाचला. १९ मार्च रोजी एका वर्तमानपत्रात आलेली बातमी मोगम स्वरूपाची होती, तरीही आयोगाने संबंधित पत्रकाराला माहिती देण्यास सांगितले होते. तसेच ५ तारखेला आलेल्या एका तक्रार मेलवर तातडीने कारवाई करत पोलिसांना कळवले होते, असेही त्या म्हणाल्या.